मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक या संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया अत्यंत जलद गतीने व घाईघाईने राबविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून सुरू असून, या प्रक्रियेत शासन निर्णयाचा सोयीस्कर अर्थ लावून TET/CTET उत्तीर्ण सेवाज्येष्ठ शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचा आरोप अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांनी केला आहे.
यासंदर्भात शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार जयकुमार गोरे यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी विधानसभेचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी भेट घेऊन शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये शिक्षण संचालकांनी दिनांक १४ मे २०२६ रोजी काढलेल्या पत्रामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली. सदर पदोन्नती प्रक्रिया राबवताना ग्रामविकास विभागाशी चर्चा करून राबवणे आवश्यक असताना सदर पत्राला ग्रामविकास विभागाने तात्काळ स्थगिती द्यावी.तसेच पदोन्नती प्रक्रिया राबवली जात असताना पदोन्नती समितीच्या बैठकीच्या शेवटच्या दिनांक पर्यंत सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी करावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली
याशिवाय राज्यात विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदासाठी सुरू असलेल्या समुपदेशन प्रक्रियेबाबतही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. विभागीय स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही CTET पात्र उमेदवारांना अभ्यासपूर्वक पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब शिक्षक परिषदेने पुराव्यांसह निदर्शनास आणून दिली.
पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या दिनांकापर्यंत आवश्यक TET/CTET पात्रता प्राप्त शिक्षकांची सेवाज्येष्ठता व गुणवत्ता विचारात घेऊन पदोन्नती देणे हेच प्रशासकीयदृष्ट्या योग्य असल्याचे मत शिक्षक परिषदेने मांडले. याउलट कृत्रिम ‘कट-ऑफ डेट’ निश्चित करून पात्र शिक्षकांवर अन्यायकारक प्रक्रिया राबविली जात असल्याची सविस्तर माहिती शिष्टमंडळाने मंत्री महोदयांसमोर सादर केली.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील प्रचंड व्यस्तता असूनही मंत्री महोदयांनी सुमारे १५ मिनिटांचा वेळ देऊन विषय गांभीर्याने समजून घेतला. सेवाज्येष्ठ TET/CTET पात्र शिक्षक तसेच विभागीय स्पर्धा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवूनही अन्यायाला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांच्या प्रश्नांबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली तसेच पदोन्नतीशी निगडित ग्राम विकास विभागाने प्रसिद्ध केलेली १८ जुलै 2025 रोजीची अधिसूचना तसेच पदोन्नतीशी निगडित इतर सर्व बाबी तपासून घेतल्या जातील व योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा आशावाद ग्रामविकास मंत्री यांनी व्यक्त केला.
सेवा जेष्ठ शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच गुणवत्ता यादीत येऊनही केंद्रप्रमुख पदोन्नती पासून वंचित असलेल्यांना न्याय मिळण्यासाठी शिक्षक परिषदेने आपला लढा अधिक तीव्र केला असून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत शिक्षक परिषद हा लढा लढत राहणार असल्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे
या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) चे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे, कोकण विभागीय अध्यक्ष गणेश पोतदार तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी यांचा समावेश होता.अशी माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी दिली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .