महाराष्ट हे मराठवाडा, खानदेश, कोकन आन् इदर्भ ह्या चार ईभागात ईभागलेलं भारतातलं येक राज्य . इदर्भ ह्या इभाग महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेले असणारा आन् ईपुल प्रमानात दर्भ उगवनारा प्रदेश . इदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, उमरावती, यवतमाळ, आकोला, वाशीम, बुलडाणा हे जिल्हे हायेत. पयले सी.पी.आन् बेरार राज्य होते . त्यातलं बेरार मंजे व-हाड होय.
1853 पर्यंत अमरावती आणि आसपासचा प्रदेश ज्याले व-हाड प्रांत मनून ओयख होती . त्यात अमरावती, आकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्ले होते . व-हाडात व-हाडी बोलीभाषा बोलली जाते . तसी हर बारा कोसावर भाषा बदलते असं म्हणतेत . मनून प्रत्येक ठीकानच्या लोकायचे रायनीमान, आचार-इचार, रीती-रीवाज थोळेसेक अल्लग अल्लग दिसून येतंत . नागपूर (ग्रामीन), चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ल्यात तसी झाडीबोलीभाषा बोलतेत . वर्धा जिल्ला मले तसा दोन्ही ( नागपूर आन् उमरावती विभाग) वावराचा धुरा असल्यासरखा वाट्टे .
इदर्भ विभागातल्या व-हाडात व-हाडी आन् झाडीपट्ट्यात झाळीबोली , खांदेशात अहिरानी , मराठवाळ्यात मराटी, कोकनात कोकनी ह्या बोलीभाषा बोलल्या जातेत . झाळीबोली आन् अहिरानी ह्या व-हाडी बोलीभाषेच्या भाषाभगिनी असल्याचं सांगतेत . व-हाडी बोलीभाषेच्या बाबतीत बोलाचं झाल त इ.स. 1278 सालात महानुभाव पंथाचा प्रमुख ग्रंथ समजल्या जाना-या लिळाचरित्राचे लेखन म्हाईंमभट सराळेकर यांयनं यादवकालीन मराटी आन् व-हाडी लोकभाषेत केलं . त्यापासूनच मराटी भाषा हे आनखीनच समृद्ध झाल्याचा इतिहास आपल्याले वाचाले भेटते . तसच संत साहित्याचाई त्याच्यात मोटा वाटा हाये . पन आताच्या कायात मात्र राज्यभाषा मराटी भाषीक लेखक, वाचक लोक व-हाडी भाषेले दुय्यम लेखत असल्याचे जानोते . तिले पायजे तसं अभ्यासक्रमातल्या पाठ्यपुस्तकात स्थान भेटल्यालं दिसत नाई . याचं दुख वाटते .
बोलीभाषा हे लोकभाषा हाये . थे ज्ञानभाषा व्हायले पायजे. यासाठी काई प्रमाणात प्रयत्न झाले पन थे कमी असल्याचे जानोते . मून नव्या पिळीनं दमानं हे काम पुळं न्याचं ठरवाव . असं वाटते. आटापीटा करून तीले शाळा, कालेज, इद्यापीठाच्या अभ्यासक्रमात व-हाडी बोलीभाषेले जागा भेटली पायजे . व-हाडी भाषा हे निदान व-हाडात तरी शिक्षनाची भाषा झाली पायजे . निदान काई साईत्याचा अंतर्भाव तरी झाला पायजे . ह्यासाटी काई लोकायनं प्रयत्न सुरू केले असीन असं वाटते . लय लेखक कवी लोकायचं कविता, कथा, कादंबरी, नाटक, पोवाळे, गाने, संवाद लियन्याचं काम जो-यात सुरू हाये .
" आमची व-हाडी भाषा रोकठोक हाये . लय लोकाले वाचाले, आयकाले, बोलाले गुयचट वाट्टे . तसीच थे थोळीसी लवचीक हाये . व-हाडातच हर बारा कोसावर काई शब्द बदलतानी दिसते . ( जसे : इथं-तीथं, अथी-तथी, अटी-तटी ) लय लोक आता तीचा वापर सीनेमा, नाटक, टि.व्हीवर , भाषनात, लियन्यात, बोलन्यात करत हाये . हे व-हाडीसाटी जमेची बाजू हाये . आमची व-हाड भूमी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, वं. राष्ट्संत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा , डाँ. भाऊसाहेब देशमुख , विजय भटकर , प्रतीभाताई पाटील यायच्या विचारांनं आन् कर्तृत्वानं पावन झाली हाये . तीनं सातासमुद्रापल्याड आपला झेंडा रोयला हाये . तसच व-हाडी भाषेले वैभव प्राप्त करून देण्याकरता आंदिल्या कायात काई साहित्तिकांयनं मोलाचं काम केलं हाये. थे नजरेआळ करून चालनार नाई .
पयल्या फळीतले प्रा.देविदास सोटे (शब्दकोश) , वामन चोरघडे, पां.श्रा.गोरे, गो.रा.वैराळे, स्व.पुरूषोत्तम बोरकर (मेड इन इंडिया), मधुकर केचे, लक्ष्मन हागे, शंकर बडे (इरवा, मुकुट) , कवी डाँ. विठ्ठल वाघ ( डेबू , साय),उद्धव शेळके(धग) बाजीराव पाटील ( भंडारवाडी) भाऊ मांडवकर, डाँ.मधुकर वाकोडे, राजेश तोंडरे , मिराताई ठाकरे, डाॅ. प्रतिमा इंगोले, शिवलिंग काटेकर(व-हाडधन) ,बाबाराव मुसळे ( हल्या हल्या दुधू दे )सदानंद देशमुख (तहान ),विठ्ठल कुलट (सितादही) , गोपीचंद कांबळे 'विद्यार्थी ( 'नुसातं' स्वकथन) , किशोर बळी ( धुम्मस ) मिर्झा रफी बेग ( चोर गेला चोरीले धोतर अटकलं बोरीले ,धुयमाती, ऊठ आता गणपत) मनोहर तल्हार (बुढीचं खाटलं कथासंग्रह, माणूस कादंबरी ) प्रकाश पोहरे , ज.पां खोडके, श्रीकृष्ण राऊत, डाँ.सतीश तराळ ,मा.बा. चव्हान ,नरेंद्र इंगळे( नासोळा),अलकाताई देशमुख, पुष्पराज गावंडे(यलाईकार), संदीप धावडे (वावरातल्या रेघोट्या),किशोर बळी (धुम्मस), अरूण हरिभाऊ विघ्ने , आर्वी,वर्धा (जागल)प्रा. सुनील पखाले (भकास झालं गाव, कास्तकारायन) प्रा. महादेव लुले ( रई समीक्षाग्रंथ, सरवा गीतसंग्रह) , आबासाहेब कडू (अदलीभर दाने, तितोंबा कथासंग्रह ) डाॅ. रावसाहेब काळे (व-हाडी बोली संदर्भात संशोधनात्मक लेखन) दयाराम निंबोळकर ( सातबारा कोरा नाटिका) शालीग्राम धनभार (चिचोणी,गावरान मेवा,पाहुणचार), रविंद्र महल्ले (धोंडी धोंडी पाणी दे), प्रमोद अंबाडकर ( माह्या गावचं पानी), स.ग.पाचपोर ( हंबरून वासराले ..), क.वि. नगराळे( मिसय काव्यसंग्रह) ,खुशाल गुल्हाने (आकाशमाती), रमेश निनाजी सरकाटे (उब, कथासंग्रह), विजय बिंदोड ( भूडईतल्या वाफा) , युवराज टोपले ( करपलेली भाकर), श्रीराम वाघ (व-हाड माती ), विनायक काळे (गावची माती) शाम ठक (बाप वावर पेरते) प्रा. अशोक सारडा ( नाई कसं म्हनता ), गोपाल शिरपूरकर ( माही परदेश वारी ), सु.पुं.अढाऊकर (व-हाडीच्या कथा),
डाँ. स्वप्नील मानकर, डाँ. राजा धर्माधिकारी, गौतम गुडधे, निलेश कवडे, निलेश देवकर,उद्धवराव गावंडे, विजय पळसपगार, विजय ढाले,राजेश काटोले, नितीन वरनकार , का.रा.चव्हाण, सुरेश नागले, रविंद्र अं. दळवी, प्रविन सोनोने, प्रविन बोपुलकर,अमोल गोंडचवर, प्रविन चांदोरे, सौ.अनुराधा धामोडे, सौ.अलका देशमुख, सौ.अलका बोर्डे , सौ.साधनाताई काळबांडे, डाँ.मीना सोसे,विद्याताई राणे, अजय राऊत, प्रा. मोहन काळे ,स्वप्नील इंगळे, दिपक खवशी, प्रकाश गायके, रामदास गायधने,बच्चूभाऊ गावंडे, अजय इंगळे ह्या उप्पर अजूनई (काई नावं इथं लियनं शक्य नसल्यानं लियले नाई ) लय सायित्तिक कविता, कथा, ललीत, लोकगीतं, व-हाडी गान्याचे कार्येक्रम , पोवाळे , ओवी, ह्या साहित्य प्रकारातून गावातल्या कास्तकार, शेतमजूर, कामगार लोकायचं जीवन व-हाडी बोलीभाषेतून टी. व्ही. , आकाशवानी, पुस्तकं, मासीकं, वृत्तपत्रं, कँसेटा, दिवाईअंक, व-हाडधन मोबाईल अँप , फेसबुक, व्हाट्सअँप ह्या प्रसार माध्यमातून वाचकांसमोर मांडत हायेत . याच्यात दै. देशोन्नती, दै.विदर्भ मतदार, शिवशक्ती, शब्दांकुर नियतकालीक, व-हाडवृत्त ,चिरांगन दिवाई अंक, भावमाला त्रैमासीक, जिम्मक (प्रातिनिधिक काव्यसंग्रह ), स्पंदन व-हाड मातीचे (प्रातिनिधीक काव्यसंग्रह) , बखर (प्रा. कथासंग्रह )यायनं व-हाडी सायित्याले प्रसीद्धी देल्ली हाये.
आताच्या कायात मोट्या परमानात नवागतायकळून तिच्या संवर्धनाचं निकराचं काम होत असल्यानं समाधान वाट्टे .आजलोक अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंचानं १)पुष्पराजजी गावंडे (अकोला), २) प्रकाशजी पोहरे (अकोला), ३)नरेंद्र इंगळे(उमरावती), प्रा.डाॅ. राजेश मिरगे (शेगाव) यायच्या अध्यक्षतेखाली चार संमेलनं भरोले हायेत . लेखनाची गती वाळते हाये .लय पुस्तकं व-हाडी बोलीभाषेत लियले जात हायेत . हे काम व-हाडीच्या प्रसार आन् प्रचारासाटी जीकरीचं आन् मोलाचंच मनाव लागन . संस्थेनं आजलोक लय उपक्रम राबोले हायेत. व-हाडी बोलीभाषेत चिरांगन दिवाई अंक,बखर नावाचा प्रातिनिधीक कथासंग्रह , कविता, चारोयी स्पर्धा , व-हाडी बोलीभाषादिन राबोनं, व-हाडी शब्दायचं, म्हनीचं, ओवी, गाने, अभंग, जुन्या नव्या लेखकायच्या पुस्तकायचं संकलन करनं. हे सारे कारेक्रम राबवत हायेत. आपन सारे मियून व-हाडीचा आनखीन जागर करूया . लिहू व-हाडी ! बोलू व-हाडी !! जगवू व-हाडी !!!
- अरूण विघ्ने
मु. पो. रोहणा
त.आर्वी, जि. वर्धा


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .