काव्यफुले : आजच्या सदरात -
◼️ कवी राजा तामगाडगे🖋️(एमए मराठी, नेट, सेट, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, बीएड, डिएड )
सहायक शिक्षक ,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकजांब ता. किनवट जिल्हा नांदेड
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मास्तर! एवढं कराच...
मास्तर!
लेकराला लिहिता वाचता येत नाही, अन् काऊन तुम्ही ध्यान देत नाही .
काबाडकष्ट करून हाडाची काडं झाली माझी
अन् बायलीचा भारा डोक्यावरून उतरत नाही.
मास्तर ,
लेकराला लिहिता-वाचता येत नाही,
अन् काऊन तुम्ही ध्यान देत नाही.
मास्तर!
तुम्ही म्हणे खुर्चीत बसून शिकवतुया,
अन् मले बसाया टाईम नसतुया!
धुरामागे धुरा पायाला लागते गती, तरी माझा जीव रिता,
अन् याच तुम्हाला भान नाही .
मास्तर!
लेकराला लिहिता-वाचता येत नाही
अन् काऊन तुम्ही ध्यान देत नाही.
मास्तर!
धर्म -राजकारणाशी माझं देणेघेणे नाही,
अन् तुम्हीही शिकवा फकस्त लोकशाही
हे फाटाफुटीच...
अन् ते गटातटाच धोरण तुमचं नेक नाही!
मास्तर!
लेकराला लिहिता-वाचता येत नाही
अन् काऊन तुम्ही ध्यान देत नाही.
मास्तर!
शेवटी एकच सांगतो,
लेकरू माझं,तसं तुमचं समजा
त्याच्या विचारात विद्रोह पेरा!
खर्याला खरं अन् खोट्याला खोट म्हणायचं शिकवा!
अन् खरचं मास्तर...
माझं लेकरू जगवा.
-राजा तामगाडगे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सावू! आई तू...
आई, सावू तू थोर ग
स्त्री मुक्तीचा आगाज़ ग!
राब राब राबलीस
चंदनापरी झिजलीस!
जीवनाचे सोनं केले
अनमोल जीवन झाले!
जोतीची झाली ढाल तू
प्रगल्भ विचार दिले तू !
अनाथांची तू माऊली
सत्यशोधकाची सावली!
'सावित्री' तू माझी आई
जोतिबांची खरी कमाई!
- राजा तामगाडगे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
कष्ट करावं!
कष्ट करावं!
घाम गाळावं!
उर फुटावं!
हुंदक्यानं!
दु:ख टाळावं!
सु:ख घोळावं!
वैर तोडावं!
झटक्यानं!
खेळ खेळावं!
माती मळावं!
तू रं जिंकावं!
हरण्यानं!
पाणी पडावं!
रानं भिजावं!
पिकं निघावं!
झरण्यानं!
शाळा शिकावं!
लेख लिहावं!
पेन धरावं!
अंगठ्यानं!
- राजा तामगाडगे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
असावा विश्वास !
ऐकावे जनाचे, करावे मनाचे।
आनंदात नाचे, सर्वजण।। १।।
कृक्तीचा आधार, असावा विचार।
नको दुराचार, जीवनात।। २।।
गणगोत नात, जपावे मनात।
कठीण काळात, दिमतीला।। ३।।
हसत खेळत, रमावे मित्रात।
नको निराशेत रांत्रदिन।। ४।।
जीवन हे खास, का होतो उदास।
असावा विश्वास, स्वतः शीच।। ५।।
-राजा तामगाडगे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
'पोशिंदा'
शेत नांगरतो। बीज तो पेरीतो।
सृजन करीतो। भूगर्भात।।
अंधश्रद्धा, रूढी।विषारी मरण।
रच त्याचे सरण । धुरावर।।
चिल्यापिल्यांसाठी । राबतो, कष्टतो।
तुपरोटी खातो। परकाच।।
अस्मानी सुल्तानी। दुष्काळ, संकट।
सदा कटकट। जीवनात।।
पीक बहरते। हालते, डुलते।
स्वप्न दाखविते । नवलाई।।
शेतकरी जीव। चक्राकार फिरे।
हातावर उरे। पोट का बां।
जगाचा पोशिंदा। दिलदार राजा।
देऊ नका सजा। राबत्यास।।
- राजा तामगाडगे
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .