चैतन्याला कधीच वार्धक्य येत नसते... प्रा. देवणे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात डॉ. नांदेडे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

       चैतन्याला  कधीच  वार्धक्य येत नसते, सदैव सळसळते  राहणे  हेच त्याचे लक्षण असल्याचे प्रतिपादन  राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले. ते  मंजुळाबाई खतगावकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विश्वंभर गणपतराव देवणे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  पुढे बोलताना डॉ नांदेडे यांनी प्रा. देवणे  यांनी आयुष्यभर सळसळत्या  उत्साहाने अध्यापनाचे कार्य केल्याचे सांगून  त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो आदर्श विद्यार्थी घडविल्याचा  उल्लेख करून आज जीवनातील सर्व क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गवगवा असल्याचे प्रतिपादन केले .

  

      यशवंत महाविद्यालयाचे अर्थशास्त्राचे  सेवानिवृत्त प्रा. डॉ विभुते सरांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी नगर येथील हॉटेल विसावा येथे हा सुंदर सन्मान सोहळा संपन्न झाला.  प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला . सन्मान पिठावरील  अध्यक्षासह सर्व उपस्थित्यांचा  शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला . 


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शिक्षक  सुदर्शन देवणे  यांनी केले . आपल्या प्रास्ताविकात त्यांनी  सत्कारमूर्तींच्या  आयुष्यभरातील कार्यकर्तृत्वाचा  सुरेख आढावा घेतला . प्रा. विश्वंभर देवणे यांनी साऱ्या कुटुंबावर केलेल्या सुसंस्काराचा सुंदर आलेख मांडला . त्यानंतर  सत्कारमूर्ती प्रा विश्वंभर देवणे  यांचा त्यांच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,कर्मचारी , देवणे परिवार, शिराढोणचे ग्रामस्थ,  संस्था आणि मित्रमंडळाच्या वतीने प्रमुख अतिथींच्या हस्ते मानचिन्ह, मानपत्र, शाल श्रीफळ आणि  वस्त्र देऊन   भव्य सेवापूर्ती सन्मान करण्यात आला . प्रा. विश्वंभर देवणे यांचे सुपुत्र बँक  अधिकारी अक्षय देवणे  आणि  सुनबाई श्रद्धा अक्षय देवणे यांनी  आपल्या भाषणातून  प्रा. विश्वंभर देवणे यांच्या  संस्काराची कृतज्ञता व्यक्त केली . 


         याप्रसंगी  शिराढोण चे आदर्श सरपंच  खुशालराव माधवराव पांडागळे यांनी सेवानिवृत्तीनंतर  प्राध्यापकांनी आपल्या जन्मभूमीत येऊन लोकसेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली .नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी आपल्या भाषणात प्रा. विश्वंभर देवणे यांच्या शालीन स्वभावाच्या गौरव केला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांत ही नम्रता उतरल्याचे विशद केले . कंधार पंचायत समितीचे माजी सभापती बालाजीराव माधवराव पांडागळे यांनी  आपल्या भाषणात प्रा. विश्वंभर  देवणे  यांनी आपल्या कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचा गौरव केला आणि इतर शिक्षकांनी त्यांचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला .  नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांनी शिक्षकांच्या  सन्मानातून विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन केले . 


         परभणी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बालाजी शिंदे यांनी प्रा. देवणे यांच्या अर्थशास्त्रातील व्यासंगाचा गौरव करून त्यांनी स्वव्यासंगाचे  ग्रंथांत रूपांतर करण्याची विनंती केली . शिराढोण चे मालीपाटील यांनी प्रा देवणे यांच्या  मितभाषीपणाचा गौरव करून त्यांच्या अभ्यासाच्या व्यासंगाचे कौतुक केले . या कार्यक्रमासाठी प्रा. देवणे यांना शिराढोण मध्ये बालपणी शिकविलेले त्यांचे शिक्षक वारकड  गुरुजी आणि एकाळे ताई खास आवर्जून उपस्थित होत्या ... आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. विश्वंभर देवणे यांनी आपण आपल्या अध्यापनातून जे काही  संस्कार विद्यार्थ्यावर करू शकलो ते केवळ आपल्या शिक्षकांनी आपल्यावर केलेल्या संस्कारामुळे करू शकलो . आता आपण आपले उर्वरित आयुष्य समाजातील उपेक्षित , वंचित ग्रामीण विद्यार्थ्यांना  प्रगत करण्यासाठी व्यतीत करणार असल्याचे घोषित केले . आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रा डॉ विभुते यांनी आपल्या जीवनात प्रा. विश्वंभर देवणे यांच्यासारखा आदर्श प्राध्यापक  घडला याचा आपणास  सार्थ अभिमान आणि  आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन केले .


          याप्रसंगी प्रा. रामराव एकलारे , प्रा. डॉ आनंद कर्णे, प्राचार्य  पिनलवाड , शिक्षक संघटनेचे दत्तप्रसाद पांडांगळे,  जिजाऊ ब्रिगेडच्या अरुणाताई ,  तहसीलदार नेमाजी देवणे, पोलिस पाटील बाळासाहेब कपाळे  , जयराम पाटील. चेअरमन माधवराव  कपाळे, माजी सरपंच आळने  यांची समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रा. भुरे यांनी केले तर  आभार प्रदर्शन  मुक्ताराम देवणे यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)