जागतिक तंबाखू विरोधी दिन
31मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा दिवस. देशाची भावी पिढी सुदृढ व निरोगी जन्माला येण्यासाठी व्यसनमुक्त चळवळ सक्रिय होणे गरजेचे आहे.
व्यसनाचे निरनिराळे प्रकार आहेत त्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन याचे मुख्यत्वे व्यसन केले जाते. तंबाखूसेवन मजेशीर वाटत असले तरीही कालांतराने आपल्या शरीरावर अगदी घातक परिणाम होतो. जाहिरातीच्या माध्यमातून अनेकवेळा सांगितले जाते की तंबाखूचे व्यसन किती घातक आहे. एखाद्या माणसाच्या जिभेला किंवा शरीराला तंबाखूची सवय लागली तर आयुष्याची बरबादी होते. संतविचारातदेखील कुठल्याही व्यसनाच्या आहरी जाऊ नये असे सांगितले आहे. आपला मेंदू कितीही सतर्क असला तरीही आपल मन आपल्याला व्यसनापासून लांब ठेवत नाही म्हणून आपल्या आंतरइंद्रियावर ताबा असणे गरजेचं असतं.
चघळणे, ओढणे, तपकीर अशा वेगवेगळ्या पध्दतीने तंबाखूचे व्यसन केले जाते. तंबाखूममध्ये निकोटीन हे अत्यंत विषारी रसायन आहे. ते लाळेतूून श्वासात, रक्तात मिसळते व त्याचा परिणाम हृदय, फुप्फुस जठरावर होतो. तंबाखू, खर्रा यांच्या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होतो तर विडी, सिगारेट ओढण्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होतो याचबरोबर घशाचा, पोटाचा, किडनीचा व मुत्राशयाचा कॅन्सर होणा-याची संख्या जलदगतीने वाढत आहे.
90टक्के फुप्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे एकमेव कारण धुम्रपान आहे. धूम्रपानामुळे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान होते. 'आरोग्यम धनसंपदा'अस म्हणतात आपल आरोग्य आपली खरी संपत्ती आहे. आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपल्याकडे चांगल आरोग्य नसेल तर पैशाची श्रीमंती काही कामाची नसते. आपलं शरीर आपली खरी संपत्ती आहे आणि आपल्या शरीराला योग्य वळण लावणे ही आपली जबाबदारी आहे.
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावले तर नक्कीच फायदा होईल कारण शाळेत मुले समजावून घेतील व पर्यायाने आपले कुटुंब ,परिसर व्यसनापासून दूर घेऊन जातील.व्यसन करणा-या व्यक्तीला कालांतराने कमी ऐकू येते,दृष्टी कमी होणे व विस्मरण होणे यासारख्या समस्या भेडसावत असतात त्यामुळे वेळीच सावध झाले पाहिजे आणि सतर्कतेने व्यसनाला दूर लोटले पाहिजे.आज समाजात अनेक लोकांनी व्यसनाच्या आहरी जाऊन स्वास्थ्य बिघडवून घेत आहेत.
हे व्यसनाचे दुष्परिणाम व्यसनात अडकलेल्या लोकांना सांगून त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपली सामाजिक तथा सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून जर व्यसनाधिनतेच्या विरूद्ध एल्गार केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ व बलशाली होण्यास मदत होईल. चला तर मग संकल्प करूया सुदृढ व निरोगी राष्ट्र घडवूया.
'व्यसनमुक्त भारताचा एकच नारा, तंबाखूला नाही थारा ।
- श्रीमती उषा नळगिरे
प्राथमिक शिक्षिका तथा लेखिका
जि. प. प्रा शाळा पार्डी (म)



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .