मुंबई ( सुषेण नरे ) :
बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाला ५० वर्षे पूर्ण आहेत. किशोरचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. माझ्या लहानपणी मी किशोर मासिक आवर्जून वाचायचे. त्यातील गोष्टी, कविता, रंगीबेरंगी चित्रं, कोडी याचा खूप चांगला परिणाम माझ्यावर झाला. वाचनाची खूप आवड असल्याने माझे बालपण समृद्ध झाले. गेल्या ५० वर्षांत किशोर मासिकाने माझ्यासारख्या अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. यानिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी 'किशोर गोष्टी' हा अभिनव उपक्रम आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. इथून पुढे वर्षभर महाराष्ट्रातील मान्यवर बालसाहित्यिक आपल्याला त्यांनी किशोरमध्ये लिहिलेली गोष्ट सांगणार आहेत. दर शनिवारी आपल्याला एक गोष्ट ऐकता आणि पाहता येणार आहे.
गोष्ट प्रत्येकालाच आवडते. तुम्ही लहान मुले तर गोष्टीसाठी कायम अधीर असता. माणूस सुखात असो की दुःखात असो, माणसाला सोबत लागते आणि ही सोबत करण्याचे काम गोष्ट करते. मुळात माणूस हा गोष्टीवेल्हाळ प्राणी आहे. माणसाने आपल्या सभोवती दिसणाऱ्या सृष्टीची गुढे उकलण्याचा प्रयत्न बुद्धीच्या साहाय्याने सुरू यातून अनेक कल्पनारम्य गोष्टींचा जन्म झाला. मुलांचे भावविश्व समृद्ध करण्यात गोष्टींची भूमिका खूप महत्त्वाची आहे. गोष्टींमुळे मुलांच्या मनाला कल्पनेचे पंख फुटतात. त्यांच्यातील साहसी वृत्ती विकसित होते. गोष्टी वाचणाऱ्यांची विनोदबुद्धी कायम शाबूत राहते. मुलांमधील कितीतरी अप्रगट सुप्त शक्तींना आवाहन देण्याचे काम या गोष्टी करतात. जीवनाकडे पाहण्याचा स्वच्छ आणि सुंदर दृष्टिकोन देण्याची ताकत गोष्टींमध्ये आहे. तुमचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या अशाच काही गोष्टी आम्ही घेऊन आलो आहोत. या गोष्टी आहेत विज्ञानाच्या, साहसाच्या, अद्भुतरम्यतेच्या, प्राणीपक्षांच्या, थोरांच्या चरित्राच्या, निसर्ग आणि मानवाच्या प्रेमाच्या, संवेदनशील मन असणाऱ्या मुलांच्या. तुमच्या सर्जनशील मनाची भूक भागवणाऱ्या आणि वाचनाचा पुरेपूर आनंद देणाऱ्या या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला नक्की आवडतील असा विश्वास वाटतो. तर मग चला सुंदर सुंदर गोष्टीच्या जगाची सफर आम्ही तुम्हाला घडवून आणणार आहोत. दर शनिवारी एक गोष्ट. नक्की ऐका, पहा 'किशोर गोष्टी' !
किशोर मासिकाला पन्नास वर्षे पुर्ण झाल्यामुळे पन्नास मान्यवरांच्या गोष्टी त्यांच्या स्वआवाजात प्रसिद्ध लेखक, लेखिका, कलावंत सादर करणार आहेत. या स्तुत्य उपक्रमास शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .