नांदेड (शालेय वृत्तसेवा ) :
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नांदेड पंचायत समिती अंतर्गत मुख्याध्यापकांचे नागार्जुना पब्लिक स्कूल येथे प्रशिक्षण संपन्न झाले. अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर व जिल्हा परिषद शालेय पोषण आहार विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी निळकंठ पाचंगे, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुठ्ठे, नागार्जुन शाळेचे सचिव केशव गड्डम हे उपस्थित होते. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत शासकीय पत्र व योजने संदर्भात माहिती गटशिक्षणाधिकारी सुधीर गुठ्ठे यांनी दिली.
शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी या योजनेतील बारकाव्याबाबत व तांदूळ व धान्यादी बाबत साठवण, स्वच्छता, अभिलेखे इतर बाबींची माहिती दिली व उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी सदरील योजना व अन्न व औषधी प्रशासन विभाग यांची जबाबदारी कायद्यातील तरतुदीनुसार मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या व पोषण आहारासंबंधी घ्यावयाची काळजी तसेच परिसरामध्ये जंक फूड खाण्यास प्रतिबंध, धान्य कसे सुरक्षित ठेवावे, किती उंचीवर ठेवावे ज्या प्रकारे आपण आपल्या घरी स्वच्छता ठेवतो त्या पद्धतीने किचनशेड व साठा रुममध्ये स्वच्छता ठेवावी असे नमूद केले. शेड्युल्ड 4 मधील तरतुदी समजून सांगितल्या. प्रशिक्षण दोन सत्रात संपन्न झाले. दुसऱ्या सत्रात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी शिल्पा श्रीरामे यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गास नांदेड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील जिल्हा परिषद खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील 397 शाळांचे मुख्याध्यापक व प्रस्तुत योजनंचे काम करणारे शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी पंचायत समिती नांदेडचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाचे डेटा इंट्री ऑपरेटर संदीप रामशेट्टे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी तर शिक्षण विस्तार अधिकारी शंकर मठपती यांनी आभार प्रदर्शन केले.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .