ग्रामपंचायत नागापूरचा प्रथम आदर्श जनसेवक जीवनगौरव पुरस्कार प्रदान !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
आपण सर्व शेतकरी कुटुंबातील माणसं आहोत, शेतातील वर्षभराच्या पिकाला आपण तळहाताच्या फोडासारखे जपतो. ती आपली समृद्धी असते, संपत्ती असते आणि आपली गरिबी हटविणारी लक्ष्मी असते या भावनेतून आपण हे सारे करतो. पण आपली मुले ही पिढ्यान् पिढ्यांचे पीक असते. संतती हीच खरी संपत्ती या न्यायाने येणाऱ्या अनेक पिढ्यांचे दारिद्र्य हटवू शकणारी ती लक्ष्मी असते. आपली मुले सत्शील, कमावती आणि होतकरू निघण्याइतके समाधान कशातूनही मिळत नसते. हे शक्य करायचे असल्यास आपली मुले नित्य नेमाने शाळेत गेलीच पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवावे. एकही दिवस शाळेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्याचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. असे प्रतिपादन मनपा नांदेड शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी वाजेगाव बीट नांदेड व्यंकटेश चौधरी यांनी केले.
ते वाजेगाव केंद्रांतर्गत असणाऱ्या नागापूर प्राथमिक शाळेमध्ये बोलत होते. आपला शेवटचा कार्यदिन गुणवत्तापूर्ण शाळेला भेट देऊन संस्मरणीय ठरविण्याच्या उद्देशाने त्यांनी प्राथमिक शाळा नागापूर येथे दिनांक 31 जुलै रोजी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी शाळेतील सर्वच्या सर्व 85 विद्यार्थ्यांना आणि तीनही शिक्षकांना दहा हजार रुपयांचे दर्जेदार पॅड चे वाटप केले. शाळेच्या ग्रंथालयात मौलिक भर घालणाऱ्या दहा हजार रुपयांच्या मनोरंजक, ज्ञानवर्धक पुस्तकांचा खजिना त्यांनी मुख्याध्यापक अक्षय ढोके यांच्या हाती सुपूर्द केला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ, बिस्किटे, सोनपापडी चे वाटप करून त्यांचा दिवस गोड केला.
दरम्यान शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचे गावात स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या विद्यार्थिनींच्या लेझिम पथकाद्वारे अगदी जल्लोषात करण्यात आले. स्वागतासाठी सारा गाव गावच्या वेशीपाशी चौधरी यांना घ्यायला येऊन उभा राहिला. यावेळी चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागापूर मध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल कृतज्ञतापूर्वक आदरभाव व्यक्त करत असताना ग्रामपंचायत नागापूरच्या वतीने त्यांना त्यांच्या निस्पृह, प्रामाणिक सेवेसाठी ग्रामपंचायत नागापूरचा प्रथम आदर्श जनसेवक जीवनगौरव पुरस्कार सरपंच दिगंबर पाटील करडीले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सिद्धांत चौधरी, गावातील सर्व ग्रामस्थ, माता पालक, पिता पालकांनी आपली भरगच्च उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ राजेबोईनवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन धम्मदीना सोनकांबळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .