अक्षर परिवारात सन्मान स्त्री शक्तीचा.. महाराष्ट्र दिनी झाले मुलींच्या हस्ते ध्वजारोहण

शालेयवृत्त सेवा
1 minute read
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

कायम आपल्या नावीन्यपूर्ण  उपक्रमांनी अक्षर परिवार या नावाने परिचित असलेल्या वाजेगाव बीटमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील सर्वात हुशार मुलीच्या हस्ते करण्यात आले. हा अत्यंत महत्त्वपूर्ण, स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या, मुलींच्या शिक्षणाला बळकटीकरण देणाऱ्या, स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची परंपरा कायम केली आहे येथील संवेदनशील साहित्यिक, शिक्षण विस्तार अधिकारी तथा मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी.


        अनेक शासकीय कार्यालयात, शाळेत ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करावे? कोणास मान पान द्यावा? अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी विनाकारण राष्ट्रीय उत्सवात निर्माण होत असतात. या सगळ्या अनावश्यक बाबींना फाटा देत मुलींच्या शिक्षणाकडे सर्व पालकांनी लक्ष द्यावे, मुली उच्च शिक्षण विनाअडथळा घेऊ शकाव्यात, तसेच मुलींची होणारी उच्च शिक्षणातील गळती कमी व्हावी या उदात्त हेतूंनी प्रेरित असणारा हा उपक्रम कायम कौतुकाचा विषय ठरलेला आहे.


      यामध्ये वाजेगाव बीटमधील सर्वच्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांच्या पुढाकारातून,  वाजेगाव-निजा फातेमा शेख ताहेर, त्रिकुट-आदिती खिरोजी वडजे, नागापूर-मयुरी मारोती मस्के, पिंपळगाव मिश्री-सुहानी पुयड, वांगी-नंदिनी माणिका जाधव, वाडीपुयड नवीन-शिवांजली परसराम कदम, फत्तेपूर-माया हरी गोंड, वाडीपुयड-गौरी बालाजी पुयड, वडगाव-प्रतिभा पांडुरंग घोरबांड, ब्राम्हणवाडा-अक्षरा धम्मपाल थोरात, इंजेगाव-महेश्वरी धोंडिबा ठोके, पुणेगाव-नंदनी दत्तराम पुयड, सिध्दनाथ-प्रगती सदाशिव अवातिरक या मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 



मुलींच्या शिक्षणासाठी पालक जागृती व्हावी, त्यांचे शिक्षण अखंडित राहावे या हेतूने आरंभिलेल्या या उपक्रमास मोठ्या मनाने स्वीकारणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे या सर्व शाळेचे मुख्याध्यापक, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांचेदेखील नक्कीच कौतुक केले पाहिजे.

-व्यंकटेश चौधरी

शिक्षण विस्तार अधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)