चला 'ऑक्सिजन' पेरूया...!

शालेयवृत्त सेवा
1

 



चला 'ऑक्सिजन' पेरूया...!

______________________________________



शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल यात नवल नाही. ऑक्सिजन कसा पेरतात ? कधी कुणी ऑक्सिजन पेरतात का ? अनेक प्रश्न ? पण आज गरज निर्माण झाली आहे ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या वृक्षांचे रोपण करण्याची. त्याचे बीज पेरण्याची.. पर्यायाने 'ऑक्सिजन' पेरण्याची ! खरेतर ऑक्सिजनचे सर्वात महत्त्व या दोन वर्षात सर्व जगाला कळू लागले आहेत. ऑक्सिजन अभावी आपल्या देशात कित्येक तडफडत मरताना सर्वांनी पाहिले. म्हणूनच तर त्याला दुसरे नाव 'प्राणवायू ' आहे ना ! आणि या प्राणवायूची निर्मिती ही आपल्याच हाती आहे हे आपल्याला केव्हा उमजेल.?


निसर्ग आपल्याला भरभरून देतो पण आपण निसर्गातला काही देत नाही. त्याची परतफेड करत नाही. उलट घनदाट जंगले नष्ट होऊन सिमेंटची जंगले उभी होताना दिसत आहे. झाडावर चालणारी कुर्‍हाड म्हणजे आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुर्‍हाड आपण मारत तर नाही ना याचा कधी विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली वृक्ष तोडणे, मोठमोठे घर बांधणे, बंगले -रो हाऊस, फ्लॅट उभारत आहेत. रस्ते निर्माणाच्या नावाखाली मोठे मोठे झाडे तोडताना दिसत आहेत. म्हणून शुद्ध हवा, ऑक्सिजन आपल्याला मिळत नाही. त्यामुळेच फुप्फुसाचे आजार बळावत आहेत. विकास आवश्यक आहे त्याला कोणी विरोध करत नाही, करणारही नाही पण एक झाड तोडले तर किमान दुसरे पाच झाडे सुद्धा लावून जगवली पाहिजेत.




'नेहमीच येतो पावसाळा' त्याप्रमाणे वृक्षारोपणाचे झाले आहे. जून-जुलैमध्ये शिक्षण, आरोग्य, महसूल, वन विभागाकडून वेगवेगळे प्रकारचे लाखो करोडोने वृक्ष लागवड केली जाते. पुन्हा त्याच ठिकाणी दरवर्षी वृक्षारोपण !  वृक्ष लागवडीचा नुसता हशा झाला आहे. वृक्षारोपण फक्त फोटो आणि अहवालाला पुरतेच मर्यादित झाले की काय ?  कोणीतरी आदेश देतात म्हणून आपण हा कार्यक्रम करत असतो. जो पर्यंत मनातून 'वृक्षारोपण' होत नाही तोपर्यंत त्याचे संगोपनही होत नाही. म्हणून ती लोकचळवळ व्हावी असे मला वाटते.



वृक्षारोपण करताना झाडे कोणती लावावी याचाही विचार आता आपणास करावा लागणार आहे. नाहीतर काही झाडे अशी असतात की चार-पाच वर्षात कोलमडून किंवा तुटून पडतात आणि कार्बन डाय-ऑक्साइड जास्त सोडतात. हे परदेशी झाडे शोभे पुरतेच बरे.. पण ऑक्सिजन जास्त देणारी झाडाची निवड करुन लावणे योग्य. जसे पिंपळ, वड, चिंच, आंबा, निम, बेल, जांभुळ, आवळा, रिठा, हिरडा, आदी दीर्घकाळ टिकणारे झाडे लावावीत. तुळस सारखे रोपटे सुद्धा चोविस तास ऑक्सिजन देते. पिंपळ - वड लावू नयेची अंधश्रद्धा डोक्यातून काढून चोविस तास 'प्राणवायू' देणारी ही झाडे शालेय परिसरात, गावाच्या स्मशानभूमीत, मोकळ्या जागी, रस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या बांधावर आवर्जून लावली पाहिजे नव्हे काळाची गरज आहे.




वृक्ष माणसासाठी खूप उपयोगी आहेत वृक्ष पासून विविध आयुर्वेदिक औषधे तयार होतात जेकी मानवास उपयुक्त आहेत. वृक्ष वातावरणातून कार्बन-डाय-ऑक्‍साईड शोषुन घेतो आणि ऑक्सिजन सोडतो जेकी आपल्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहे. वृक्षाचा सर्वात मोठा फायदा ज्यामुळे पाऊस पडतो.. पाऊस पडला तरच सृष्टी हिरवीगार होते, शेतात भरपूर उत्पादन होते आणि त्यामुळे माणसाला खायला भेटते. पशु -पक्षी -प्राणी त्यावरच जगतात. मानव पूर्वी वृक्ष पूजक होते. आजही झाडांची पुजा केल्या जाते. त्यामुळे मानवाचं आणि झाडाचा नातं अतूट आहे. आपल्याला माहित आहे मनुष्य अगोदर जंगलामध्ये राहत होता तेव्हा तो झाडावर किंवा गुहेत राहायचा,  झाडाचे पाने -फळे खाऊन जगायचा. आता जंगलात सुद्धा झाडे नसल्यामुळे हिंस्त्र प्राणी गावात येतांना दिसतात.


पृथ्वीवर झाडे असल्यामुळेच ती सुंदर आणि हिरवेगार दिसते. . झाडे नसेल तर पृथ्वीवर जीवन तरी कसे राहू शकेल ?  कारण जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि ऑक्सिजन फक्त झाडेच आपल्याला देऊ शकतात म्हणून आपल्याला जगायचं असेल तर झाडे लावणे अति आवश्यक आहे. 




हवामान बदलाचे दुष्परिणाम सर्व जगाने अनुभवले ,हिमनद्या वितळणे, ढगफुटी, महापूर, भूस्खलन मुळे “माळीण” सारखे अख्खे गाव रात्रीतून नष्ट होणे, तापमान वाढ, पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण आणि ऑक्सिजन अभावी अनुभवलेला आरोग्यावरील दुष्परिणाम, आजही आपण अनुभवत आहोत.  म्हणून ओसाड जागेवर मियावाकी घनवन निर्मिती उप्रकम हाती घेणे आवश्यक आहे. यामुळे ३०% पर्यंत हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेण्यास मदत होते.



वृक्षारोपणाची आणि त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आता सर्वांवर येऊन ठेपली आहे. विद्यार्थी जीवनात पासूनच त्याचे महत्त्व समजावे म्हणून प्रत्येक शाळेतून 'झाडे लावा -झाडे जगवा -पर्यावरण वाचवा' हा मूलमंत्र जपला जावा. महसूल आणि वन विभागाकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून त्याला मोठे करण्याची जबाबदारी साठी कर्मचारी नेमल्यास उन्हाळ्यातही झाडांना पाणी मिळेल अन त्याचे रक्षण होईल. 'रस्ता तिथे दुतर्फा झाडे' या अटीवरच गुत्तेदारास रस्ता बांधकाम करण्यास दिले तर भविष्यात एक वेगळाच निसर्ग पाहावयास मिळेल. शुद्ध हवा मिळेल. प्राणवायूची कमतरता जाणवणार नाही. म्हणून मित्रहो, चला ऑक्सिजन पेरू या..!




- रमेश यादवराव मुनेश्वर

स्तंभलेखक, किनवट जि. नांदेड 

संवाद - ७५८८४२४७३५

_____________________________________


(लेखक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

  1. मुनेश्वर सर,
    अप्रतिम लेख आहे,अभ्यासपूर्ण उपयुक्त आणि
    चिंतनीय आहे.

    उत्तर द्याहटवा
टिप्पणी पोस्ट करा