तुळजापुरात लालासाहेब मगर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात डॉ नांदेडे यांचे प्रतिपादन !
तुळजापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
वेळीच सावध होऊन इंग्रजी शाळांचे होणारे अनिर्बंध आक्रमण आणि अतिक्रमण रोकले नाही आणि जिल्हा परिषद मराठी शाळांनी आपली सर्वोच्च गुणवत्ता सिद्ध नाही केली तर येत्या दहा वर्षात महाराष्ट्रात एक ही मराठी शाळा शिल्लक राहणार नाही अशी साधार भीती राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केली आहे ते तुळजापुरात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
मातृभाषा हीच प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे माध्यम असल्याचे सांगून डॉ नांदेडे यांनी शिक्षक नेते लालासाहेब मगर यांनी शिक्षक आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे आजन्म केलेल्या संघर्षाचे आवर्जून कौतुक केले. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी साखरे यांनी केले. शिक्षक नेते लालासाहेब मगर यांना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि उपस्थितांच्या हस्ते माता जगदंबेची विशाल प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी लालासाहेब मगर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबरोबरच गोरगरीब सामान्य माणसांसाठी केलेल्या संघर्षाचा आलेख मांडला. लालासाहेब यांच्या भावी काळातील कार्यासाठी मधुकरराव चव्हाण यांनी शुभकामना दिल्या . तुळजापूर येथील नागरिक आणि धाराशिव जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या शिक्षकांच्या उपस्थितीने शिव पार्वती मंगल कार्यालय भरगच्च भरले होते. या प्रसंगी आप्पासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात लालासाहेब मगर यांच्या खंबीर व्यक्तिमत्वाचे कौतुक करून त्यांना भविष्यातील लोकसेवेसाठी शुभकामना दिल्या .
शिक्षक नेते राज्याध्यक्ष देविदासराव बस्वदे यांनी शिक्षक संघटनेचे खंबीर नेतृत्व लालासाहेब मगर यांच्या धाडस, धैर्य आणि साहस या गुण कर्तृत्वाचे कौतुक केले. संघटनेचे नेते बशीर तांबोळी , बिभीषण पाटील यांची ही लालासाहेबांच्या निस्पृह आणि निर्भीड व्यक्तित्वातील अनेक गुणांचे कौतुक करणारी समयोचीत भाषणे झाली . आपल्या सत्काराला उत्तर देताना लालासाहेब मगर यांनी आपली शक्ती शिक्षकांच्या एकजुटीत असल्याचे सांगून आपण आयुष्यात कधीच जातीपातीचा विचार केला नसल्याचे सांगितले. शिक्षक हीच आपली जात आणि शिक्षण हाच आपला धर्म असल्याचे सांगून याही पुढे आपण लोक सेवेचे व्रत आचरणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष ,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ गणपतराव मोरे, पुणे येथील विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक डॉ नदाफ, डाएट चे प्राचार्य डॉ दयानंद जेटनुरे , माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंदराव डोंगरे , लोकनेते दयानंद रोचकरी , शिक्षक संघटनेचे जयवंत काळे, हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ सूर्यवंशी यांच्यासह राज्यातून आलेले शेकडो शिक्षक प्रतिनिधी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सूर्यवंशी यांनी केले तर आभार अविनाश मोकाशी यांनी मानले. कार्यक्रमोतर देशभक्तीपर गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .