नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
व्यंकटेश चौधरी हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे गुणवंत शिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले. ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आणि विचारवंत शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
व्यंकटेश चौधरी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वाजेगाव बीट राज्यातील प्रगत आणि उपक्रम प्रवण केलेले आहे.. सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन चौधरी यांनी केलेले हे आदर्श कार्य राज्यातील इतर अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसाठी प्रेरक आणि अनुकरणीय असल्याचेही पूर्व शिक्षण संचालकांनी विशद केले.
प्रारंभी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला . जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात संपन्न झालेल्या या देखण्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले . त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजनाची भूमिका सांगितली. वाजेगाव बीट मधील अक्षर परिवार या विचारवंत शिक्षकांच्या सौजन्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी विशद केले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी आणि लेखक देविदास फुलारी, गटशिक्षणाधिकारी आडे आणि शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकानंतर सन्मानमूर्ती शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांना शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन त्यांच्या सेवापूर्ती प्रित्यर्थ प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. व्यंकटेश चौधरी यांच्या निस्पृह आणि निष्कलंक कार्याचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी गौरव केला. आपल्या भाषणात देविदास फुलारी यांनी व्यंकटेश चौधरी यांच्या उपक्रमशीलतेची शैक्षणिक फलनिष्पत्ती गुणवत्तेसाठी कारणीभूत असल्याचे विशद केले. शिक्षक संघटनेने सकारात्मक भूमिका घेऊन व्यंकटेश चौधरी यांच्या गुणवत्ता चळवळीस हातभार लावल्याचे प्रतिपादन शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी केले.
आपल्या सेवापूर्ती सन्मानास उत्तर देताना व्यंकटेश चौधरी यांनी संपूर्ण विद्यार्थी विकास हेच प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाचे उद्दिष्ट्य असल्याचे सांगून आपल्या बीट मधील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे आपले बीट सर्वोत्तम राहिल्याचे सांगून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन शिक्षक अक्षय ढोके यांनी केले तर आभार दत्तप्रसाद पांडागळे यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .