विशेष प्रतिनिधी : उदय नरे याजकडून -
उमरगा तालुक्यातील जगदंबानगर, कडदोरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले उपक्रमशील तथा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश रघुनाथ खोसे यांना राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळल्याने कडदोरा ग्रामस्थ व जगदंब प्रतिष्ठान कडदोरा यांच्या वतीने सपत्नीक बैलगाडीतुन मिरवणूक काढण्यात आली. तसेच त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गावचे उपसरपंच खंडू बालकुंदे, प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्श रुग्णालय सास्तुर येथील जोशी साहेब, गावातील समाजसेवक अंकुश बापू बालकुंदे, तनिष्का बचत गटाच्या अध्यक्ष सविता रमेश मुगळे, मुख्याध्यापक श्रीराम पुजारी, जगदंब प्रतिष्ठानचे दत्ता बालकुंदे, नितीन साळुंके व इतर मान्यवर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्यदैवत जगदंबेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय आय.सीटी पुरस्कार गावातील जिल्हा परिषद शाळेत काम करणारे उमेश रघुनाथ खोसे यांची सपत्नीक कुटुंबाची ठिकठिकाणी ओवाळणी करत, बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात, लेझीम खेळत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी नवीन कपडे, मुलीनी साड्या घालून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फुलांच्या गलिच्छावरून फुलांच्या उधळणीत त्यांचा प्रवेश घेण्यात आला. तद्नंतर जगदंब गणेश मंडळातील गणपतीची आरती सपत्नीक खोसे यांच्या हस्ते करण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमेश रघुनाथ खोसे यांचा त्यांच्या पत्नी स्वाती खोसे यांच्यासह दिमाखदार सन्मान करण्यात आला. यावेळी जोशी साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खोसे यांनी कडदोरा गावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने केलेल्या कष्टाचे फळ आहे.
उमेश खोसे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आजच सन्मान हा माझ्या जीवनातील सर्वोच्च सन्मान आहे. जेवढा आनंद राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान घेताना झाला होता त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला आहे. कडदोरा गावातील नागरिकांच्या साहाय्याने शाळेच्या विकासात हातभार लागत आहे. हा सन्मान पाहून खरच मी सर्वांसमोर नतमस्तक होतो. त्यांचे दोन्ही पुरस्कार त्यांनी विद्यार्थ्यांना समर्पित केले आहेत. नक्कीच सध्याच्या काळात महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव उदाहरण असेल ज्या गावातील नागरिकांनी शिक्षकाचा एवढा मोठा गौरव केला असेल. त्यांना मिळविलेल्या सन्मानात त्यांच्या बरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांचेही योगदान असल्याचे आवर्जून उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बशीर शेख सर यांनी तर आभार प्रदर्शन खंडू बालकुंदे यांनी केले .


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .