विज्ञान प्रदर्शन एक सोहळा न राहता तो सृजनाचा मेळावा बनावा - डॉ.अमोल निळेकर

शालेयवृत्त सेवा
0

 



_५४व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्कृष्ट प्रतिसाद_

_विज्ञान प्रदर्शनाचे यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण_


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अशात विज्ञान प्रदर्शन म्हटले की तो एक प्रकल्प सादरीकरणाचा सोहळा होताना दिसतो, प्रत्यक्षात तो विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांचा, सृजनाचा मेळावा होणे अभिप्रेत असते, असे मत डॉ. अमोल निळेकर यांनी व्यक्त केले. नांदेड येथील श्री चैतन्य ई-टेक्नो स्कूलमध्ये तालुकास्तरीय ५४ व्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


यावेळी विचारमंचावर वंदना फुटाणे (शिक्षणाधिकारी प्राथमिक), माधव सलगर (शिक्षणाधिकारी माध्यमिक) दिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी योजना), प्रवीणा मांदळे (शिक्षणाधिकारी मनपा), सुधीर गुट्टे (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती नांदेड), श्री चैतन्य स्कूलचे AGM शिवकुमार अन्नदानम, नीलिमा शुक्ला (मुख्याध्यापिका चैतन्य स्कूल) आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना ते म्हणाले, बालवैज्ञानिकांनी मानवी आयुष्यातील समस्यांचा चिकित्सक पद्धतीने विचार करत त्या समस्यांची उकल करताना मानव जातीचा शाश्वत विकास कसा साधला जाईल अशा पद्धतीचे संशोधन करण्याकडे लक्ष द्यायला हवे. विद्यार्थ्यांना सातत्याने हे असे का? ते तसे का? असे प्रश्न पडत राहिले पाहिजे.


जागतिक पातळीवर देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारांमध्ये १९३० मध्ये सी व्हीरमण यांना देण्यात आलेल्या नोबेल पुरस्कारानंतर एकाही भारतीय संशोधकाला नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. हे असे होण्याचे कारण आपण चिकित्सक बुद्धीने विचार करत नाही. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करतानाच विद्यार्थ्यांच्या एकंदर विचारसरणी मध्येसुद्धा तितकेच बदल होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.


माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी, प्रत्येक बालकात वैज्ञानिक लपलेला असून अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले. अशा पद्धतीने केवळ सहभागी न होता प्रत्यक्ष जीवन व्यवहार जगताना वैज्ञानिक दृष्टिकोन जगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.


या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उच्च प्राथमिक स्तर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरातील सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर, प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक या गटातूनसुद्धा अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.

गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी, हे प्रदर्शन म्हणजे येणाऱ्या काळातील वैज्ञानिक निर्माण करण्याची कार्यशाळा असून याठिकाणी सहभागी सर्व बाल वैज्ञानिकांनी स्वतःच्या प्रयोगाबरोबरच इतरही स्पर्धकांच्या प्रयोगांची निरीक्षण करावे, प्रयोग करत राहिल्याने नवनवीन शोधांचा जन्म होतो असे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चैतन्य स्कूल तर्फे या प्रदर्शनाचे यू ट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. याद्वारे तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन आपल्या आपल्या शाळेमधून पाहता आले. तज्ज्ञ परीक्षकांकडून परीक्षण करून दोन्ही गटातून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले.


६वी-८वी गट

प्रथम क्रमांक - महात्मा फुले हायस्कूल बाबानगर

द्वितीय क्रमांक - ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल नांदेड

तृतीय क्रमांक - श्री चैतन्य ई-टेक्नो स्कूल नांदेड 


९वी-१२वी गट

प्रथम क्रमांक - महात्मा फुले हायस्कूल बाबानगर 

द्वितीय क्रमांक - सांदिपनी इंटरनॅशनल स्कूल नांदेड 

तृतीय क्रमांक - सायन्स कॉलेज नांदेड यांना मिळाला.


शिक्षक गट ६-८

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे विश्वनाथ पोतदार यांनी तर ९-१२ गटात शरयू राठोड यांनी यश संपादन केले. प्रयोगशाळा सहाय्यक परिचर गटात गुजरातीचे किरण चव्हाण यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अक्षय ढोके यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर मठपती यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकट मदने, व्यंकट पाटील, बाळासाहेब मटके, विजयकुमार धोंडगे, व्यंकट गंदपवाड, संग्राम झुडपे, मोरे, संजय भालके, मारोती ढगे, सुनील मुत्तेपवार, विकास ढवळे, सुधाकर राठोड, बालाजी लोकरे, संतोषी उजळंबकर, संतोषी हातराळकर, सुनीता पाटील, सुजाता ऐनवाड तसेच चैतन्य टेक्नो स्कूलचे DGM शिवप्रताप यांच्या सौजन्याने सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)