आजचे सदर : गझल आपल्या भेटीला
◾गझलकार चंद्रकांत कदम ( सन्मित्र )
नांदेड , भ्रमणध्वनी 9921788961
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1️⃣
आहे जरीही मी गुणांची खाण मित्रा
दुनिया मला करते किती हैराण मित्रा
तडजोड का करतोस कायम अस्मितेशी?
का व्हायचे आहे तुला 'अफगाण' मित्रा?
माघार तू माझी नको समजू पराजय
करणार मी आहे पुन्हा उड्डाण मित्रा
कौतूक कोणाचे तुला नाही जमू दे
सोडू नको कोणावरी वाग्बाण मित्रा
अपुल्यातले झुंजारपण गमवायचे का?
जग जाहले तर होऊ दे निष्प्राण मित्रा
होईल शेवट आपला साधासुधा की
की आपले होइल महानिर्वाण मित्रा?
स्पर्धा चुरस ईर्ष्या नको तितकी कशाला?
जर शेवटी माझी तुझी धुळधाण मित्रा
- चंद्रकांत कदम (सन्मित्र)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
2️⃣
नव्हतेच कधीही इतके का चित्र विदारक आहे?
का भलेपणाच्या जागी माजले अराजक आहे?
गझलेत सारखी माझ्या समता मानवता कारण
मी धर्म उपासक नाही 'सद्धम्म' उपासक आहे
अक्षम्य गुन्ह्यांसाठी तो तात्काळ सजाही देतो
हा निसर्ग बहुधा कोणी निष्णात प्रशासक आहे
विद्वेष असूया मत्सर एवढे त्यात भरले की
अण्वस्त्रांपेक्षा झाला माणूस विनाशक आहे
कौतूक केवढे तुजला भाबडेपणाचे त्याच्या?
तो भलाच वरुनी दिसतो आतून महाठक आहे
आजन्म उभ्या दुनियेला पारखूनही समजेना
माणूस विधायक कुठला कोणता विघातक आहे?
सुटणार हात आयुष्या एवढ्यात नाही कारण
जगण्याचे तितके माझ्या दमदार कथानक आहे
- चंद्रकांत कदम (सन्मित्र)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
3️⃣
मी रंग माझा लख्ख काळा ठेवतो
पण हुंदक्यांसाठी उमाळा ठेवतो
दुनिये तुझ्या पोटातले समजायला
पोशाख मी कायम गबाळा ठेवतो
असतो जवळच्या माणसांमध्ये जसा
परक्यातही तितका जिव्हाळा ठेवतो
भेटेल त्याला पावसाळा वाटुनी
पदरात मी माझ्या उन्हाळा ठेवतो
नाही स्वतःला आमचा अंदाज पण
आम्ही जगाचा ठोकताळा ठेवतो
वरवर उन्हाळ्यासारखा दिसतो तरी
हृदयात कायम पावसाळा ठेवतो
तू एकटक माझ्याकडे पाहू नको
डोळ्यांमधे मी वेधशाळा ठेवतो
रुजवायला समता निखळ माणूसकी
हृदयात मी हमखास शाळा ठेवतो
नजरेत माझ्या नांदतो सिद्धार्थ पण
धमन्यांत मी माझ्या पन्हाळा ठेवतो
दिसतो जरीही चारचौघांसारखा
अंदाज मी माझा निराळा ठेवतो
- चंद्रकांत कदम (सन्मित्र)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
4️⃣
कोणती व्यथा समजेना बिलगून उराशी आहे
मन भरलेले आहे पण काळीज उपाशी आहे
अंधाराला चिरणाऱ्या सूर्याची उत्पत्ती मी
दुनियेस बोचतो कारण मी स्वयंप्रकाशी आहे
येईल रिकामा जो तो जाईल रिकामा कारण
बुडणाऱ्या नावेमधला माणूस खलाशी आहे
दिसणार कधी कुणब्याच्या शेतात चित्र हे सांगा?
झोकात तूर आहे अन तोऱ्यात कपाशी आहे
निर्धास्त व्यवस्थेचे ह्या काहीच बदलले नाही
श्रीमंतांसाठी येथे गरिबांना फाशी आहे
जो तो आहे जगण्याच्या स्पर्धेत धुंद इतका की
चिंताच कुणाला नाही आयुष्य विनाशी आहे
मी व्यर्थ कोणत्याही का वारी तीर्थाला जाऊ?
परिवारच माझ्यासाठी जर काबा काशी आहे
मतलबी माणसांशी ह्या जेवढा दुरावा माझा
तितकाच जवळचा माझा संबंध नभाशी आहे
तू नकोस वरवर त्याच्या चांगूलपणावर जाऊ
संतुष्ट दिखाव्याला तो आतून अधाशी आहे
पटणार कधीही नाही सावली तुझ्याशी कारण
आजन्म नाळ जुळलेली झुंजार उन्हाशी आहे
जाज्वल्य कुळाचा माझ्या इतिहास वाचल्यानंतर
धजणार म्हणाया कोणी मी अक्करमाशी आहे?
- चंद्रकांत कदम (सन्मित्र)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
5️⃣
मनीमानसी फक्त ज्यांच्या कपट
तरी लोक म्हणतात 'ते' भोळसट
तुझा सावलीशी घरोबा तरी
तुला आतला गर मला फोलपट?
भुकेल्यास भरवू चला भाकरी
दिल्याने म्हणे लाभते चारपट
किती भोगुनीही कुठे संपते?
किती हाव आहे तुझी हावरट
स्वतःच्याच मस्तीत मी चालतो
म्हणा सांब कोणी म्हणा रासवट
अवस्था मनाच्या किती वेगळ्या?
कधी पोक्त असते कधी पोरकट
जसा बुद्ध कळतो तसे युद्धही
मला फार समजू नको नेभळट
हवे तर मला आजमावून बघ
ढिला जेवढा तेवढा मी चिवट
अशी साथ अर्ध्यात सोडू नको
तुझ्याएवढी ना कुणाशी लगट
कुण्या सांग थांबेल वळणावरी?
उभ्या जिंदगीची ससेहोलपट
- चंद्रकांत कदम (सन्मित्र)
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
कदम सर खुपच छान.तुमची गझल समग्र मानवतेला कवेत घेणारी आहे.
उत्तर द्याहटवाखुप छान👏✊👍 सर
उत्तर द्याहटवा