काव्यफुले : कवयित्री जया नेरे यांच्या कविता..

शालेयवृत्त सेवा
0

 



काव्यफुले : आजच्या सदरात..
 ◼️कवयित्री सौ.जया नेरे
       शिक्षिका, नवापुर जि.नंदुरबार
        9423918363

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


आम्ही शिक्षक 

शाळेसाठी जगणे आता
शाळेसाठीच मरण असे
शाळा हेच धर्म कर्म अन्
शाळा आमुचे दैवत असे

मुले फुले अन् खडू फळा 
नित्य आमुच्या ध्यानी वसे
ग म भ न शिकवून त्यांना
संस्कारांचे उमटवू ठसे

प्रेम भाव अन् वात्सल्याचा
वाहतो जिथे नित्य झरा
लेकरांसाठी होतो माऊली
मिळे येथे नित्य आसरा

शूरवीरांच्या कथा सांगूनी
देशभक्ती जागवतो मना
निर्भयतेचे धडे देवूनी
घडवतो त्यांच्या जीवना

हवे नको ते समजून घेतो
कला गुणांची जाण ठेवतो
प्रत्येकास देवून संधी
सर्वांगांनी मुलं फुलवितो

- सौ.जया नेरे


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


असे अमुचे शिक्षक 

प्रेम जिव्हाळा माया ममता असते ज्यांच्या 
ठायी
नित्य ठेवितो स्मरण तयांचे नमितो त्यांच्या पायी
संस्कारांची असते मुर्ती किर्ती त्यांची महान
जेव्हा मिळते शिकवण त्यांची मिटते अमुची तहान

मुले फुले अन् खडू फळ्याची असते त्यांना गोडी
नसे लालसा मनी कोणती नसे स्वार्थ अन् खोडी
शूरविरांच्या कथा सांगुनी जागवी देशभक्ती
धडे देवुनी निर्भयतेचे भरतो तनात शक्ती

अन्यायाची चीड असावी व्हावे तुम्ही छावा
द्यावी टक्कर दुश्मनास मग ओळखुनीया कावा
विसर कसा मग पडेल त्यांचा हृदयी जपतो ज्यांना
आयुष्यातील वळणावरती आठवते मी त्यांना

- सौ.जया नेरे



▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️



दुरावलेली शाळा

दुरावलेली शाळा
रूसलेला तो फळा
गाणी,गप्पा गोष्टींना
मुकलाय तू बाळा

नव्हता ऐकला गजर
पटावर कोणी हजर
मुलांवरून फिरणारी
नव्हती मायेची नजर

पुस्तकांना गोंजारणारे
दिसत नव्हते कोणी
गुरूविना कसे बर
होऊ आम्ही ज्ञानी?

दप्तर बसलेय लपून
वह्यांना ठेवलय जपून
कंटाळलेय ते ही आता
पण घेत होते खपून

चिंचा बोर आवळ्यांची
झाड ही होती ओकी
दगड मारून त्यांची कोणी
फोडत नव्हती डोकी

शाळेच्या भिंतींनाही
लागली मुलांची ओढ
भिंतीवर चित्र काढायची
दिसत नव्हती चढाओढ


सौ.जया नेरे

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


ज्ञान दान

ओंजळ भरुनी
द्यावे ज्ञान दान 
कार्य करावे हे
तुम्हीच महान

उत्कर्ष करावा
गोर गरीबांचा
घ्यावा हो आशिष
प्रत्येक मनाचा

देवच होता हो
सान ह्या मुलांचे 
मायबाप तुम्ही
लहान जिवांचे

दिशा देण्या तुम्ही
जिवनास त्याच्या
केले हो सार्थक
जन्माचेच त्याच्या

हातुन तुमच्या
हे पुण्य घडावे
सत्कार्मास असे
ओंजळीत घ्यावे


- सौ.जया नेरे


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


शिक्षक

कुठे ठाऊक होती त्याला
होळी आणि दिवाळी
नवनवीन आव्हानांची
झेलत होता गोळी
सर्व करत करत 
होत होती दमछाक
गुणवत्ता आणि कागदपत्र
याने पाठीवर आले बाक
विद्यार्थी समोर येताच
विसरायचा सारे भान
त्यांच्या कडूनच मिळायचा
त्याला पूरेपुर मान
चिमण्या पाखरांचा
त्याला लागला होता लळा
म्हणूनच डोळ्यासमोर दिसायचा
विद्यार्थी आणि फळा
कोवळ्या जिवांची कुणी
बनवलीय प्रयोगशाळा
फुलू द्या ना आनंदाचा
फक्त येथे मळा
ताणतणावाखाली राहून
आरोग्य गुरूजींचे बिघडले
त्यात आता शिक्षणातही
राजकारण घडू लागले
योग्य तिथे योग्य त्याला
न्याय कुठे मिळतोय
स्वतःच्या नावासाठी
कित्तेकांच्या पाय पडतोय
बिघडलेली घडी आता
होईल कधी नीट
मिळेल का कुठे अशी
लावायला याला तीट
आर्त हाक शिक्षकाची
ऐकेल ना प्रशासन 
की फक्त त्याच्यासाठी
असेल फक्त शासन....
आणि फक्त शासन....

- सौ.जया नेरे


▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)