माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन..

शालेयवृत्त सेवा
0

          


उद्घाटनप्रसंगी राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गेल्या दीड वर्षात शाळा बंद असतांना ऑनलाईन व ऑफ लाईन पद्धतीने मुलांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून शालेय शिक्षण विभागाने केलेले विविध उपक्रमांची चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शित केले .


मुंबई ( विशेष प्रतिनिधी उमा ढेरे ) :                          

शालेय शिक्षण विभागामार्फत राबविले जाणारे “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ  मा. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू,शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या अपर मुख्य सचिव मा.वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त मा.श्री. विशाल सोळंकी, राज्य प्रकल्प संचालक श्री. राहुल द्विवेदी व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. एम.डी.सिंग तसेच  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुहास प्रभू उपस्थित होते.


                         “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या  उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या अपर मुख्य सचिव मा. वंदना कृष्णा यांनी केले. प्रास्ताविकेमधून त्यांनी मागच्या दीड वर्षात जेव्हा शाळा बंद ठेवाव्या लागल्या  तेव्हा ज्या विविध माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आले त्याबद्दल थोडक्यात माहिती देवून आता विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या संपादणूक  वृद्धीसाठी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी”या अभियाना अंतर्गत केलेल्या सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याबद्दलची संकल्पना स्पष्ट केली.  या प्रसंगी  मुलांनो शाळेकडे चला  असा संदेश देणारी “चला मुलांनो चला” हि सुंदर चित्रफित  प्रदर्शित करण्यात आली .


                        या प्रसंगी उपस्थित असणारे  टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडचा धोका काही अंशी कमी झाल्याने देशाचे अर्थचक्र जसे सुरु असायला हवे तसेच शिक्षण घेण्याचा हक्क असणाऱ्या मुलांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ आहे. अशा उचित वेळी निर्णय घेतल्याबद्दल त्याबद्दल त्यांनी मा.मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे अभिनंदन केले.सतत घरी  राहिल्यामुळे  मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या भावनिक,मानसिक समस्यांवर परिणामकारक उपाय म्हणजे शाळा सुरु करणे. त्यासाठी  टास्क फोर्सने तयार केलेल्या SOP प्रत्येक शाळेपर्यंत पोहचविण्यात आल्या आहेत. त्याचे शाळांनी आणि समाजातील प्रत्येक घटकांनी पालन करून “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. 


                   या अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांनी आपल्या मनोगतात गेल्या दीड वर्षात  शाळा बंद असतांना ऑनलाईन व ऑफ लाईन पद्धतीने मुलांच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून शालेय शिक्षण विभागाने केलेले विविध उपक्रम प्रथम एक चित्रफितीच्या  माध्यमातून  प्रदर्शित केले.त्यांनी या प्रसंगी  मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले की गेल्या दीड वर्षात शाळा सुरु करण्याबाबत,मुलांच्या शिक्षणाबाबत त्यांनी अनेकदा सभा घेवून मार्गदर्शन केले त्यामुळेच आज शाळा सुरु करण्याचा निर्णय आपण घेवू शकत आहे. आज  ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहे. टास्क फोर्स ने दिलेल्या मार्गदर्शक सुचानाचे पालन करून मुलांचे शिक्षण शाळेंमधूनच निरंतर सुरु राहावे या साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी सर्वाना केले. मा. मुख्यमंत्री साहेबांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना प्रमाणेच माझे विद्यार्थी माझी जबाबदारी हे अभियान यशस्वी करू असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.


           या प्रसंगी “माझे विद्यार्थी माझी जबाबदारी” या अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यानंतर  विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सातत्यपूर्ण आराखडा कसा असेल याबाबत चित्रफितीच्या  माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.


           आपल्या उद्घाटनीय भाषणांत बोलत असतांना मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी शाळेची घंटा,शाळेचा पहिला दिवस,नवी पुस्तके,नवा गणवेश आणि नवीन शिक्षकांना भेटण्याची उत्सुकता या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.   त्यांच्या मते सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काळ आता सुरु झाला आहे. इतके महिने घरात बंद असलेले विद्यार्थी आता नव्या जोमाने,नव्या उमेदीने पुनश्च एकदा शाळेत येतील तेव्हा त्यांच्या आरोग्याची,सुरक्षिततेची काळजी घेत या मुलांना घडविण्याचा व घडण्याचा काळ आता सुरु होत आहे. शाळा हे भविष्याचे प्रवेशद्वार आहे. असे म्हणत त्यांनी शिक्षक,मुख्याध्यापक यांच्यासोबत शाळा व्यवस्थापन समिती,पालक व समाजातील सर्व घटकांना आव्हान केले की देशाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर माझे विद्यार्थी माझी जबाबदारी हे  अभियान सर्वांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी टास्क फोर्सने  स्वच्छे संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून कोरोनाने शिकविलेले आरोग्यदायी जीवन आपली जबाबदारी हे  लक्षात ठेवूया आणि भविष्याचे आधारस्तंभ असलेल्या मुलांसाठी एकत्रित राहून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.


                  कार्यक्रमाचा समारोप शिक्षण आयुक्त मा.श्री विशाल सोळंकी यांनी आभारप्रदर्शन करून केली या प्रसंगी ते बोलत असतांना म्हणाले की सदर कार्यक्रमा मध्ये राज्यातील सर्व शिक्षण यंत्रणेसोबत अनेक पालक सुद्धा सहभागी झाले आहेत.  याप्रसंगी त्यांनी सर्वाना आवाहन केले की विद्यार्थ्याचे मागील दीड वर्षात झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्याची ही आपल्याला योग्य वेळी मिळालेली संधी आहे. या संधीचा आपण उपयोग करीत मुलांना पुन्हा शाळेकडे वळवूया.माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)