शिक्षक या शब्दाची व्याप्ती फार महान आहे. ती सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला तर शब्द ही अपुरे पडतील.थोडक्यात आपण एवढेच म्हणूत की, शिक्षक म्हणजे अथांग ज्ञानमय सुसंस्काराचा सागर होय.
गुरु हे पूर्वीचे शिक्षक. गुरु हे शिक्षक या शब्दाचे आदरयुक्त नाव. जिथे संत महात्मे, थोर नेते, विचारवंत,आजही नतमस्तक होतात,असे बहुमोल व्यक्तीमत्व शिक्षक या शब्दाला लाभलेले आहे.
विश्वात सर्वश्रेष्ठ असणारे ज्ञान हे फक्त शिक्षकांकडून च आपल्याला मिळत असते. म्हणून शिक्षक हे महान व्यक्तीमत्व मानल्या जाते.
म्हणून संत कबीर म्हणतात,
गुरू बिन ज्ञान उपजै। गुरु बिन मिलै न मोष।
गुरु बिन लिखै न सत्य को।
गुरु बिन मिटै न दोष।
या पदामधून संत कबीर यांनी शिक्षक तथा गुरु या पदाची महानता दर्शविली आहे.
आज ५ सप्टेंबर. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा दिन 'शिक्षक दिन' म्हणून आपण साजरा करीत असतो. त्या निमित्त सर्व शिक्षक बांधवांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा..
यानिमित्ताने शिक्षक या ज्ञानरुपी दीपस्तंभावर टाकलेला प्रकाश माझ्या लेखनीतून सादर आहे.
शिक्षक हा समाजाचा अभियंता मानल्या जातो. तो नवसमाजासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी आदर्श नागरिक तयार करण्यात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. असे म्हणतात, एक डॉक्टर रोग्यावर उपचारादरम्यान चुकला तर फक्त एक रोगी दगावतो. एक स्थापत्य अभियंता चुकला तर फक्त एकच ईमारत कोसळते. पण एक शिक्षक जर चुकला, तर एक पूर्ण पिढी बरबाद होते. म्हणून शिक्षक हे अतिशय महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांनाच शिकवतो असे नाही तर समाजातील विविध प्रकारच्या समस्यांचे बारकाईने तो निरीक्षण करत असतो.आणि अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धा आणि समाजातील विषमता यांच्या चक्रव्यूहाच्या अंधारातून त्यांना प्रकाशाकडे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षक पार पाडीत असतो.
शिक्षकाची व्याख्या आहे की शि- शिलसंपन्न व शिस्तीचे पालन करणारा, क्ष-क्षमाशील आणि कर्तव्य दक्ष असे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणजे शिक्षक होय.
शिक्षक म्हणजे समाजातील बालमनावर सुसंस्कारांची बिजे पेरून विकसित देशासाठी आदर्श नागरिकांचे भरभरून पीक आणणारा शिक्षकरुपी माळी होय.
आपले कर्तव्य बजावतांना तो मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडीत असतो. राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत असतो. त्यात वेगवेगळ्या प्रकारची कामे उदा.जनगणना, निवडणूक कार्यात सहभाग, आणि सध्याच्या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून 'कोव्हिड योध्दा' म्हणून महत्त्वाची कामगिरी पार पाडली.
म्हणून शिक्षकांचे व्यक्तीमत्व सर्वांसाठी अनुकरणीय असते. विद्यार्थी शिक्षकांच्या बारीक गोष्टींचे निरीक्षण करत असतो. आणि त्याचे अनुकरण करत असतो. त्यात, वागणे, चालणे, बोलणे, लिहणे, विविध वर्तन,राहणीमान,शिकविणे या सर्वच गोष्टीचे अनुकरण तो करत असतो.
शिक्षकाने दैववाद, अनिष्ट रुढी, अंधश्रद्धा यापासून दुर राहिले पाहिजे. कारण शिक्षकावर समाजाचा फार मोठा विश्वास असतो.म्हणून शिक्षकांनी आपल्या आचरणात विज्ञानवाद जोपासला पाहिजे. विज्ञानवादातूनच देशाची प्रगती होत असते. विज्ञानवादी विद्यार्थी चिकित्सक असतो, तो सत्यशोधक बनतो.त्याची निर्णय शक्ती दांडगी असते.त्याचा आत्मविश्वास वाढतो. तो राष्ट्रभक्ती जोपासतो आणि विषमतेपासून दुर राहतो. यातूनच आदर्श पिढीचे दर्शन घडते.
गुरु शिष्य म्हणून या महान युगपुरुषांचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. छत्रपती शिवरायांना संत तुकाराम महाराज गुरुस्थानी लाभले. तर महात्मा फुले यांना छत्रपती शिवराय हे गुरुस्थानी लाभले.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा फुले हे गुरुस्थानी लाभले. आणि त्यांची जगाच्या ईतिहासांनी नोंद घेतली. हा आदर्श आपल्या समोर असायला हवा.
शिक्षण ही एक देवाणघेवाण पध्दती आहे. शिक्षक ज्ञान देणारा आहे, तर विद्यार्थी ज्ञान घेणारा आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये त्यांनी त्यांची कर्तव्य पाळली पाहिजे. तेव्हाच त्यांना त्यांचे फळ मिळेल. म्हणून याविषयी संत कबीर म्हणतात,
गुरु नाम है गम्य का। शीष सीख ले सोय।
बिनु पाद बिनु मरजाद नर।
गुरु शीष नहि कोय।
शिक्षक आणि विद्यार्थी यांचे कर्तव्य कसे असावे याविषयी एक कथा आहे.
ग्रिक राजा मिलिंद यास आपल्या ज्ञानाचा फार गर्व होता. वादविवाद करण्यात तो पारंगत होता. दूर दूरच्या देशाचे मोठमोठे राजा,राजपुत्र,सम्राट विद्वान हे त्याने वादविवादात हरवले होते. तो प्रश्न विचारुन प्रतिस्पर्ध्यास निरुत्तर करीत असे. त्याच्या ज्ञानाची ख्याती दुरवर पसरली होती. पण त्याला हरवणारा एकही वरचढ वादविवादपटू त्यास मिळाला नाही.
ही बातमी भिख्खू नागसेन यास कळाली. आणि हे आव्हान त्याने स्वीकारले. जेव्हा राजा मिलिंद आणि भिख्खू नागसेन यांचा वादविवाद सुरु झाला. तेव्हा हा प्रश्नोत्तराचा वादविवाद बराच काळ चालला. मिलिंद राजा प्रश्न विचारीत असे आणि नागसेन सकारण आणि उदाहरणासह उत्तर देत असे. आणि समाधान करीत असे. असे अमाप प्रश्न विचारुन राजा मिलिंद थकला.आणि तो नागसेनला शरण आला.
शेवटी मिलिंद राजाने भिख्खू नागसेनचे गुरुत्व पत्करले.
यावरून एवढेच सांगावसं वाटते. शिक्षक हा नागसेनासारखा असावा आणि विद्यार्थी हा मिलिंद राजासारखा असावा.
आजच्या दिनी माझ्या जीवनात वंदनीय गुरु म्हणून ज्यांचे प्रत्येक्ष किंवा अप्रत्यक्ष मला बहुमोल योगदान लाभले, अशा सर्व गुरुंना आज नतमस्तक होऊन वंदन करतो. आणि माझ्या लेखनीला विराम देतो.
-बाबुराव पाईकराव
(सहशिक्षक)
डोंगरकडा
9665711514
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .