मोडकळीस आलेला समाज शिक्षकच उभा करू शकतात.. सेवापूर्ती समारंभात डॉ नांदेडे यांचे प्रतिपादन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      मोडकळीस आलेला समाज आणि सामाजिक मूल्ये व्यवस्था  पुन्हा नव्याने उभी करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकांमध्येच आहे .  असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे  यांनी  केले आहे . ते समता विद्यालय उस्मानानगर ता. कंधार येथील प्रा. नागोराव लोंढे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात  प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते . पुढे बोलताना ते म्हणाले  की , आज  युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत .  सामाजिक सौहार्द  , बंधुभाव, एकता,  आणि समता  संपण्याच्या  मार्गावर आहेत अशा सामाजिक अधोगतीमधून समाजाला बाहेर काढण्याची शेवटची आशा म्हणजे    शिक्षक असतात . आज सेवानिवृत्त होणारे प्रा नागोराव लोंढे हे अशा शिक्षकांचे प्रतिनिधी असल्याचे नांदेडे यांनी प्रतिपादन केले .


     समता विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर  जहागिरदार  यांच्या अध्यक्षतेखाली समता विद्यालयात हा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला . प्रतिमांना पुष्प प्रदान करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक देशमुख यांनी केले . सेवानिवृत  शिक्षक प्रा. नागोराव  लोंढे  यांचा भव्य सन्मानाने  सत्कार करण्यात आला . 


    प्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ जगदीश कदम यांनी  शिक्षकांच्या जीवनाचा यशोपट त्यांच्या निष्कलंक कार्य कर्तृत्वात  असल्याचे सोदाहरण पटवून सांगितले . प्रा. विश्वास पांडे यांनी नागोराव लोंढे यांच्या विद्या व्यासंगाचे कौतुक करून त्यांच्या संवेदनशीलतेचा गौरव केला . अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव  कपाळे यांनी  लोंढे सरांच्या नम्र विनम्र वर्तनात त्यांच्या संस्कार सामर्थ्याचे गुपित असल्याचे सांगितले . सत्कार मूर्ती प्रा नागोराव लोंढे यांच्या दोन्ही  कन्यांनी भावनेने ओथंबलेले विचार व्यक्त करून श्रोत्यांच्या नेत्रात अश्रू उभे केले . प्रा नागोराव लोंढे यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची भक्कम उभारणी करण्यात आपली मानवी जीवन मूल्यांवरील अढळ श्रद्धा उपयोगी पडल्याचे विशद केले .


आपल्या अध्यक्षीय भाषणात श्यामसुंदरराव जहागिरदार यांनी प्रा  लोंढे यांच्या कुशल अध्ययन अध्यापनामुळेच विद्यार्थ्यांच्या  जीवनात चैतन्य फुलल्याचे सांगून लोंढे यांना शतायुषी होण्याचा आशीर्वाद दिला .  या प्रसंगी  तुकाराम वारकड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक  कौन्सलये ,  प्रा मकडूम शेख  आदींनी समायोचित भाषणे केली .  या प्रसंगी  मुकुंदराव कुलकर्णी, माजी सभापती आनंदराव शिंदे, प्रा. शेळगावकर, प्रा. पी एन कोलारकर, धनंजय बोरगावकर,  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक जयवंत काळे,  शंकरराव काळे, विश्वनाथ पांडागळे , गोविंदराव कौन्सलये, माजी सभापती लक्ष्मीबाई घोरबांड , पुंडलिकराव पाटील , परिसरातील पत्रकार  गणेश लोखंडे,  सूर्यकांत माली पाटील, माणिक भिसे, लक्ष्मणराव कांबळे  आदी पत्रकार , शिक्षक, सरपंच , नागरिक आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झालेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन परशुराम  कौशल्ये यांनी केले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी आभार प्रदर्शन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)