जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथाडी येथे ४२ हजार रुपयांच्या क्रीडा साहित्याचे दिमाखात उद्घाटन!

शालेयवृत्त सेवा
0
चंद्रपूर / जिवती (शालेय वृत्तसेवा ): 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, माथाडी येथे विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एका महिला स्वयंसेवक मॅडम यांच्या विशेष सहकार्यातून तब्बल ४२ हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या क्रीडा साहित्याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
     
           या कार्यक्रमाला जिवती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री. संदीप चौधरी सर, केंद्रप्रमुख श्री. संजय सेलोकर सर, पंचायत समिती जिवतीचे विषय शिक्षक श्री. शेळके सर, जलजीवन मिशनचे श्री. चव्हाण सर, शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. चोरमल्ले सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, माथाडी गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ शैक्षणिक प्रगती नव्हे, तर शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी क्रीडा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. 

           उपलब्ध झालेल्या या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचा आनंद घेण्याची आणि आपल्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका महिला स्वयंसेवक मॅडम यांनी केलेले हे अनमोल सहकार्य खऱ्या अर्थाने समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि शैक्षणिक क्षेत्राविषयीच्या आत्मीयतेचे प्रतीक आहे. या अनमोल सहकार्याबद्दल शालेय प्रशासन, शालेय व्यवस्थापन समिती आणि समस्त ग्रामस्थ माथाडी यांच्या वतीने संबंधित महिला स्वयंसेवक मॅडम यांचे मनःपूर्वक आभार व कृतज्ञतापूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले. समाजातील दातृत्वशील व्यक्तींच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा विकास अधिक गतिमान होऊ शकतो, याचेच हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे! आपले सहकार्य असेच सदैव लाभत राहो, हीच सदिच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)