शिक्षक दिन विशेष : आदिवासी बहुल भागातील शिक्षकाचे नाव उमटले बालभारतीच्या पानावर..

शालेयवृत्त सेवा
0

 


यादवपुत्र रमेश मुनेश्वर यांचा प्रेरणादायी प्रवास !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

          शिक्षक म्हणून कार्य करताना अनेक स्वप्ने मनात असतात. काही स्वप्ने विद्यार्थ्यांच्या यशातून पूर्ण होतात, तर काही स्वप्ने आपल्या कार्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचतात. असेच एक स्वप्न साकार करणारे नांदेड जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षक रमेश यादवराव मुनेश्वर यांनी बालभारतीच्या पानावर आपले नाव कोरले आहे. किनवट तालुक्यात तब्बल २९ वर्षे सेवा बजावणाऱ्या मुनेश्वर यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.


         उमरीबाजार येथील रहिवाशी असलेले सध्या ते शनिवारपेठ केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरसांगवी (चि.) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी माहुर केंद्रातील लांजी, उमरी (बा.) केंद्रातील परसरामनाईक तांडा व चिंचखेड, कमठाला केंद्रातील झेंडीगुडा व लोणी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबई येथे 'राज्य शिक्षक पुरस्काराने' गौरविले आहे. त्यासोबतच नवी दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, पुणे येथे कवीवर्य जगदीश खेबुडकर पुरस्कार, ठाणे येथे राज्यस्तरीय साथी नाट्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


         लेखी परीक्षा, मुलाखत, अनुभव आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ अर्थात बालभारतीमध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीच्या प्रथम भाषा विषयाच्या भाषा समिती सदस्य म्हणून स्थान मिळविले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि आधुनिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने बालभारतीकडून पाठ्यपुस्तक निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. यावर्षी इयत्ता तिसरी आणि चौथीची पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती आली आहेत. मुलांच्या विचारांना चालना मिळावी, या उद्देशाने कविता, पाठ आणि स्वाध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. 'नवीन शब्द शिकूया, आम्हाला हे समजले, विचार करा व सांगा, चर्चा करूया, लिहिते होऊया, कृतीतून शिकूया, खेळूया शब्दांशी, आपण समजून घेऊया, सारे हसू या, जाणून घेऊ या, कृतितून शिकूया, चला वाचूया..' अशा विविध उपक्रमांद्वारे मुलांच्या सर्जनशीलतेला आणि नवनिर्मितीला स्थान देण्यात आले आहे.


        यादवपुत्र रमेश मुनेश्वर यांनी सेवेत असतानाच एम.ए. (मराठी), एम.ए. (शिक्षणशास्त्र), डी.एड., बी.एड., एम.एड., डी.एस.एम. तसेच डिप्लोमा इन जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण केले आहे. वृक्षारोपण उपक्रमांतर्गत ‘चला, ऑक्सिजन पेरूया’ हा उपक्रम त्यांनी राबविला. शिक्षकांच्या उपक्रमशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने ‘शालेयवृत्त’ हे वेब पोर्टलही त्यांनी सुरू केले आहे. शासनाने आयोजिलेल्या स्पर्धेत व्यसनाधीनतेच्या विरोधातील ‘मी हरलो होतो पण जिंकलो..’ या एकपात्री प्रयोगाला लातूर विभागातून प्रथम क्रमांक मिळाला. स्वतः अभिनित आणि दिग्दर्शित केलेल्या ‘नाऱ्याचं लगीन’ या नाटिकेचे ५० पेक्षा अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित 'क्रांतीसूर्य ' दोन अंकी नाटिकेत म.फुले यांची मध्यवर्ती भूमिका साकारून प्रेक्षकांची दाद मिळवली. राज्य विज्ञान प्रदर्शनात त्यांच्या विद्यार्थिनीने सहभाग नोंदविला आहे. योगा स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सहभाग नोंदविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवी आणि चौथीचे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.


         ‘निसर्ग शाळा’, बिनभिंतीची शाळा, वृक्षदिंडी, स्मशानभूमीत वृक्षारोपण, क्षेत्रभेटी, शैक्षणिक सहल, ‘उमलत्या कळ्या’ हस्तपुस्तिका, प्रजासत्ताक महोत्सव, ‘कौन बनेगा विजेता?’ या सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रमांसह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत. नांदेड आकाशवाणी केंद्रावरून त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत. ‘नवक्रांती’, ‘शब्दगंध’, ‘कविता संविधानाच्या...’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहांचे त्यांनी संपादन केले आहे. शासनाच्या ‘जीवन शिक्षण’ आणि ‘किशोर’ या मासिकांमध्ये त्यांचे लेख, कविता आणि बालनाटिका प्रकाशित झाल्या आहेत. विविध विशेषांक तसेच वर्तमानपत्रांमधून त्यांचे कविता, लेख, कथा आणि समीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.


         अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता वाचन, विद्रोही साहित्य संमेलनात कविता वाचन तसेच शिक्षक साहित्य संमेलनाच्या आयोजनात सक्रिय सहभाग अशा विविध साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांतून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आदिवासी क्षेत्रातील एका शिक्षकाने आपल्या अध्यापनातून, साहित्यिक योगदानातून आणि विविध उपक्रमांतून केलेली ही वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत भाषा समिती सदस्य म्हणून मिळालेले स्थान त्यांच्या २९ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)