जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ,रहाटोली जिल्हा ठाणे आणि अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ कोकण विभागाचा उपक्रम
ठाणे ( अनघा जाधव ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ कोकण विभाग आयोजित व जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था ,रहाटोली जिल्हा ठाणे यांच्या सहकार्याने मराठी भाषासंवर्धन पंधरवडा निमित्त खास कार्यक्रम 'आम्ही संवर्धक मराठी भाषेचे' हा कार्यक्रम 2 फेब्रुवारी 2021च्या शुभ संध्याकाळी जल्लोषात संपन्न झाला.
सुर्यफुलांशी ज्यांचे नाते
त्यांनी थोडा उजेड द्यावा
युगायुगाचा अंधार जेधे
पहाटेचा गाव न्यावा
खरोखर कुतुहलाच्या झाडाला वाढवत उगवत्या ताऱ्यांची मशागत करणारा शिक्षक स्वतःही प्रशासकीय, साहित्य, गायन, वादन अशा विविध क्षेत्रात लीलया मुशाफिरी करून स्वतःची वेगळी ओळख समाजाला करून देतो , अश्याच बहुआयामी सहा व्यक्तिमत्वाच्या मुलाखती अन प्रतिभावंत शिक्षक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नटराजमोरे सर यांच्या शुभहस्ते झाले .कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जिल्हा प्रशिक्षण संस्था ठाणेचे प्राचार्य श्री भरत पवार सर तर स्वागताध्यक्ष होत्या कोकण विभाग अध्यक्षा सौ. हर्षल साबळे मॅडम कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर आणि समर्पक असे प्रास्ताविक कवयित्री गायिका संगीतकार , अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या उपाध्यक्ष माननीय शालिनी मेखा मॅडम यांनी केले ,कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय नटराज मोरे सर यांनी सहज सोप्या पण मनापासून व्यक्त केलेल्या शब्दांमधून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या . महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांना एकत्र करून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं अतुलनीय कार्य करणारे मोरे सर यांच्या शुभेच्छांमुळेच चा पुढचे चार तास हा कार्यक्रम रंगला.
तद्नंतर कोकण विभागातील शिक्षक व साहित्यिक म्हणून आपली ओळख दर्शविणाऱ्या लेखक कवींच्या पुस्तक प्रदर्शनाचा योगायोग जुळवून आणला होता चित्रफितीद्वारे , साहित्यिक आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रतिमा आणि त्याचबरोबर अतिशय समर्पक विवेचन केलं सुमधूर ओघवत्या शैलीत सौ.सुनीता बोरस मॅडम यांनी.
यानंतर सुरू झाला मुलाखतींचा सिलसिला... शिक्षक ही मूळ ओळख कायम ठेवून अनेक प्रांतात लीलया मुशाफिरी करणाऱ्या सहा व्यक्तिमत्त्वांचा वेध लागोपाठ घेतला गेला .यात जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.भरत पवार सर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले निवेदिका श्रीमतीविद्या शिर्के मॅडम यांनी. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ...
..होय पण प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आज प्राचार्यपदी पोहोचलेले सन्माननीय श्री.भरत पवार यांचा प्रवास मनाला भावला यात शंकाच नाही.
साहित्य अभिनय,कथा नाटक ,समाजसेवाअशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवनाऱ्या सौ कविता मोरवणकर यांची मुलाखत घेतली निवेदिका सौ.अनघा जाधव यांनी.तुम्ही आव्हानावर स्वार होऊन स्वयंप्रकाशी व्हा असा संदेश कविता मॅडम यांनी देऊन आपण मराठी भाषेसाठी विविध आगळेवेगळे उपक्रम राबवतोय त्यांचाही आढावा घेतला
पुढचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं डॉक्टर गंगाराम ढमके सर त्यांचं शिक्षण, phd चा प्रवास उलगडत नेला निवेदिका सौ.छाया शिंदे मॅडम यांनी, छोट्या छोट्या प्रश्नांतून. मुलाखतीचा शेवट सरांनी एका सुंदर कवितेने केला.
आवाजाच्या माध्यमातून हृदयाचा ठाव घेता येतो अभिवाचन करून .या अभिवाचनाच्या क्षेत्रांत लीलया मुशाफिरी करणाऱ्या , अगदी ग्रामीण भागातील मुलांना कथाकथनात खिळवून ठेवणाऱ्या श्रीमती सुचिता आरज मॅडम यांचा अनोखा प्रवास समोर आणला निवेदिका सुनिता बोरसे यांनी .
शिक्षक हा केवळ अध्यापन करत नाही तर मुलांची दुनिया ही रंगमय करतो ,संगीतमय करतो याचा प्रत्यय आम्ही घेतला पुढचं अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री. जयवंत गंधकवाड सर यांच्या मुलाखतीमधून. कोकण विभाग अध्यक्ष ,कार्यक्रमाच्या आयोजक आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला त्या सन्माननीय सौ.हर्षल साबळे निवेदकाच्या*भूमिकेत होत्या. संगीतमय सुरुवात झाली जयवंत गंधक वाड सर यांच्या बासरी वादन ,वाद्यवादनाने. एखादी संगीत रजनी सुरू आहे असाच जणू भास झाला .
संपूर्ण कार्यक्रमाला उंची प्राप्त करून दिली ती संगीत शिक्षिका गायिका सरला येवले मॅडम यांच्या मुलाखतीने.शाळेत संगीत शिक्षक किती महत्त्वाची भूमिका बजावतो आणि संगीत हे जीवनासाठी आवश्यक आहे त्याचा उलगडा करून दिला सरला मॅडम यांनी, तितक्याच प्रवाही निवेदनातून निवेदिका सुनेत्रा तांबे मॅडम यांनी रंगत आणली.सहाही बहुआयामी व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास भारावून टाकणारा अन प्रेरणा देणारा, आम्हा सर्व शिक्षकांना नवऊर्जा देणारा ठरला.
उत्कृष्ट संयोजन,आकर्षक नियोजन ,सूत्रबद्ध मांडणी, सर्वांचाच स्नेहमय समन्वय , विद्या शिर्के मॅडम यांचं ओघवते प्रवाही सूत्रसंचालन याचं सुंदर फलित म्हणजे हा कार्यक्रम होय. शेवटी कार्यक्रमाची गोड सांगता झाली ती सौ.छाया पाटील मॅडम यांच्या सुंदर शब्दांतील आभार प्रदर्शनाने.






आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .