"ज्ञान संवर्धन माध्यमिक विद्यालय बोरगाव,तालुका -भोकर, जिल्हा- नांदेड येथील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, शांत संयमी व मितभाषी मुख्याध्यापक श्री देविदास पुंडलिकराव जाधव हे दिनांक ३१ऑक्टोबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांच्या जीवनातील संघर्षांची प्रसंगे ,सुखद आठवणी, एकंदरीत जीवन गाथा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न"
भोकरपासून पूर्वेकडे 15 किलोमीटर अंतरावर पिंपळढव हे एक गाव आहे. गावाच्या जवळूनच वाघू नदी वाहते. नदीला लागूनच एक मोठा पिंपळवृक्ष आहे. गावाचे हे नाव यावरूनच पडले असावे. तसाच पिंपळढवला चारी बाजूने लहान-मोठ्या ओढ्याने वेढले आहे .अनेकदा पुरामुळे गावांचा संपर्क तुटतो. नदी ओलांडली की एका मारुतीचे देऊळ लागते .त्याला आम्ही पार म्हणतो. देवळाच्या पूर्वेकडे पुंडलिकराव जाधव यांचे घर आहे. विठ्ठनाकाचे घर म्हणून पूर्वीपासून पंचक्रोशीत प्रसिद्ध होतं. कष्टाळू व प्रामाणिक, गुरेढोरे, शेती असलेला एक सधन शेतकरी म्हणून गावात मान होता. विठ्ठनाकाला दोन मुले मोठा संभाजी ,संभाजीला तीन मुली व दोन मुलं पुंडलिक व अशोक.
१९६४ सालची गोष्ट उन्हाळ्याचे दिवस होते लोक नेहमीप्रमाणे सकाळी उठून शेतीकडे जायची तयारी करत होते .पहाटे पहाटे बौध्द वाड्यातील एका गोठ्याला आग लागली. सोनकाड्याच्या पेंडीला (चिमणीच्या) दिव्याच्या ज्योतीने पेट घेतल्याचे कारण .आग पेटत गेली. गोट्याला गोठा पेटत गेला .जनावरे, माणसे सैरावैरा पळू लागली. विठ्ठनाकाचेही घर पेटले. घरातील ज्वारी ,डाळी ,साळी भरलेल्या कणग्या नि लादण्या यांचीही राख झाली. माणसे ,बाया, पोरं ,उघड्यावर पडले. त्यात मोठ्ठअसलेले विठ्ठनाकाचेही कुटूंब. अशाच संकटात असलेल्या परिवारात दादा ( देविदास जाधव) अवघ्या वर्षाच्या आत असावेत. पुंडलिक जाधव आणि चांगुणाबाई जाधव यांच्या पोटी १९६४ मध्ये देविदास यांचा जन्म झाला.
बाबा शिकलेले ,समाजात वावरणारे, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. तसे स्थानिक राजकारणामध्ये सुद्धा सक्रीय असलेले पंचायत समिती भोकर व उमरी बाजार समितीचे सदस्य आणि पुढे गावचे उपसरपंच होते. चंद्रकला, शांता, देविदास, रमेश ,विद्या व मिलिंद असे तीन बहिणी व तिघे भाऊ. वडीलांचा व्यवसाय शेती.अशोक जाधव उमरी च्या नूतन विद्यालयातील निवृत्त मुख्याध्यापक आमचे काका .दादा पेक्षा सहा-सात वर्षांनी मोठे त्यांना सारेजण त्यांना जिज्या म्हणत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दादा शाळेत जावू लागले .पिंपळढवच्या प्राथमिक शाळेत 1994 चौथी पर्यंत शिक्षण घेतले. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मातूळ या गावच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले. गावात पिठाची गिरणी नव्हती. सकाळी प्रत्येकाच्या घरात जात्याची घरघर ऐकू यायची. शाळेला जातांना दादा व काकांच्या डोक्यावर दळणाचे पोते द्यायचे.शाळा सुटल्यावर ते पीठाचे पोते घेऊन गावाकडे पायी निघायचे. हायब्रीड ज्वारीच्या बीजाची कापडी पिशवी हीच त्यांची स्कूल बॅग. एकच शर्ट वापरायला, जुनीच पुस्तके, अशा अल्प गरजा त्यावेळी असायच्या.
घरी वडिलोपार्जित जमीन शेती असली तरी फार उत्पन्न व्हायचे नाही. आमचे चुलत आजोबा व बाबा यांच्यात शेती आणि घराच्या बाबतीत भांडणे लागले होते .कोर्टकचेऱ्या मुळे घरची आर्थिक स्थिती आणखी बिघडली होती. बाबांनी अशा परिस्थितीत काका व दादाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.आजी आजोबा यांचे निधन काकाच्या लहानपणीच झाले. त्यावेळी मी जन्मलो हे नसावा. त्यामुळे काकाचे पालक म्हणजेच माय बाबा . अशा दुष्काळाच्या काळात परिसरातील सधन लोकांकडून पैसे ,धान्य व्याजाने आणून एवढा मोठा परिवार , मुलांचे शिक्षण करत संकटाशी सामना केला . मुलांच्या शिक्षण प्रवाहात कसलीच आडकाठी येऊ दिली नाही.सन 1978 मध्ये किनी च्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतून दादा मॅट्रिक परीक्षा पास झाले .नांदेडच्या पीपल्स कॉलेजला काकाने प्रवेश मिळवून दिला . त्या वेळी काका त्याच कॉलेजला शिकायला होते. त्यावेळी त्यांना पंच्याहत्तर रु. शिष्यवृत्ती मिळायची. शिष्यवृत्ती शिक्षणासाठी एक मोठी संजीवनी ठरायची. शिक्षण चालू असताना ते शेतीचेही कामे करत. तेव्हापासून ते नोकरीचे चार पैसे मिळेपर्यंत शेतीची कामे सुटली नव्हती. 1982 मध्ये बारावी कला शाखेतून ते उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच बोरगाव (सुधा) येथील माजी सरपंच केरबाजी कांबळे यांची मुलगी चौत्राबाईशी त्यांचे लग्न झाले .लग्नानंतरही नियमित कॉलेज करू१९८४-८५ ला बी ए प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे यशवंत महाविद्यालयात एम.ए. अर्थशास्त्र साठी प्रवेश घेतला व त्या दुसऱ्या वर्षापासून शिक्षणात खंड पडला आणि कॉलेज जीवन संपले.
दरम्यानच्या काळात एक कन्या झाली जयश्री नाव तिचे. आता दादा पुन्हा शेतीतले जमेल तसे सालगड्या बरोबर काम करायचे. रमेश दादा तोही शेतात राबायचा. काहीतरी रोजगार मिळावा, कुठलीतरी नोकरी मिळावी, संसार फुलावा अशा आशा उराशी ठेवत काही दिवस गेले. पाण्याचं शिरवं घेऊन जावं तसं भारतीय विमा कंपनी मध्ये दादांना अल्पकाळासाठी सहाय्यक पदाची नोकरी मिळाली .दादा काकांकडे उमरीला राहून पंच्याऐंशी दिवसाची नोकरी केली. स्वप्न पडल्यागत नोकरीचे दिवस संपले. दोन मुले झाली प्रकाश आणि सतीश. घर सांभाळत शेती करीत गावामध्ये छोटासा किराना दुकान टाकले परंतु व्यापार व्यवहार जुळले नसल्याने त्यात सातत्य ठेवता आले नाही.
जाधव कुटूंबात संगीतकला नांदत होती. पेटी तबला, टाळ, मृदंग आमच्या घरी होतं आजही आहे. बाबा त्या काळी भजनात हार्मोनियम वाजवायचे, काका हार्मोनियम सह गायन करत. दादाही हार्मोनियम वाजवत आताही वाजवतात. खेडोपाडी त्या काळी भजनाच्या दिंड्या असायच्या पिंपळढवचीही गायन पार्टी नावाजलेली होती.आम्ही लहान असताना दादा बॅन्झो वाजवायचे, बुलबुलतारा असं काहीतरी नाव होतं त्याला. ते ऐकतांना फार मोठी गंमत वाटायची.
उमरीच्या नूतन विद्यालयातील प्रा. पांडुरंग धसाडे व काकांच्या सल्याने १९९३-९४ ला दादांनी शारीरिक शिक्षकांची पदवी म्हणजे बीपीएड पूर्ण केले.नोकरीच्या शोधात असतानाच मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ बोरगावच्या ज्ञानसंवर्धन माध्यमिक विद्यालयात विनाअनुदानित शाळेमध्ये भविष्याची आशा तेवत ठेवत नोकरी पत्करली नंतर याच विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून सेवेची संधी मिळाली ती आजवर.कसल्याच प्रकारचे वेतन नाही ना मानधन नाही ,भत्ते नाहीत किंवा कमावण्याचे इतर कोणतेही माध्यम नसताना घर खर्च ,प्रवास खर्च ,परिवार सांभाळणे असे जिकीरीचे आव्हाने पेलली. समाजाची दृष्टी, सगेसोयरे यांची नजर, दादाकडे असायची त्यांना परिस्थितीला लपवता येईना व सांगताही येईना. आशा ठेवत, नैराश्य पत्करत दिवसे काढली. कैक वेळा गावापासून शाळेपर्यंतचे सतरा-अठरा किलोमीटरचे येणे-जाणे सायकलवरून केले .माय बापाचा सांभाळ, मुलाबाळांचे लाड कौतुक, बायकोची इच्छा अपेक्षा ,आमचे शिक्षण, अशा कसल्याच गोष्टीची सुखकर पूर्त होत नसे .आंतरयातना सहन करत जुलै २००४ मध्ये शाळेला अनुदान मिळाले .पगार सुरू होणार याचा आनंद सर्व कुंटूबाच्या गगनात मावेनासा झाला. १९९४ ते २००४ या कालावधीमध्ये शाळेला अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. लातूर, औरंगाबाद, पुणे व मुंबईला अनेक वाऱ्या केल्या अर्धपोटी, उपाशीपोटी कधी पावभाजी ,वडापाव, खिचडी ,भजे खाऊन स्टेशनवर रात्र काढून कामे केली आणि केलेल्या कष्टाचं चीज झालं. जीवनात दिवाळी आली .प्रकाश आला. आयुष्याची लढाई जिंकल्यागत झालं. या सगळ्या संगरामध्ये एक तप पूर्ण झाला होता.
संस्थेचे अध्यक्ष दिवंगत शंकरराव कांबळे यांच्या शैक्षणिक वटवृक्षाची निगा राखत सहकारी शिक्षक यांच्या सहकार्यासह मुख्याध्यापक पदाची सूत्रे यशस्वीपणे पार पाडली. प्रामाणिक व निर्मळ सेवेच्या काळात ग्रामीण भागातील अनेक मुले घडली, परिसरातील मुलींना शहरात जाणे दुर व्हायचे या शाळेच्या उपलब्धतेने मुलींचे शिक्षण सहज झाले.ज्ञानदानाचे पवित्र असे कार्य करण्याची संधी आयुष्यात येऊन दादांच जीवन निश्चितच पुणित झाले. शालेय प्रशासन उत्तमरित्या पार पाडता आलं. वाळवंटी जीवनात हिरवळीचे ओअॅसिस अफाट कष्ट आणि सहनशीलतेच्या माध्यमातूनच अनुभवता आले .आई-वडील, कुंटूब परिवाराच्या आकांक्षा पूर्ण करता आली. सहकारी शिक्षक विद्यार्थी यांच्या सहवासातील सेवेची एवढी वर्ष आनंद देऊन गेली.
समग्र बिकट परिस्थितीतल्या संघर्षाने विद्यार्थ्यांना , बेरोजगार तरुणांना, अनेक शिक्षकांना विधायक ऊर्जेसह प्रेरणा मिळाली. प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत आहेत .त्यांच्या यापुढील सुखकर जीवन प्रवासासाठी मी पार्थना करतो.
-मिलिंद जाधव
(विषय शिक्षक, जिल्हा परिषद कन्या शाळा भोकर, जिल्हा - नांदेड)
९४२३९०२४५४
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .