साने गुरुजी हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक, कादंबरीकार, कवी, समतावादी विचारवंत आणि संस्कारित मूल्य जपणारे एक मानवतावादी व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. घरची परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे शिक्षणाची परवड झाली, परंतु अशाही परिस्थितीत १९१८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील संवेदनशील शिक्षकाला अधिक वाव मिळावा. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली. खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या अमळनेर येथील प्रताप हायस्कूलात ते १९२४ साली रुजू झाले. त्याकाळात मूल्याधिष्ठित असे बरेच लेखन साने गुरुजींनी केले.
१९२८ साली त्यांनी 'विद्यार्थी' हे मासिक सुरु केले. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. 'काँग्रेस' नावाचे साप्ताहिक काढले.१९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार,प्रसार केला.राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. 'पत्री' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील 'बलसागर भारत होवो' सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रुढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्याना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. 'एका पांडुरंगाने दुसर्या पांडुरंगाला खर्या अर्थाने मुक्त केले,' असे त्या वेळी म्हटले गेले.
वि. का. राजवाडे, शिरिष कुमार घोष, रवींद्रनाथ टागोर इत्यादि आत्मचरित्र त्यांनी लिहिली. कला म्हणजे काय ? मानवजातीची कथा, राष्ट्रीय हिंदुधर्म, कलकी अथवा संस्कृतीचे भवितव्य, दिल्ली डायरी, ना खेद ना खंत इत्यादी महत्त्वांच्या ग्रंथासह त्यांनी एकूण चौदा ग्रंथांचे अनुवाद केले. गोड गोष्टींचे दहा भाग, स्त्री पुनर्जन्म, अस्तिक,धडपडणारी मुले,श्याम,क्रांती,गोड शेवट, तीन मुले, नवाप्रयोग आणि श्यामची आई या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यात श्यामची आई ही कादंबरी फारच गाजली. श्यामची आई या कादंबरीवर पुढे चित्रपटही निघाला. गोड निबंध, गोड गोष्टी, स्वप्न आणि सत्य हे निबंध लेखन त्यांनी केले. तर भारतीय संस्कृती, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांची अंदाजे १२५ पुस्तके प्रकाशित आहेत.तर बरेच लेखन साहित्य अप्रकाशित आहे.स्वातंत्र्याच्या चळवळीच्या निमित्ताने तुरुंगात असताना विद्यार्थ्यांची सेवा करताना, त्यांनी हे लेखन केले आहे. सद्भाव व सदाचार ही गुरुजींच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या शिकवणुकीने त्यांच्या लेखनाने अनेकांनी प्रेरित होऊन समाजकार्याला वाहून घेतले होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर (आंतरभारती चळवळ) आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरु केले. त्यांच्या कथा, कांदबर्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. साधी, सोपी ओघवती भाषा. छोट्या छोट्या वाक्यांची परंतु अंतःकरणाला भिडणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
तसेच सगळ्यांच्या विषयी प्रेमभावना माणसाच्या मूलभूत चांगुलपणावर विश्वास ही तत्वे साने गुरुजीच्या वागण्यातून आणि लिखाणातून आपल्याला दिसतात. भारतीय संस्कृतीतील विचारमिमांसा मूल्य जपणे आणि सर्वसामान्य माणसाला सुसंस्कृत करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत संपूर्ण मानव जातीला समर्पित आहे. या गीतातून त्यांनी संपूर्ण मानवजातीला रंजल्या-गांजल्याची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. अशा या मानवतावादी संताने ११ जून १९५० रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम.
- शंकर नामदेव गच्चे
जि.प. प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर जि. नांदेड
मोबाईल नंबर-८२७५३९०४१०
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .