शिवज्ञान चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन चिमुकल्यांनी केले अभिवादन

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिवज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात शाळेतील मुला मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अनोख्या पध्दतीने शिवरायांना अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, हैदर शेख कमलबाई गच्चे, इंदिरा पांचाळ, किशन गोडबोले, चांदू गोडबोले आदींची उपस्थिती होती. 


       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवचरित्रावर आधारित शिवज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संतोष अंबुलगेकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, द्रष्टे प्रशासक आणि कुशल संघटकही होते. जात-पात, धर्म यांचा भेदाभेदा न करता समाजातील सार्‍या घटकांची मूठ बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ माता आणि शहाजी राजेंकडून त्यांच्यावर संस्कार झाले. परकीय आक्रमणांना परतून लावत त्यांनी स्वराज्याची स्थापन केले. शिवरायाचं व्यक्तिमत्त्व आजही सार्‍यांसाठीच प्रेरणादायी आहे. 


         शिवज्ञान चाचणी परीक्षेनंतर रंगभरण, व भाषण स्पर्धाही संपन्न झाल्या. समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी यावेळी सांगितले की, शिवाजी महाराज खरे वीर राष्ट्रपुरुष होते.  त्यांचा हा महाभूषणप्रद गुण होय.  प्रखर जिद्द , कुशल संघटन, शौर्य, विरता, साहस, बुद्धिचातुर्य, चारित्र्य या नैतिक गुणांमुळेच महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आजच्या विद्यार्थ्यांनी हे गुण अंगिकारायला हवेत असे ते म्हणाले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)