क्रांतिज्योती: नव्या सृजनशीलतेला सुरेख आविष्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



▪️"कवितेशी नाते जोडणे म्हणजे अग्या मोहळाच्या पोळात मुंडकं खुपसणे."मधमाशीचे डंख आयुष्यभर अंगभर मायेनं जोपासणं.माझी मान्यता अशी असल्याने अनुभवाची उसनवारी करण्याची गरज माझ्या कवितेला कधीच पडली नाही.अभिव्यक्तीसाठी माझा भोवताल इतका सुपीक आहे की,मी उभी ह्यात जरी खर्ची घातली,तरी त्याची शंभर टक्के मांडणी अशक्य.कविता कळायला लागली.नंतर कागदावर उतरायला लागली.मीच माझा वाचक,मीच माझा परिक्षक.ही भुमिका आहे जेष्ठ कवी अजीम नवाज राही यांची.प्रत्येक कवीची हीच भुमिका असायला पाहिजे.हीच भूमिका घेऊन वर्धा येथील विचारवंत,एकपात्री प्रयोग करणा-या,वक्त्या, कवयित्री मा.सुषमा पाखरे यांनी नुकताच संपादित प्रातिनिधिक कवितासंग्रह "क्रांतिज्योती" नुकताच वाचून काढला.शिक्षणाची ज्योत ज्यांनी पेटवली...अशा कवयित्री ,प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा प्रातिनिधिक कवितासंग्रह आहे.


▪️अस्तित्वाचा दीप उजळून बघणा-यांना 

मला लिहिता येवू लागली आहेत

सुखदुःखाची अक्षरे

मला ओलांडता आलाय माझ्या मनाचा उंबरा

मला जपून राखता येतो उजेड

सावित्रीमाय...

तेव्हा तू त्यांच्या हातात

 लेखणी दिलीस नि

त्यांच्या मनात प्रकाशाचं बी

रूजवल॔स म्हणून..!


▪️सावित्रीआईमुळेच मला सुखदुःखाची अक्षरे लिहिता आली...माझ्या मनातील नकारात्मक विचार जाऊन जगण्यासंबंधी सकारात्मक विचार करता आला...तो केवळ आणि केवळ सावित्रीआईमुळेच..!या अक्षरलेण्यामुळे मला अक्षरांच्या गावात जाता आले.माझे आयुष्य लख्खपणे उजाळले. ते केवळ सावित्रीआई तुझ्यामुळेच..!


▪️युगायुगांची गुलाम स्त्री मी

तुझ्यामुळे आज मुक्त झाले

अनिष्ट परंपरेचे साखळदंड 

एका क्रांतिज्योतीमुळे तुटले.


▪️ही 'सावित्रीमाई' कविता आहे.जेष्ठ कवी अरूण विघ्ने यांची.क्रांतिज्योतीमुळे युगायुगांचा अंधार क्षणात नाहिसा झाला.तो केवळ सावित्रीआई यांचे शिक्षणामुळे. परंपरा,रूढी यांचेविरूध्द बंड पुकारले...शेण,माती,घाणेरड्या शिव्या तिचे मनोबल खचले नाही...कारण ती युग स्त्री होती.त्यामुळेच आजची स्त्री उंच भरारी घेत आहे.प्रा.मिनल येवले व अरूण विघ्ने यांच्या कवितेचा समान धागा येथे प्रतिबिंबीत झालेला आपणास दिसेल.


▪️किती युगे प्रात:काळी 

अंधारालाच पूजाल?

किती युगे देव्यांनो, 

गाभा-यातच कुजाल?


▪️असा सडेतोड प्रश्न व्यवस्थेला विचारणारा विद्रोही कवी अशोक बुरबुरे यांची कविता मनाचा ठाव घेणारी आहे.तितकीच ज्वलंत जाणिवेची आहे.कधीपर्यंत गाभाऱ्यातच कुजाल..?हा प्रश्न आजही वर्तमानात फार महत्त्वाचा आहे.याचा शोध आणि बोध आजच्या शिकलेल्या भगिनी घेतीलच...तेच या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे उद्दिष्ट आहे...असे मला समीक्षक या नात्याने वाटते...!

▪️संस्कृतीची गरज म्हणून ...

मारतात वडाला फे-याही

पुढच्या जन्माच्या आरक्षणासाठी

ज्योतिबा -सावित्रीच्या मुली


ही सुरेख कविता आहे जेष्ठ कवी वैभव सोनारकर यांची.आजच्या स्त्रियांनी शिक्षण घेतले ...पण ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे विचार कृतीत उतरवित नाही...त्यामुळेच आजची स्त्री व्रत वैकल्ये यात अडकलेली आहे.कवी यावर कवितेच्या माध्यमातून जोरदार प्रहार केलेला आहे.


▪️आई तुझ्यामुळे आम्हा

मिळे जगामध्ये मान

तूच दिलेल्या लेखणीने

झालं जिंदगीचं सोनं.


▪️सुप्रसिद्ध कवी संजय गोडघाटे यांची ही अतिशय सुंदर अशी कविता आहे.सावित्रीआईमुळेच आमच्या जिंदगीचं सोनं झालेले आहे.ही सुरेख अशी प्रतिमांची पेरणी केल्याबद्दल कवींचे मनापासून अभिनंदन..!


▪️सावित्री कमाई

शिक्षणाची आई

कुणाचेच काही

येथे नाही !


▪️हा सुंदर अभंग कवी प्रशांत ढोले यांचा आहे.'अभंग सावित्रीचे ' या अभंगात सावित्रीआईचे जीवन रेखांकन केलेले आहे.हा प्रातिनिधिक कवितासंग्रह अनेक कवितेमुळे दर्जेदार झालेला आहे...याचे श्रेय संपादिका सुषमा पाखरे यांना जाते...त्या अभिनंदनास पात्र आहेत.


▪️सावित्रीच आई

शिक्षण जननी

मुले,मुली ज्ञानी

तुझ्यामुळे!


▪️हा सुरेख असा अभंग कवी प्रकाश जिंदे यांनी लिहलेला आहे.हे शब्द वाचकांच्या ह्रदयाचा ठाव घेतात.


▪️लेखणीत माझ्या आले बळ

लिहिली सावित्रीआई तुझी गाथा

तुझ्याच चरणी झुकत राहो

इथल्या प्रत्येकाचा माथा!!


▪️सावित्रीबाई ही कविता कवयित्री रत्ना मनवरे यांनी अतिशय गंभीरपणे लिहलेली आहे.


▪️धन्य माई स्त्री जन्म घेतला

मान,सन्मान मिळाला खरा

अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाविला 

खळखळ वाहतो शिक्षणाचा झरा.


▪️ही कविता आहे कवयित्री सौ.वंदना महेंद्र धाकडे यांची स्त्रीचा जन्म घेऊन क्रांतिज्योती सावित्रीआईमुळेच मी धन्य झाली.शिक्षणाचा विचार घेतल्यामुळे आज स्त्रियांची प्रगती प्रत्येक क्षेत्रात होत आहे.


▪️ज्योतिबांची धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांचे काव्यरूपाने व लेखकरूपाने लिखाण होते. व या लिखाणाला साहित्यीक लिखाण म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाही.सावित्रीबाईच्या आग्रहाने व प्रेरणेने श्री.वाळवेकरांनी स्त्रियांकरिता त्या काळात 'गृहिणी नावाचे मासिक चालविले होते.त्यात सावित्रीबाई टोपणनावाने लेख लिहित असत.काळाच्या उदरात गडप झालेल्या या सर्व लेखांची माहितीही आता उपलब्ध नाही पण सावित्रीबाईंना कवयित्री म्हणता यावे इतपत त्यांच्या कविता संग्रहरूपाने प्रसिद्ध आहेत.सावित्रीबाई तशा प्रसिद्धीपासून दूर होत्या.आपले छायाचित्रसुध्दा त्या सहसा काढू देत नसत.त्याचे समग्र वाड्रमय प्रसिद्ध झालेले आहे.


सावित्रीबाई फुले यांचा 'काव्यफुले' हा प्रथम कवितासंग्रह 1854 मध्ये प्रकाशित झाला.यात शिक्षण, जातिभेद, बळीस्रोत, बालकांना सदुपयोग या सामाजिक आशयाच्या कविताबरोबर 'जाईची कळी' व 'गुलाबाचे फूल ' अशा निसर्गरम्य कविताही आहेत.


▪️समाज कार्यास!

घेतले वाहून!

ज्ञानाने न्हाऊन

ओतप्रोत!


▪️हा देखणा अभंग सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे यांचा आहे.सावित्रीआईचे कार्य मोठ्या कुशलतेने अभंगात उतरविले आहे.


▪️कर्मकांड अंधश्रद्धेला न कधी जोपासले तू.

शिक्षण जागृतीसाठी अपुले आयुष्य वेचले तू.


▪️या काव्यओळी आहेत प्रा.प्रशांत बोर्डे या कवीच्या आहेत.शिक्षण घेतल्यानंतर मनुष्य अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही.सावित्रीबाई यांनी शेण,माती,चिखल यासाठीच अंगावर घेतले की...बहुजन स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून..!


▪️शेणामातीचे वार तू

हसून सोसले नसते

तर आम्ही कधीच 

आभाळी झेपावलो नसतो.


▪️ही सुरेख काव्य रचना खान असमा (धारणी) यांची आहे.सावित्रीबाई यांचा शिक्षण वसा नि वारसा येथील स्त्रिया मोठ्या धैर्यशीलतेने चालवित आहे.


▪️महाराष्ट्र, गुजरात, हैद्राबाद,बंगलोर इ.अनेक ठिकाणाहून कविता"एक वार कवी वार,साहित्य समुह, वर्धा,"यांनी आयोजित केलेल्या विषयावर "सावित्रीबाई "अनेक दर्जेदार कविता आलेल्या होत्या.त्यांचे प्रातिनिधिक कवितासंग्रह काढण्याची इच्छा कवयित्री सुषमा पाखरे यांनी बोलून दाखविली.तो प्रातिनिधिक कवितासंग्रह म्हणजेच "क्रांतिज्योती" होय.यात एक वार कवी वार साहित्य समूह यांचे मार्गदर्शन करणारे अरूण विघ्ने,संदीप धावडे,डाॅ.सुनिता भुरकंडे,प्रा.अभय दांडेकर, प्रकाश जिंदे,प्रशांत ढोले,सुषमा पाखरे,प्रकाश बनसोड इ.मान्यवर मंडळीचे सहकार्य लाभले म्हणूनच हा प्रातिनिधिक कवितासंग्रह आपल्यासमोर उभा आहे.


▪️प्रस्तावना प्रातिनिधिक.संध्या राजूरकर (निवासी संपादक-दै.बहुजन सौरभ)यांची आहे.त्या म्हणतात-

"प्रज्ञासुर्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त स्त्रियांना मानवतावादी दृष्टिकोनातून बघितले.महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानले.त्यांची मानवता संविधानातून मांडली आपण सारेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सूर्यकुळाशी नाते सांगणारे आहोत.हा काव्यसंग्रह नव्या सृजनशीलतेचा आयाम नक्की ठरेल. कवी नवोदित असले तरी अभिव्यक्ती नवोदित नाही.ही अभिव्यक्ती सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक क्रांतीची पाऊलवाट निश्चित करेल."


▪️पाठराखण सुप्रसिद्ध साहित्यीक कुसुमताई अलाम यांनी अतिशय गंभीरपणे लिहलेली आहे.त्या म्हणतात-"या संग्रहातून निश्चितच नव्या सावित्रीचा जन्म होईल.हे कार्य सुषमा पाखरे यांच्या संपादनाने घडून येईल. सावित्रीच्या जन्माला जवळपास दोनशे वर्ष होत आहे.तेव्हा आज सुषमा पाखरे करीत असलेल्या कामाने मनस्वी आनंद होत आहे.सावित्रीआई बद्दलची आस्था,प्रेरणा,व सामाजिक तळमळ हे नवे बदल निश्चितच घडून येतील.हेच खरे या पुस्तकाचे यश आहे,यात मुळीच शंका नाही."


▪️"क्रातिज्योती "यात सुरेश साबळे,घनश्याम थुल,नवनाथ ठाकूर, दिलीपचंद्र घोडेस्वार, अॅड. उमाकांत आदमाने, रझिया इस्माईल जमादार, राजश्री वाणी मराठे,अरविंद कदम,प्रणव बनसोड, गितेश गौतम माळी, रजनी प्रभू फुलझेले ,इ.कवी व कवयित्री यांच्या कविता कसदार आहेत.या सर्व कवी व कवयित्री यांना एका सुत्रात बांधले त्या म्हणजे संपादिका सुषमा पाखरे या होय.स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले...त्या स्वातंत्र्याचा आपले दैनंदिन जीवनात अंमलबजावणी केली पाहिजे.सावित्रीच्या लेकींना बळ मिळावं या हेतूने संपादिका सुषमा पाखरे यांनी हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित केलेला आहे.हा प्रातिनिधिक कवितासंग्रह फूलन देवीस अर्पण केलेला आहे.


▪️कवयित्री सुषमा पाखरे यांनी अतिशय घाईगडबडीत हा कवितासंग्रह काढलेला दिसतो.व्याकरणाच्या खुप चुका आहेत.सुरूवात कथ्था रंगाने केलेली आहे...त्याची काही गरज नव्हती.अक्षरांचा फाॅन्ट नाजूक घेतलेला नाही.चित्रकार संजय ओरके सर यांची रेखाटने, मुखपृष्ठ प्रकाश जिंदे ,सावित्रीबाई यांचेवरील दमदार, कसदार कविता या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे जमेची बाजू आहे.यासाठी संपादिका सुषमा पाखरे यांचे मनापासून अभिनंदन..!अद्वय प्रकाशन यांचे मनापासून अभिनंदन..!

***********************************

▪️ क्रांतीज्योती (प्रातिनिधिक कवितासंग्रह )

संपादिका:सुषमा पाखरे

प्रकाशन:अद्वय प्रकाशन, नागपूर 

पृष्ठ:100

 मूल्य:120/-

***********************************

समीक्षक :

प्रशांत नामदेवराव ढोले

श्रावस्ती नगर,पो-सावंगी(मेघे)

ता.जि.वर्धा,442107

संवाद:9923308638

***********************************

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)