जिल्हा परिषदेच्या शाळांमधील खेळाडूंच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम; क्रीडेत प्राविण्य विद्यार्थ्यांचे होणार नोंद..

शालेयवृत्त सेवा
0



पुणे ( शालेय वृत्तसेवा ) !

भविष्यातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असते. पुणे जिल्ह्यात यंदा या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. क्रीडा शिक्षकांमार्फत क्रीडा विभागाकडे या खेळाडूंची नोंदणी करावी लागते. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांचा यात उल्लेख असेल.


शाळांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक :

जिल्हा परिषदेतील शाळांमधून उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठी शाळांनी खेळाडू विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेले खेळाडू शालेय क्रीडा स्पर्धा, केंद्र, तालुका, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात.


नोंदणी कधी करायची?

पुणे जिल्ह्यात ऑगस्टमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे शाळांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेळाडूंची नोंदणी करणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला युडायस क्रमांक दिले आहेत. त्याआधारे प्रत्येक खेळाडू नोंदणी करू शकतो.


शाळांच्या अडचणी काय ?

जिल्हा परिषदेतील खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे शाळांची अडचण होत आहे, पण पुण्यात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून शाळांना याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


५० टक्के शाळांचे दुर्लक्ष :

खेळाडूंच्या ऑनलाईन नोंदणीकडे आतापर्यंत शाळांनी दुर्लक्ष केले होते. तसेच, नोंदणीबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळेही शाळा, खेळाडूंची अडचण झाली होती. त्यामुळे शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. संबंधित शाळांनी याबाबत दखल घेऊन नोंदणी करणे गरजेचे आहे.


५० क्रीडा प्रकार :

शालेय खेळाडूंसाठी क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, लॉन टेनिस, कराटे, ज्यूदो, कुस्ती, सायकलिंग, अॅथलेटिक्स आदी खेळांत प्रावीण्य असलेला खेळाडू नोंदणी करू शकतो.


जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्यासोबत आमची बैठक झाली आहे. जिपच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी खेळाडूंची नोंदणी करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. या शाळांना नोंदणीचे प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्याचा याद्वारे प्रयत्न आहे. २०२५-२६मध्ये जिल्ह्यातील जिपच्या शाळांतील खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धेत खेळवायचे आहे. यातून आपल्याला भविष्यातील खेळाडू मिळणार आहेत.

-महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)