नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबोली येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन तसेच जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजावी आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, या उद्देशाने वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून आपले वाचन कौशल्य सादर केले.
तसेच जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना डॅा. रुपाली भगत समुदाय आरोग्य अधिकारी शेंबोली यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची योग्य पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. नियमित हात धुण्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण मिळते, हा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, स्वच्छतेची सवय आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “वाचनातून ज्ञान, स्वच्छतेतून आरोग्य” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक प्रकाश कौठेकर,मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर,शिक्षक रामकृष्ण लोखंडे,संगिता वादळे,छाया मठदेवरु,जयश्री गायकवाड,आरोग्य सहायक विनोद पाईकराव,आरोग्य सेविका अरुणा कुरुडे,रेखा कपाळे,आशा वर्कर अन्नपूर्णा धुतराज,ओमशिला पंदिलवाड शापोआ मदतनीस गोविंद गोरेवाड व विद्यार्थी उपस्थित होते


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .