मानवी मुल्यांची जपवणुक करणारी बंजारा समाजाची होळी.. अरविंद जाधव

शालेयवृत्त सेवा
1

 



    भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. या समाजामधे अनेक जाती, पंथ, संप्रदाय आपआपल्या मान्यतेप्रमाणे विविध सण व उत्सव साजरे करीत असतात.

   राजस्थान प्रांतातून संपुर्ण भारतात विखुरलेला व स्थिरावलेला बंजारा समाज हा भारतातिल प्राचीन समाजापैकी एक आहे. या समाजामधे अनेक सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. होळी उत्सव हा बंजारा समाजाचा एक प्रमुख उत्सव आहे. पाल, होळी दहन, ढुंढ, फाग व गेर हे बंजारा होळीउत्सवाचे प्रमुख घटक आहेत.

   दांडी पौर्णिमेला 'दांडो' गाडून होळी उत्सवाच्या वातावरण निर्मितीस सुरुवात होते. साधारणतः महीनाभर तांड्यात डफड्याचे स्वर घुमू लागतात. मुळातच कष्टकरी असलेला हा समाज दिवसभर परीश्रम करून दमुन भागून आल्यानंतर ' डफडा' या पारंपारीक वाद्याच्या गजरात रात्री होळी गीते गाण्यात व नाचण्यात रंगुन जातो.

    होळी पौणिमेच्या साधारणतः चार पाच दिवसापुर्वी तांड्याचा प्रमुख 'नायक' तांड्याचा कारभारी, नसाबी, हसाबी, डायेसाणे व सर्वच पुरुष मंडळींना बोलावुन घेतो व गत दिपावली ते होळी या कालावधित तांड्यात निधन झालेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन आप्तेष्टांचे सांत्वन करुन त्यांना या उत्सवामधे सहभागी करून घेतात. ही अतिशय मानवतावादी परंपरा या समाजामधे प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यावेळी प्रथमतः या दुःखी परीवाराच्या घरासमोर तांड्यातिल लोक फेर धरून नाचत गाणी गातात.

   धरती उपर अमर नही कोई,

धरती उपर भाई रे -2 धृ

अमर वेगे रे एक चांदा रे सुर्या-2

नऊलाख तारा ओरे साथ चले, ओरे सोबत चले,

  धरती उपर भाई रे. धृ

अमर वेगे रे एक राम रे लक्ष्मण-2

नऊ लाख सेना ओरे साथ चले,

ओरे सोबत चले, 

धरती ऊपर भाई रे- धृ

 अमर वेगो रे एक सेवा रे भाया,-2

नऊ लाख गोर ओरे साथ चले,

ओरे सोबत चले,

धरती ऊपर भाई रे - धृ

   भावार्थ- 

   या पृथ्वीतलावर कोणीही अमर होण्यासाठी आलेला नाही. आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. तेंव्हा अधिक दुःख करीत बसु नका, दैनंदीन कामाला लागा, आपले दुःख विसरा आणि होळी या उत्सवात सहभागी व्हा. आपल्या कर्माने सुर्या चंद्रासारखे आपले स्थान निर्माण करा. राम लक्ष्मण, संत सेवालाल महाराज यांच्यासारखे कार्य करा तरच आपली किर्ती मागे राहील. असा संदेश या लेंगी गीतातून दिला जातो.



     अशाप्रकारे तांड्याचा नायक या परीवाराला उत्सवात सहभागी करून घेतल्यानंतर तांड्यातिल सर्व नागरीकाशी होळी उत्सव साजरा करण्याबाबत सल्ला मसलत करतो. लोकशाही मार्गाने सर्वांनाच आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. सर्वानुमते मतैक्य झाल्यानंतरच कोणताही उत्सव तांड्यात साजरा केला जातो. होळी साजरी करण्याबाबत सर्व सहमती बनल्यानंतर 'ढुंढ' साजरा करण्यासाठी इच्छुक कुटूंबाचा शोध घेतला जातो. ढूंढ केल्याशिवाय बंजारा समाजामधे होळी साजरी केली जात नाही. लहान बालकाचे ढूंढ केले जाते. सर्वसाधारणपणे राठोड, जाधव, चव्हाण व आडे कुळांच्या बालकांचे ढुंढ केले जाते तर पवार कुळांच्या बालकांच्या परिवाराच्या वतीने होळीला नारळ अपण करून होळी उत्सव साजरा केला जातो.

   पाल-

चैत्र महीन्यातिल होळी पोर्णिमेच्या संध्याकाळी पाल साजरी करण्यात येते. पवार कुळातिल लोक देवघरात अग्नी ठेवुन विशिष्ट गोड पदार्थ अग्नीला अपर्ण करून 'धपकार' देऊन आपल्या पुर्वजांचे स्मरण करतात. 'धपकार' कुटूंबातिल वयस्क पुरुषाच्याच हस्ते दिला जातो. राठोड, जाधव, चव्हाण, आडे परिवारात दुसऱ्या दिवशी सकाळी' धपकार' दिला जातो.

   मिष्ठान्न भोजन केल्यानंतर तांड्यातिल सर्व लोकं तांड्याच्या नायकाच्या घरी किंवा सेवालाल महाराजांच्या मंदीर प्रांगणात जमा होतात. या ठिकाणी सल्लामसलत करून ' डांडीया' म्हणून तांड्यातिल दोन  अविवाहीत युवकांची त्यांच्या परीवारातिल वडीलधार्या मंडळीच्या सहमतीने निवड करण्यात येते. या दोन युवकापैकी एक राठोड असणे अनिवार्य आहे. दुसरा युवक इतर कोणत्याही कुळातिल असावा. या डांडीयावर संपुर्ण होळी उत्सव ( साधारणतः तीन ते चार दिवस) संपेपर्यंत गावातिल महीला, पुरुषांना जमा करणे, पाल, होळी, ढुंढ, फाग, गेर इ. उत्सव साजरा करण्यासाठी पुर्वतयारी करून तांड्यास सहकार्य करण्याची प्रमुख जबाबदारी असते. दांडीयाची निवड झाल्यानंतर नायक स्वतःजवळील मानाचा एक रुपया पंचांना देतात. हा एक रुपया म्हणजे पंचाचे मानधन होय. या ठिकाणी नायकाचे सन्मान व आभार व्यक्त करण्यासाठी तांड्यातिल ज्येष्ठ लोक ' वांजळा' नावाचा एक गीत गातात.

वांजळा-

   अन भाईरे....

नाचते न कुदते घर गेरीया उतरे...

अन भाई आये न हुभे जरा नायकेरे दरबार.... जो....

ओरो छोरा दिनो छं रपिया पच्चीस जो....

ओरी जोरून दिने रे नऊशे री हार जो.....

आन भाई गेरीया तो दिने छ रे लाल आशिष जो...

आन भाई वर्षेन दिवाडो र होळी माता पामणी झंडा....

आन भाई रे ओरी नायकीरे चालीए लाख करोड जो....

ओरो जोडा तापयरे चाँद, सुरज जो....

आन भाई वडलासु वदनो, घुलरासु फैलजो, लिंबुडासु लहर जो, खा जो न पि जो रामराज करजो....

     या गीतातुन नायकाबाबत आदर व्यक्त करून ज्येष्ठ लोक नायकाला आपली नायकी लाखो, करोडो वर्ष चालु रहावी. चंद्र सुर्याप्रमाणे आपण प्रकाशमान रहावे. वटवृक्षाप्रमाणे आपण वृद्धिंगत व्हावे, उमर वृक्षाप्रमाणे आपल्या किर्तीचा प्रसार व्हावा. आपण प्रभु रामचंद्राप्रमाणे रामराज्य करावे. असा आशिर्वाद देतात. सर्व नागरीक पारंपारीक होळीच्या जागी वाजतगाजत जाऊन मानकऱ्याच्या हस्ते होळीच्या जागी  कु-हाडीने एक खुण करतात. व ढुंढ कार्यक्रम असणार्या परीवाराच्या घरी जातात.

   पाल ताणेरो-

एक घोंगडी घेऊन उंच ठिकाणी पाल बांधली जाते. एक लाकुड रोवुन नंतर वर साखरेचे हार घालतात. हे हार मिळविण्याचा गेरीया( पुरुष) प्रयत्न करतात तर महीला काठीने झोडपुन त्यांना प्रतिबंध करतात. या ढुंढ असणाऱ्या ठिकाणी महीला आघाडीवर असतात. स्त्रिया जात्यावर गहू दळतात. या पिठापासून पुरीसारखा ' सुवाळी' नावाचा खाद्यपदार्थ तयार केला जातो. रात्रभर महीला पुरुष या ठिकाणी नाचगाणी करतात. तयार झालेली सुवाळी एका मोठ्या परातीत झाकुण ठेवतात. भल्या पहाटे लाल रंगाच्या 'मंदरा' नावाच्या विशिष्ट कापडाचे दोर बनवुन पाच पाच सुवाळीचे दोन हार बनवुन दोन्ही दांडियांना देतात. दांडीयाच्या डोक्यावर लाल रंगाची पट्टी बांधली जाते. भल्या पहाटे दांडीया होळी दहनासाठी तांड्यातिल सर्व पुरुषांना जमा करतात.

   होळी दहन-

बंजारा समाजाची मुख्य होळी चैत्र पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुर्योदयापुर्वी साजरी केली जाते. होळी प्रज्वलित केल्यानंतर दोन्ही 'दांडीया' होळीला सात प्रदक्षिणा घालतात व सुवाळी हा खाद्यपदार्थ होळीला अर्पण करतात. यावेळी गेरीया( होळी खळणारा पुरुष) लेंगी नृत्य करतात व लेंगी गीत गायन करतात.

     लेंगी-

बावन गडेती आई छ होळी...

बोलो नायक अन गेरिया खेल छ होळी, खाव छ पोळी.

गड मंजरो धुम मचाई होळी.

     बावन गडेती आई छ होळी,-२

कारभारी गेरीया खेल छ होळी, खाव छ पोळी.

   गड मंजरो धुम मचाई होळी..

        भावार्थ-

भारतातिल बावन प्रांतातून आलेली होळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

तांड्यात सध्या होळीचीच धुम चालु असुन नायक, कारभारी व अबालवृद्ध होळी खेळण्यात रंगुन गेले असुन मिष्ठान्नाचा आस्वाद घेत आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.



   होळी प्रज्वलित केल्यानंतर सर्वजण नायकाच्या घरी येऊन गाणी गात फेर धरून नाचतात.

   लेंगी-

सौ कोसेती रे भाई सोस आये रे भाई-2

आन हुभेच रे नायकेरे दरबार भाई-2

टाटकेरी थिकरी रे ओम जळकेरो लोटा, दिजो... आदर भाव...

भांग भुंजाल रे, घुगरीरो शिदोर..2

दिजो फेरारे हाथ-2

काई ढासा तो ढासा रे

दिजो डायेरे हाथ, दिजो फेरारे हाथ.

   भावार्थ-

आम्ही शंभर मैलावरून येऊन नायकाच्या घरी उभे आहोत. आम्हाला बसण्यास सादरी( अंथरूण) घाला. तांब्याभर पाणी पिण्यास दया. नायकाने आमचा योग्य सन्मान केला पाहीजे.

आम्हाला पिण्यास भांग व घुगरी( उसळ) हा खाद्यपदार्थ सुद्धा सर्वांना समप्रमाणात वाटला पाहीजे. असा प्रेमळ व हक्काचा आग्रह नायकाकडे धरला जातो. चहापाणी घेऊन सर्वजण आपआपल्या घरी जातात. पुर्वजांना ' धपकार'  दिल्यानंतर मिष्ठान्न भोजन करून तांड्यातिल प्रतिष्ठिताकडून 'फगवा' ( आग्रहपूर्वक होळीसाठी रक्कम) गोळा केला जातो. दिवसभर नाच गाण्यात तांडा हरवुन जातो. लेंगी गीते ही सामाजिक एकात्मता, बंधुभाव, सामाजिक समस्या, इतिहास, संस्कृती समाजातिल थोर पुरुष, विविध रस, श्रृंगार इ. विषयावर आधारलेली असतात.

  ढुंढ-

दिवसभर तांड्यात होळी खेळून सर्व महीला पुरुष ' ढुंढ' असलेल्या घरी दुपारी चारनंतर एकत्र येऊन ढुंढ साजरा करतात.

पाल उभारलेल्या ठिकाणी जागा सारवुन घेतात. या सारवलेल्या जागेवर चोखो( पिठ व कुंकू च्या सहाय्याने एक वर्तुळ काढुन एक आडवी व एक उभी रेषा मारून वर्तुळाचे चार भाग करतात ) हा चोखो म्हणजे गोल पृथ्वी व त्यावरील चार प्रमुख खंड होय. या चार खंडात प्रत्येकी पाच सुवाळी ठेवतात. चार खंडाच्या मध्यभागी बालकास बसवुन सभोवती आई, आजी किंवा इतर स्त्रिया बसतात व वरून 'वखरा' नावाची एक विशिष्ट चादर पांघरतात. वरून एक मोठा भाला पुर्व पश्चिमेस पकडतात. पुरुष मंडळी या भाल्यावर छोट्या काठ्या मारत एक गाणे म्हणतात.

   पहली फागन लागी छ.

चैत्रेमाई बाळे होळी,

दांडीयारो हुयो त्योहार,

देश परवाना देखन आवे,

भाईपणा देखन आवे,

बैठी साँस पांव धरावे,

बैठो ससरो नमन करावे,

वो ही रीत भगवान बनावे.

पहलो बेटा नायकी करे,

दुसरो बेटा कारभारी करे,

तिसरो बेटा गईया चरावे.

     सिख छ  शिकाव छ,

सिखे राज घडाव छ

सिखे जेरी सात पोळी, ज्ञान पोळी

   हे गीत सातवेळा म्हणतात.

भावार्थ-

चैत्र पौर्णिमेला आम्ही होळी उत्सव साजरा करीत आहोत.

बालकाला शिकवण व आशिर्वाद आम्ही देत आहोत. ढुंढ हा बालकाचा त्यौहार आहे. आयुष्यात संपुर्ण देश फिरून जीवन जगण्यासाठी ज्ञान व अनुभव मिळवा. वडीलधार्याचा आदर व सन्मान करा हिच रीत मानवाला देवत्व मिळवुन देते. विविध क्षेत्रात नेतृत्व करा. परिवारात बंधुभाव असु द्या. प्रत्येकजण आपली जवाबदारी स्विकारा. शिक्षण घ्या, शिक्षणानेच आपले कल्याण होईल. शिक्षित व्यक्तीच जगावर राज्य करू शकतो.

यानंतर ढुंढ असलेल्या बालकाच्या परिवाराच्या वतीने संपुर्ण तांड्याला आपल्या ऐपतीप्रमाणे गोड स्नेहभोजन देण्यात येते. आप्तेष्ट या बालकास वस्तु व वस्त्ररूपात भेट साहीत्य देतात.

    संध्याकाळी तांड्याची नायकीण सर्व महिलांना सोबत घेऊन 'आज मारो बाळा होळी धोकेन जारो...' हे गाणे म्हणत होळीच्या ठिकाणी अग्नी शांत झाल्यावर या बालकाला गायनवादन करीत घेऊन जाते व होळी मातेचे दर्शन बालकासह सर्वजण घेतात. होळीच्या राखेला पवित्र समजले जाते. सर्व महीला ही पवित्र रक्षा थोड्या प्रमाणात घेऊन घरी येतात व वर्षभर घरात ठेवतात.

   फाग-

तिसऱ्या दिवशी सुर्योदयाच्या वेळी 'दांडीया' शुद्ध पाणी घेऊन होळीच्या ठिकाणी जातात तेथिल पवित्र राख पाण्यात मिसळून सर्वप्रथम नायक व नायकीन यांच्या अंगावर हे मिश्रित पाणी सन्मानाने टाकुन पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतात. दांडीया व तरुण मुले वाजतगाजत संपुर्ण तांड्यात प्रत्येकाच्या घरी जाऊन सन्मानाने वडीलधार्या मंडळींच्या अंगावर हे पाणी टाकुन नतमस्तक होवुन आशिर्वाद घेतात. त्यानंतर साधारणतः दुपारपर्यंत  महीला पुरुष, लहानथोर मंडळी फाग खेळण्यात, एकमेकांना रंग लावण्यात रंगुन जातात. दिवसभर श्रृंगारीक गाणे महीला पुरुषांकडून मर्यादेचे पालन करून गायली जातात.

   लेंगी-

उठ परभाती केवडा( वासरू) छोडी, कांदळा( कुत्रा) मारो ये कान,

आबकान मनावतून लागी घनी वेळा, केकडा गे घने दुर,

रणस तलावती, रायमल गुंदळा,

केकडा गे बारदान.

माथेप झारी, हातेम फुलिया,

वलटो फरती चाल,

काळो वावर छ न खेचडी रो झाड छ, छाया देखन बेस.

उँचे घलादु जंगी डागळो ये जोगणी, निचे होळारो ये खेत.

हाडीया हाडीया करतु, लागी घनी वेळा, कागला खा गये खेत.

आठशे कर्हाडी न नऊशे विजळी,

दोयेरी घलादु ये वाड.

वाडेरी हाटको कोनी मारो सोबिया, आन पडो समीं सांज.

    एक केरो येमजा, दुजा केरो पेमजा, इम किम आये रे तम?

आये हुए तो भलो काम किदे, छेटी छेटी रीजो रे तम,

सात पाँच भाई री बहन छू रे होळीया, माथो लिय रे तोड.

सात पाँच भाई मारो काई करीय, घेरी दियाये छोड.....

    भावार्थ-

तरुण तरुणीला उद्देशुन म्हणतात

    सकाळी उठल्याउठल्या तु वासरू सोडलीस आणि कुत्र्याने कान झटकले( कुत्रा कान झटकणे हा येणाऱ्या संकटाचे संकेत देतो) या अपकुशनाबाबत जाणकाराकडून माहीती घेण्यात खुप उशिर झाला आणि वासरे खुप दुर गेलेली आहेत. तलावाच्या काठावरील हिरवागार चारा खावुन व थंडगार पाणी पिऊन वासरे तृप्त झालेली आहेत.

    डोक्यावर पाण्याचे भांडे व हातात फुलिया नावाचे वस्त्र घेऊन तु ऐटीत चालली आहेस.

तुझ्या काळ्या कसदार शेतात हिरवागार मोठा वृक्ष आहे. या वृक्षाची सावली पाहून तु बस.

शेताची राखण करण्यासाठी मी तुला उंच मचाण घालून देईन त्यावरून तु खालील हरभर्याच्या शेताची राखण करू शकशिल.

पाखरं हाकलण्यास तुला उशिर झाला असुन पक्षांनी शेताचे नुकसान केले आहे.

   माझ्या सर्व मित्रांना बोलावून आठशे कुर्हाडीने तुला पिकाच्या रक्षणासाठी काट्याचे कुंपण करून देईन..

ती तरुणी या  दोन तरुणांचा सुप्त डाव ओळखून म्हणते.

       तुम्ही इकडे कोठे आलेले आहात? बरं आलात तरी हरकत नाही परंतु माझ्यापासून तुम्ही दुर रहा कारण मी पाच सात भावांची एकुलती एक बहीण आहे. तुम्ही मला त्रास दिलात तर माझे भाऊ तुमचे मुंडके उडवतिल.

   यावर तरुण मुले म्हणतात

       तुझे भाऊ आमचे काहीही करू शकणार नाहीत कारण आम्ही युद्धशास्रात निपुण असून त्यांची व्युव्हरचना आम्ही तोडू शकु...

    गेर-

 गेर साजरा करून बंजारा होळीउत्सवाचा समारोप होतो. तांड्यातून होळी उत्सवासाठी जमा केलेला 'फगवा' व गेरसाठी समप्रमाणात जमा केलेला निधीचा हासाबी व्यक्ती पंचासमक्ष हिशेब मांडतो. या पैशातून तांड्याच्या सार्वजनिक गरजा उदा. स्वंयपाकाची भांडी इ. साठी काही निधी राखून ठेवतात व उर्वरीत पैशातून बोकड खरेदी करून रानात एखादया झाडाखाली मटनाचे समान वाटे तयार करतात. यावेळी गरीब, श्रीमंत वा कसलाही भेदभाव न करता सर्वांना समान वाटा दिला जातो. यातून समानता हा गुण दिसुन येतो. नायक सर्व तांड्याला जोडून ठेवतो म्हणुन नायकास सन्मानाने सांध्याचे हाड( घुंडीवाळो हाडका) दिला जातो.

    अशाप्रकारे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक एकात्मता, सर्वसमावेशकता इ. सामाजिक मुल्यांची जोपासना करणार्या बंजारा होळी उत्सवाचा शेवट होतो.

      


   -अरविंद एस. जाधव  

   पानोळा ता. माहूरगड जि.नांदेड

    भ्रमणध्वनी - 8830296867

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा