[ उपक्रमशील शिक्षक मिलिंद जाधव यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आहे त्या अनुषंगाने श्रीकांत द. गोरशेटवार यांचा प्रासंगिक लेख देत आहोत - शालेय वृत्त ]
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एक अमौलिक व्यक्तिमत्व, अद्वितीय शिक्षक, अतुलनीय कार्य करत ज्ञानाची शिदोरी विद्यार्थ्यांसाठी रिती करुन आनंदाचे नवसंजिवन फुलवणारा, चाकोरीबाहेरचे शिक्षण विविध उपक्रमातून सहजपणे शाळेत राबवणारा अन् हरक्षण विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठीच प्रयत्नरत राहणार्या एका अवलिया शिक्षकास म्हणजेच श्री.मिलिंद जाधव सर यांना यावर्षीचा *महाराष्ट्र शासनाचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार* जाहीर झाला आणि खर्या अर्थाने पुरस्काराचाच सन्मान झाल्याचा क्षणभर भास झाला.
शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा अन् पावित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला,
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
शिक्षक निर्माता भावी पिढीचा आणि समाजाचा !!
या उक्तीसम श्री.मिलिंद जाधव सर समाजाच्या उत्थानासाठी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी विकास घडवून सातत्याने झटत आहेत. प्रत्येक क्षेत्रात पारंगत असलेले जाधव सर अगदी निमिषर्धात दुसर्याच्या मनाचा ठाव घेतात. शिक्षणाच्या विविधांगी उपक्रमासोबतच तंत्रज्ञान, चित्रकला, कथा-काव्यलेखन, पथनाट्य संचलन, ई-पुस्तक संपादन, संगीत अशा वेगवेगळ्या क्षेत्रात लिलया वावरत असताना आपल्या कर्तृत्वाचा अवीट ठसा जनमानसावर सोडतात.
शाळेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस तर लावतातच पण विज्ञानाचा दुरान्वयानेही संबंध नसलेल्या वारली चित्रकलेचे धडेही विद्यार्थ्यांना देतात अन् तितक्याच तन्मयतेने आकाशनिरीक्षणासाठीची दुर्बीण हाताळतात आणि विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, नक्षत्रांची रंजक माहिती गोष्टीरूपात सांगतात.
वरिष्ठ कार्यालयातील कुठलाही अभिनव उपक्रम सरांच्या कल्पक आणि कृतीशील सहभागाशिवाय यशस्वी होऊच शकला नाही. कोरोनासारख्या जीवघेण्या खडतर काळातही भोकर तालुक्याचा शिक्षण विभाग श्री.मिलिंद जाधव सरांच्या तंत्रस्नेही योगदानामुळेच कार्य करु शकला हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही.
शैक्षणिक कार्याबरोबरच कुठलेही अशैक्षणिक कार्यही तितक्याच तळमळीने आणि तन्मयतेने करणे म्हणजेच
सर्वोत्तम गोष्टीसाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्यासारखेच....
श्री.मिलिंद जाधव सरांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन अशा मोजक्या शब्दांत करणे कदापि शक्य होणार नाही. अनेकविध गुणांनी समृद्ध झालेले त्यांचे शांत, संयमी, दिलदार, सहकार्यशील, अष्टपैलू, गुणी व्यक्तिमत्व कायम इतरांना प्रेरणेचा स्त्रोत ठरावे असेच आहे. काट्यांत राहूनही ज्याप्रमाणे गुलाब आपल्या सौंदर्याने आणि सुगंधाने अवघ्या वातावरणात प्रसन्नता आणतो अगदी त्याचप्रमाणे जाधव सर रुक्ष वातावरणातही आपल्या सहज वागण्यातून नाविण्याची कल्पक अन् रंजक झलक दाखवतात.
त्यांच्या अद्वितीय कार्यासाठी
"बांधुनि स्वप्नांची शिदोरी
झालो वार्यावरती स्वार
भरला आत्मविश्वास पंखी
करेन क्षितिज पार.... "
या ओळी सार्थ वर्णन करणार्या ठरतील यात काही शंका नाही.
कोणत्याही मानसन्मानासाठी, कुठल्याही पुरस्कारासाठी वा गौरवासाठी किंवा प्रसिद्धीसाठी कधीही ते हपापले नाहीत म्हणूनच की काय राज्यशासनाचा गुणगौरव पुरस्कार थेट शासनानेच त्यांना बहाल केलाय.
या पुरस्काराने सरांच्या अस्सल हिर्याला बावन्नकशी सोन्याचे छान कोंदण लाभले आहे. त्यांच्या कार्याची दखल सबंध राज्यात घेतली गेली आहे त्या कार्याचा दरवळ सकल देशभर पसरो आणि त्यांच्या अमीट कार्याची छाप राष्ट्रीय पुरस्कारावरही उमटो...
या मनस्वी शुभेच्छांसह श्री.मिलिंद जाधव सरांचे खूप खूप मनस्वी अभिनंदन.....
-श्रीकांत द. गोरशेटवार,
जि.प.हायस्कूल चौफाळा नांदेड
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .