शिक्षण व क्रीडा समितीच्या बैठकीत झाला निर्णय !
उर्वरीत सुट्या नाताळ किंवा उन्हाळी सुट्टीत लागून देण्याची शक्यता !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
08/11/2021 रोजी शिक्षण व क्रीडा समिती बैठक मा.श्री संजय माधवराव बेळगे सभापती शिक्षण व बांधकाम समिती जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली निजीकक्षात पार पडली.
नांदेड जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्या दिनांक 10 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार असून दिनांक 11 नोव्हेंबर पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळा सुरू करण्याचा ठराव आज झालेल्या शिक्षण समितीत पारित करण्यात आला. सर्व शाळा 11 नोव्हेंबर रोजीच सुरू करण्यात येतील असे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले.
नांदेड जिल्हा परिषदेने शाळांना दिनांक 1 ते 20 नोव्हेंबर अशी सुट्टी जाहीर केली होती .दरम्यान शासनाने या सुट्ट्या दिनांक 27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत राहतील असे परिपत्रक काढले होते त्यानुसार शाळेच्या सुट्ट्या दिनांक 10 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार होत्या. दरम्यान शासनाने काल काढलेल्या परिपत्रकानुसार या शाळांच्या सुट्ट्या 20 नोव्हेंबरपर्यंत वाढविल्या आहेत मात्र त्या-त्या जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी याबाबत निर्णय घेऊ शकतील असे म्हटले होते .त्यानुसार आज हा विषय शिक्षण समितीत चर्चेला आला .सर्व गटशिक्षणाधिकारी आणि सन्माननीय सदस्यांनी याबाबत चर्चा केली. कोरोनात शिक्षण थांबले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अधिक खंड पडेल त्यामुळे शाळा दिनांक 11 नोव्हेंबर रोजीच सुरू करण्यावर सदस्यांत एकमत झाले.
दरम्यान स्वीकृत सदस्य बसवराज पाटील यांनी शिक्षक संघटनांची भावना शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार ईतर जिल्ह्याप्रमाने दिनांक 22 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याबाबत असल्याचे सांगितले व आग्रह धरला .दि.11 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू केल्याने दिनांक 22 नोव्हेंबर पर्यंत मिळू शकणाऱ्या सुट्ट्या नाताळ किंवा उन्हाळी सुट्टी मध्ये समायोजित करून वाढविण्यात येणार आहेत. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची तयारी व करण्यात येत असलेल्या कामांची माहिती प्रास्ताविकात प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी यांचा आढावा घेण्यात आला .सर्व गावातील विद्यार्थ्यांची तयारी करून घ्या आणि 100% उपस्थिती ठेवा अशी सूचना शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज केली .वस्ती शाळेवर कार्यरत असलेल्या व डीएड नसलेल्या शिक्षकांना नांदेड जिल्हा परिषदेने सेवेतून कमी केले आहे त्या सर्वांना डीएड झाल्यानंतर सामावून घेण्याबाबतची कार्यवाही समन्वयाने करण्याचे आवाहन साहेबराव धनगे यांनी केले .इयत्ता चौथी आहे तिथे पाचवी, पाचवी आहे तिथे सहावी आणि सहावी आहे तिथे सातवी असे वाढीव वर्ग देण्याबाबत सदस्यांनी प्रस्ताव समितीसमोर मांडला.
इयत्ता 1 ते 4 थीची शाळा असल्यास त्या ठिकाणी पाचवी देता येईल परंतु सहावा आणि सातवा वर्ग देण्याचे अधिकार शासनास आहेत असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.अशा शाळांबाबतचे प्रस्ताव शासनास पाठविण्याबाबत सूचनाही शिक्षण सभापती यांनी केली .
जिल्हा परिषद हायस्कूल कामारी येथे माध्यमिक शिक्षक नाही त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षकांची व्यवस्था करावी अशी मागणी सदस्य संतोष देवराये यांनी केली .येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावू असे सभापतींनी सांगितले.
शिक्षकांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात सकारात्मक भावनांनी शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन सदस्य बसवराज पाटील यांनी केले .चटोपाध्याय वेतनश्रेणी,निवड श्रेणी,विषयशिक्षक वेतनश्रेणी,शिक्षक पुरस्कार सोहळा,जुनी पेन्शन बाबत ठराव,NPS बाबत हिशोब,कोविडमुळे दिवंगत शिक्षकांच्या वारसांना लाभ देणे,CMP प्रणाली,GPF स्लिप हिशोब,सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता,पदोन्नती,महाराष्ट्रा दर्शन,जुने अवघड क्षेत्र कायम ठेऊण्याचे नविन अँड करणे,मेडीकल बिल सह सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत सदस्य बसवराज पाटील यांनी आग्रह धरला. येत्या एक महिन्यात सर्व प्रश्न निकाली काढु असे शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी सांगितले.
आजच्या समितीच्या बैठकीस ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेबराव धनगे ,अनुराधा पाटील,बबन बारसे, स्वीकृत सदस्य बसवराज पाटील आणि संतोष देवराये यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीस शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे ,शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर ,अधीक्षक बळीराम येरपूलवार, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर ,दत्तात्रय मठपती, लेखाधिकारी योगेश परळीकर ,सहायक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे,सर्व गटशिक्षणाधिकारी* यांची यावेळी उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .