शाळाप्रवेश.. उत्सव झाला पाहिजे !
सुट्टी संपली, शाळा सुरु झाली.. शाळेचा पहिला दिवस आनंदाचा, उत्सवाचा.. प्रदीर्घ उन्हाळी सुट्यांनंतर आज शाळा.. सगळीकडे नवे नवे.. पहिल्या वर्गात येणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटणारी तर काहींना नकोशी वाटणारी.. पण शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक फुलं आणि चॉकलेट देऊन जेव्हा स्वागत करतात.. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून शाळाही खळखळून हसत असेल नाही का? निरागस बालक जेव्हा शाळेत प्रवेश करतात तेव्हा पहिल्याच दिवशी एखादा सण साजरा करतोय असं वाटावं असा शाळेचा परिसर.. हसतमुख शिक्षकांने केलेले स्वागत, गोंडस मुलांना जवळ घेऊन आस्थेने संवाद साधणारी शिक्षिका.. सगळ कसे वेगळ वाटावे असे.. मुलांना हे जग नवे वाटणारे असले तरी अशा प्रेममय स्वागताने जग आपलसं वाटणार.. मग काय पहिल्याच दिवशी शाळेत मिळणारे नवे मित्र मैत्रिण.. गप्पागोष्टी, खेळ, किती किती मजा नाही का..?
कुणाचे वर्ग बदलले, कुणाचे शिक्षक बदलले.. त्यांनाही पहिल्याच दिवसी वेगळं अनुभवायला मिळणार.. त्यांचाही आनंदाचा क्षण! आज शाळेचा पहिला दिवस.. उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात प्रवेश घेतांना, नवीन वर्गखोलीत बसतांना मुलांना तर आनंदच.. नव्या वर्गात जागेवर बसण्याची धडपड, नव्या शिक्षकांना बोलतांनाचा आनंद.. खरच कशात मोजता येईल का? नाही ना! हा आनंद विधार्थी त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक यांना नक्कीच जानवतो. सगळ काही नवीन असल्याने मुले भरभरून बोलण्याचा प्रयत्न करतात.. शाळेच्या पहिल्याच दिवसी त्यांच्या वर्गाची पाठ्यपुस्तके हातात पडतात. शैक्षणिक साहित्यही दिल्या जाते. मुलांच्या हाती पुस्तके पडताच त्यावर आपली नावे लिहून पुस्तके पाहण्यात गर्क झालेली विद्यार्थी मी पाहिले.. पुस्तके नवे, त्यातील चीत्र नवे, गणवेश नवा, शुज- बुट नवे.. काय मजा! शाळेचा पहिला दिवस आनंद तर वाटणारच ना !
आता तर शाळेचे स्पच बदलले.. सर्वच डिजीटल शाळा! वर्गखोल्या रंगरंगोटीने परिपूर्ण.. शाळेच्या प्रवेशव्दारावर कमान त्यावर शाळेचे नाव, संरक्षक भिंतीवर पाठ्यपुस्तकातले चीत्र, मराठी -हिंदी - इंग्रजी शब्द, इतिहास, भूगोल व परिसराची माहिती, विज्ञानाचे प्रयोग, गणितीय सुत्र, पाढे.. जस काय सर्व पुस्तके भिंतीवर अंधरलेली.. शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्ष, विविध फुलांच्या वेली.. हिरवी अन मनमोहक परिसर असलेली शाळा आज सर्वत्र पाहायला मिळते.. याचे सर्व श्रेय शाळेचे विद्यार्थी, पालक शिक्षक, शिक्षिका मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांना जाते. शाळेतच तक्रार पेटी, प्रयोगशाळा, वाचनालय, क्रिडा साहित्य, मधान्ह भोजन, पिण्याचे शुद्ध पाणी, मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.. शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकायनि शाळा नावारूपास येतांना दिसते.
नवोपक्रमाने शाळा परिपूर्ण होतांना दिसत आहे. उपक्रमशिल शिक्षकामुळे विद्यार्थ्यांची गुणवता वाढीस लागली आहे.. म्हणून विद्यार्थांना शाळा आवडू लागलीय! डिजीटल वर्गखोलीत काम्प्यूटर व प्रोजेक्टर व्दारे नवनवीन माहिती मिळू लागलीय. डिजीटल बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर पाठ्यपुस्तकातील मुद्दे सहज बिंबवता येतात. सहजपणे अध्ययन -अध्यापन होते. आनंददायी व हसत खेळत शिक्षणावर भर असल्याने मुलांनाही आनंद वाटतो व तो शाळेत टिकून राहतो. मुलींची उपस्थिती वाढवण्यासाठी भत्ता दिला जातो, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जाते, मध्यान्ह भोजनात पौष्टिक आहार दिल्या जातो, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, विविध शासकिय योजनांचा प्रत्येक मुलांपर्यंत होणार लाभ.. शाळेत होणारे संस्कृतिक कार्यक्रम, विविध क्रिडा स्पर्धा, नैसर्गिक सहल, बीनभिंतीची शाळा, क्षेत्रभेट.. असे विविध उपक्रम राबविणारे कल्पक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत पहावयास मिळतील!
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळा प्रवेश उत्सव महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात साजरा होतोय, शाळा प्रवेश उत्सव राबवून शंभर टक्के पटनोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, व शंभर टक्के गुणवत्ता या उध्दीष्टाने काम होणार आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा मुख्य उध्देश आहे. पालकही जागरूक झालेले आहे. वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत दाखल करतांना दिसतात. प्राथमिक शिक्षणासाठी जागरूक असल्याने शिक्षक आणि पालकात गुणवत्ता संदर्भात चर्चा होतांना दिसते, ही सकारात्मकताच यशाची पायरी आहे असे मला वाटते..!
◼️यादवपुत्र रमेश मुनेश्वर
संवाद - ७५८८४२४७३५
( राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, किनवट )




आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .