१९ विद्यार्थी पात्र; १० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक – जिल्हा गुणवत्ता यादीतही सारखणीचा दिमाखदार ठसा
किनवट ( शालेय वृत्तसेवा ) :
ग्रामीण भागातील शाळा गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही मोठ्या शाळेपेक्षा कमी नसते, हे पुन्हा एकदा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सारखणी (ता. किनवट, जि. नांदेड) यांनी आपल्या उल्लेखनीय यशातून सिद्ध करून दाखविले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शाळेचे एकूण १९ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा उंचावला आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये केरबा संजय खांडेकर, कार्तिक अमोल चव्हाण, स्वरा भीमराव मेश्राम, भाविका भाऊराव जुगनाके, आबिद मोफिक शेख, आरुषी अनिल अंभोरे, स्वराली नागनाथ गायकवाड, बजरंग संजय राठोड, अनमोल वसंत डांगरे आणि नेहा नंदकिशोर राठोड यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, नांदेड जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये केरबा संजय खांडेकर याने जिल्ह्यात चौथा क्रमांक, तर कार्तिक अमोल चव्हाण याने जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावून सारखणी शाळेच्या गुणवत्तेचा ठसा जिल्हास्तरावर उमटविला आहे. तसेच किनवट तालुक्यात यावर्षी एकूण २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असून, त्यापैकी तब्बल १० विद्यार्थी हे एकट्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सारखणीचे आहेत. ही अभिमानास्पद कामगिरी शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीचा जिवंत पुरावा ठरली आहे.
या दैदिप्यमान यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन, नियमित सराव आणि शाळेतील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांचा मोलाचा वाटा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश संपूर्ण किनवट तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, शाळेच्या इतिहासात या कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल किनवट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निळकंठ चेटले साहेब, दहेली बीटाचे विस्तार अधिकारी मा. श्री. अनिलकुमार महामुने साहेब, केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. भविष्यातही विद्यार्थ्यांनी ज्ञान, गुणवत्ता, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर यशाची नवी शिखरे सर करून शाळा, तालुका व जिल्ह्याचे नाव अधिक उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .