॥ झाडे बोलू लागली तर ॥
झाडे बोलू लागली तर..
त्यांनाही सांगता येतील त्यांच्या जन्माच्या कथा व आयुष्याच्या व्यथा,
झाडानाही मिळेलच की हक्क त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा,
अन त्यांच्यावर वार करणाऱ्या प्रत्येक कुऱ्हाडीला नाही म्हणण्याचा..
झाडांवरही होतंच असतो की दरोरोज अत्याचार,
कुणीतरी कुस्करतो एखाद्या नवजात कळीला,
तर कुणी चुरगाळतो वयात आलेल्या वेलीला,
हल्ली तरण्याबांड झाडांच्याही होतच असतात दरोरोज कत्तली,
पण त्यांची वकिली करण्यासाठी एखाद्या झाडाच बोलत व्हावं लागेल,
अन त्यांच्या झाड नावाच्या समाजासाठी सुद्धा
एखादा खटला लढवावाचं लागेल..
झाडं बोलू लागली तर..
एखादं गाण म्हणतीलचं पक्ष्यांसाठी,
चार शब्द आभाराचे सांगतीलही त्यांच्यासाठी राबणाऱ्या एखाद्या माणसासाठी,
पण झाडं कधीच करणार नाही भाव फांदीवरच्या फळांचा,
अन कधीच सांगणार नाही हक्क झाडाखालच्या सावलीचा..
झाडं कायम बोलत राहतील समानतेची भाषा,
झाडं दाखवत राहतील उजाड माळरानावर जगणाच्या आशा,
झाड कधीच सांगणार नाही त्यांची धर्म जात अन पंथ
झाडांचा विचार समजला तर त्यातच दिसेल एखादे संत..
- विकास रमेश नवाळे
(उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CPTP 3 A) स्टेप अप दिवाळी अंक २०२५ मधून साभार
चला ऑक्सीजन पेरुया : एक अभियान !
( संकल्पक : यादवपुत्र रमेश मुनेश्वर )


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .