व्यंकटेश चौधरी यांच्या 'अनाहत' काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड येथील महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांच्या प्रीतिप्रेमाच्या भावनेला आध्यात्मिक उंचीवर नेणाऱ्या 'अनाहत' काव्यसंग्रहाला मातोश्री केवळाबाई मिरेवाड राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ अशोक कौतिक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने ही निवड केली असून, संयोजक कवी वीरभद्र मिरेवाड यांनी मातोश्री केवळाबाई मिरेवाड यांच्या पुण्यस्मरण दिनी ही घोषणा केली. नांदेडच्या दत्ता डांगे यांच्या इसाप प्रकाशन संस्थेने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला असून महाराष्ट्रातील ख्यातकीर्त चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अनाहतचे मुखपृष्ठ तयार केले आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


व्यंकटेश चौधरी यांचा हा तिसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांचे गंधबन (निर्मल प्रकाशन), एक शून्य प्रतिक्रिया (शब्दालय प्रकाशन) हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. तसेच बालकुमार वाचकांसाठी लिहिलेले लालबहादूर शास्त्री, तत्त्वज्ञ आचार्य सर्वपल्ली राधाकृष्णन ही पुस्तके इसाप प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. 


व्यंकटेश चौधरी यांची 'घर', 'निर्णय' या कविता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए आणि एमएच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या. तर 'मन्याडीच्या कुशीत' हा ललित लेख स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट होता. त्यांचा 'एक शून्य प्रतिक्रिया' हा काव्यसंग्रह सध्या नांदेड विद्यापीठाच्या एमए द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात आहे.


व्यंकटेश चौधरी यांनी कथा, कविता, समीक्षात्मक लेखन केले असून त्यांच्या काव्यसंग्रहांना यापूर्वी विविध पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, साहित्यिक देविदास फुलारी, शिक्षण उपसंचालक डॉ दत्तात्रय मठपती, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन पक्वान्ने, उपायुक्त अजितपालसिंग संधू, सुप्रिया टवलारे,  नितीन गाढवे, सादेक शेख, रमेश चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी कवयित्री सुचिता खल्लाळ, कवी शिवाजी आंबुलगेकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे सहकार्यवाह राम तरटे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, केंद्रप्रमूख व्यंकट गंदपवाड, अरुण पाटील अतनुरे, अक्षय ढोके, दत्तप्रसाद पांडागळे, कवी मनोहर बसवंते आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)