स्कॉलरशिप परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा पंचायत समिती वरोरा कडून गुणगौरव सोहळा संपन्न. .

शालेयवृत्त सेवा
0

 



चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

         वरोरा येथे दिनांक १ मे २०२५ ला मिशन नवोस्कॉलर उपक्रमा अंतर्गत स्कॉलरशिप परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पंचायत समिती सभागृह वरोरा येथे संपन्न झाला. नुकताच पूर्व माध्यमिक तथा माध्यमिक इयत्ता ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षेचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा निकाल घोषित झाला यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्याने उल्लेखनीय अशी भरारी मारली.


          त्या अनुषंगाने शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा मा.गजानन मुंडकर संवर्ग विकास अधिकारी प.स.वरोरा यांचे अध्यक्षतेखाली, मा.ज्ञानेश्वर चहारे गटशिक्षणाधिकारी यांचे प्रमुख मार्गदर्शनात तथा विस्तार अधिकारी लांडे मॅडम, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी नामदेव राऊत यांचे उपस्थितीत पंचायत समिती सभागृह वरोरा येथे पार पडला. विशेष म्हणजे १ ते ७ वर्ग असलेल्या जि.प.उ.प्राथ. शाळा वाघनख येथील पूर्व माध्यमिक इयत्ता पाचवीतील नऊ पैकी पाच विद्यार्थी शिषवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. सदर निकाल हा वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधून अव्वल असून पात्र विद्यार्थ्यांच्या अभिनंदन सोहळ्या प्रसंगी मा.गजानन मुंडकर बिडीओ साहेब यांचे हस्ते  रामचंद्र सालेकर मुख्याध्यापक वाघनख यांचा सन्मानचिन्ह तथा प्रशस्ती पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. 


         मा. गट विकास अधिकारी मुंडकर साहेब यांच्या कल्पनेतून वरोरा तालुक्यात मिशन नवोस्कॉलर हा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविण्यात आला याचेच फलित म्हणून स्कॉलरशिप परीक्षेत वरोरा तालुक्याला घावघवीत यश मिळाले.पुढील वर्षी सुद्धा स्कॉलरशिप तथा नवोदय या स्पर्धा परीक्षेत आपल्या तालुक्यातील विद्यार्थी चमकतील अशी आशा व्यक्त करत या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात UPSC, MPSC या सारख्या स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळून त्यात ते यशस्वी होतील अशी आशा त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली, पुढील सत्रात तज्ञाच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त करून तसे नियोजन करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

     

          मिशन नवोस्कॉलर उपक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्याच प्रमाणे तालुक्यातील पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वीच्या २६ विद्यार्थ्यांचे, तर माध्यमिक इयत्ता ८ वीच्या ५ विद्यार्थ्यांचे  सन्मानचिन्ह तथा डिक्शनरी देऊन गौरव तथा अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर असे संचालन अर्चना महाकळकर मॅडम यांनी केले तर आभार गोपाळ गुढधे सर यांनी मानले.

---

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)