नियुक्ती ते सेवानिवृत्ती; सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे 'रेकॉर्ड' आता एका क्लिकवर
चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी 'महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम' आता अमलात येत असून, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांचे पूर्ण डिजिटायझेशन सुरू होत आहे. या प्रणालीमुळे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व नोंदी एका ते क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
कागदपत्रांच्या फेऱ्यांना पूर्णविराम मिळणार असून, कर्मचाऱ्यांना सेवेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी आता धावपळ कार्यालयीन करावी लागणार नाही. एवढेच नाही तर सुरक्षितता आणि गोपनीयताही यामुळे राहणार आहे. वेतन, प्रमाणपत्रे आणि पेन्शन मिळण्यासही सुलभ होणार आहे. यामुळे सेवापुस्तकांमध्ये चुका होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन :
नव्या प्रणालीमुळे कर्मचान्यांचे सेवापुस्तक सुटसुटीत होणार आहे. राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांना डिजिटल स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नियुक्ती, पदोन्नती, वेतनश्रेणी, सुट्टचा, बदली, शिस्तभंग कारवाई, सेवा विस्तार आणि निवृत्ती या सर्व बाबींची माहिती ऑनलाइन एकत्रित राहणार आहे.
३ नोव्हेंबरपासून डेटा एन्ट्रीला सुरुवात :
'महा ई-एचआरएमएस' प्रणालीअंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून ३ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या डेटाची नोंदणी सुरू होणार आहे. प्रत्येक कार्यालयाने विभागातील कर्मचाऱ्यांची सेवाविषयक माहिती भरण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा समावेश :
चंद्रपूर जिल्ह्यात विविध विभागांतर्गत हजारो शासकीय कर्मचारी या प्रणालीच्या कक्षेत येणार आहेत. प्रशासनाने संबंधित विभागांना प्राथमिक प्रशिक्षण आणि युजर आयडी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात सर्व सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात येईल, तर दुसऱ्या टप्प्यात वेतन, पेन्शन, आणि प्रशिक्षणासंबंधी मॉड्यूल्स जोडली जाणार आहेत.
नियुक्ती ते सेवानिवृत्ती; सर्व 'रेकॉर्ड' एका क्लिकवर :
या प्रणालीत कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतच्च्या प्रत्येक टप्प्याची नोंद असेल. त्यामुळे बदली आदेश, वेतनवाढ, निवृत्ती दिनांक, पेन्शन प्रक्रिया आणि प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध राहणार आहे.
"ही प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. अनेकदा सेवापुस्तिकातील चुकांमुळे पेन्शन थांबते किंवा वेतनवाढ अडते. आता ते टळेल. डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांना स्वतःचा सेवाविषयक इतिहास ऑनलाइन पाहता येणार आहे. चुका टाळता येईल.
-दीपक जेऊरकर, अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .