नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्राची सुधारीत यादी घोषीत करण्याची मागणी जि.प. सदस्य तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी विभागिय आयुक्ताकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी दिनांक 07 मार्च 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अवघड व सोपे क्षेत्र निर्धारीत करण्यासाठी सात स्पष्ट निकष ठरवुन दिलेले असतांना नांदेड जिल्हा परीषदेने अत्यंत चुकीच्या पद्धतीने शासनाच्या निर्णयाला बगल देऊन मनमानीपणे माहूर व किनवट तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रतिकुल परिणाम करणारी अवघड क्षेत्राची यादी घोषीत केली आहे.
नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार माहूर व किनवट तालुके100% डोंगरी आहेत. आदिवासी विभागाच्या शासन निर्णयानुसार माहूर तालुक्यातिल 80% गावे व संपुर्ण किनवट तालुका पेसा क्षेत्रात आहे. पोलीस अधिक्षकाच्या दिनांक विस मार्च दोन हजार चारच्या पत्रानुसार माहूर व किनवट तालुक्यातिल काही गांवे नक्षलग्रस्त घोषीत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी माहुरच्या अहवालानुसार तालुक्यातिल ब्याण्णव शाळा हिंस्त्र व वन्यप्राण्यांच्या उपद्रव क्षेत्रात येतात. काही गांवे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासुन दहा किमी पेक्षा दुर, काही गावे संवादछायेच्या प्रदेशात तर काही गांवे बस, रेल्वे इ. वाहतुक सुविधेने जोडलेली नाहीत असे असतांनाही जाणीवपुर्वक व खोडसाळपणे स्वतःच्या मनाने यादी तयार केली असुन तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी नविन पुरवणी याही तयार करून अन्याय दुर करण्यात यावा अन्यथा नाईलाजास्तव मा. उच्च न्यायालयाचे न्यायासाठी दार ठोठावावे लागेल असे निवेदनात नमुद केले आहे.
तालुक्यावर झालेल्या अन्याया विरोधात शिक्षक भारती संघटना माहुर, महाराष्ट्र प्राथामिक शिक्षक संघ व पुरोगामी शिक्षक संघटनेने जि. प. सदस्य समाधान जाधव यांना निवेदन दिले. यावेळी समाधान जाधव यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना भ्रमनध्वनीद्वारे संपर्क करून निकषनिहाय मुद्देसुद चर्चा केली. चर्चेअंती पुरवणी यादी काढण्याचे शिक्षणाधिकार्यांनी मान्य केले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .