चिवचिवणारी चिमणी प्रत्येकाला आवडणारी,दोन पावलावर टुणटुण उड्या मारत अंगणात खेळणारी व भुर्रकन उडून जाणारी चिमणी प्रत्येकाचे बालपणात आलेली असते. बाळाला भरवतांना हमखास चिऊताईचे नाव घेते, किंवा बाळाला निजवताना चिऊ काऊची गाणी गाते. आमच्याही बालपणी आमची आजी आम्हाला आजी चिमणीचे घर मेणाचे कावळ्याचे घर शेणाचे ... चिऊताई चिऊताई .दाssर उघड वगैरे गोष्टी सांगायची.
कौलारू खापराच्या वळचणीला, घरातील फोटोच्या मागे, नाहीतर कोणत्या तरी अडगळीत गवताच्या काड्या, पक्ष्यांची पिसे, धागे, कापडाचे तुकडे , चिंध्या यापासून घरटे बनवतांनाची चिवचिव चिवचिव अजुनही कानात घुमते. शाळेतील वर्गाच्या खिडकीवर वा टीनच्या खाली असलेल्या लाकडांच्या कोणाड्यात चिवचिवणाऱ्या चिऊताई, तर कधी लाईटच्या तारावर बसलेल्या चिमण्यांची शाळा, भर उन्हात बाभळीच्या झाडावरुन भिरभिरणाऱ्या चिमण्यांचा थवा आज कमी झालाय. दारात चिवचिवणारी चिमणी आता मुलांना बडबड गीतातून टिव्हीवरच दिसू लागली. पुस्तकातल्या कवितेतून अधूनमधून दिसणारी चिमणी नाहीसी होत असताना दिसत आहे.चिमणीच दार खरच कायमचं बंद होत चाललय !
होय ,अगदी बरोबर. चिमण्यांची संख्याच घटू लागली .लोकसंख्या वाढ, वृक्षतोड,शेतीतील खताचा व किटकनाशकांचा अतीवापर, अन्नाची अनुपलब्धता, शहरीकरण, सिमेंटचे जंगले, नागरीकांचे पक्ष्यांबद्धलचे अज्ञान, वाढते आधुनिकीकरण, पर्यावरणाचे असंतुलन, वाढते तंत्रज्ञान ,मोबाईल टॉवरमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी अशा कारणामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
चिमणी भारतात आढळणाऱ्या पक्षांपैकी एक पक्षी. माणसांच्या अगदी जवळ राहणाऱ्या या पक्ष्यांचे मुख्यतः दोन प्रकार एक *गाव चिमणी* व दुसरी रानचिमणी. गाव चिमणीचे शास्त्रीय नाव पॅसर डोमेस्टिकस, लांबी साधारणतः १६सेमी व वजन१६- ३९ ग्रॅम असते. चिमणीचे मुख्य अन्नधान्य,अळ्या, किटक, सुरवंट, नाकतोडे वगैरे.
नरचिमणी- नरचिमणीचे डोके राखाडी रंगाचे, गळा व डोळ्याभोवतीचा रंग काळा, पाठ व पंख तांबुस काळसर रंगाची, खालची बाजू पांढरी व शेपटी गर्द तपकिरी. मादी चिमणी भुरकट राखाडी रंगाची, अंगावर काळया तपकीरी रंगाच्या तुटक रेषा, खालची बाजु धुरकट पांढरी असते.
चोंच -तपकारी रंगाची जाड व आखूड चोच असते ती वीणीच्या हंगामात काळी होते. *पाय* पाय बारीक व तपकीरी असून पंख मजबुत नसतात त्यामुळे चिमणी आकाशात उंच व लांब भराऱ्या घेत नाही. जमीनीवर टुणटुण उड्या मारते अंडी
*रान चिमणी* या चिमणीच्या गळ्यावर पिवळा ठिपका असतो म्हणून तिला पीत कंठी चिमणी(Yellow Throated sparrow) असे म्हणतात. ही चिमणी महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक भागात आढळते.
नानाविध कारणामुळे मानवी जीवनाचा अविभाज्य असलेल्या चिमणीचे संपुष्टात येणारे आस्तित्व कायम रहावे ,आधुनिक व भावी पिढी चिमणी विसरू नये, यासाठी अनेक पक्षीमित्र, संस्था चिमणी वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. २० मार्च २०१० पासून 'जागतिक चिमणी दिवस' साजरा केला जातो.
चिमण्या मातीने आंघोळ करतात त्यामुळे त्यांच्या शरीरावरील जीव जीवाणू मातीत मिसळतात. त्यांना कोणत्याही त्वचारोगाची भीती उरत नाही. त्या धान्यासोबत मातीतले खडेही खातात. अन्न पचनासाठी खड्याचीही गरज असते. मातीशी नाते ठेवणाऱ्या
चिमणीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणही काहीतरी प्रयत्न करूया.






आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .