क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
सावित्रीमाई .....!
सावित्रीमाई,
तू लावलीस आग अविद्येच्या अनर्थाला आणि
प्रश्नांचं घनघोर आभाळ जळत गेेलं
इथल्या शोषणाचं शास्त्र हळूहळू कळत गेलं
तू उपसत राहिलीस कसोशीनं
यातनांचा सनातन गाळ
कोंडवाड्यांचे तोडून कडीकोंडे
तू दिलंस स्त्रीजातीला मुक्तीचं आभाळ
तुझ्यावर शेण-गोट्यांचा मारा करणाऱ्यांना
तू कधीच दिला नाहीस भाव
बुद्धीचं अपहरण करणाऱ्यांचे
तू उधळत गेलीस प्रत्येक डाव
ज्योतिबा होते सूर्य
तू नव्हतीस फक्त त्यांची सावली
तू एक स्वयंप्रकाशित तेजोगोल
तुझ्या काळजात होती
ममतेची अतोनात ओल
करुणेच्या धाग्याने
तू निरंतर विणत राहिलीस
मानवतेचं तलम वस्त्र
तुला कधीच पराभूत करू शकलं नाही
इथल्या क्रूर व्यवस्थेचं कोणतेच अस्त्र
पुरात वाहून टाकली तू संस्कृतीची जुनाट जळमटं
क्षितिजाच्या तप्त रेषेवर
तू ठेवलीस संघर्षाची बाराखडी आणि
उगवणारा प्रकाश खात्रीचा झाला
रस्ते असेही असतात जे कधीकधी मागे फिरतात
पण तू दिलीस दिशा अशी की
वाटाच पुढं पुढं धावत येतात
सावित्रीमाई, तुझं पूर्णविराम नसलेलं जगणं
वर्तमानातही आहेच आहे
आसमंत आता ही जरासा काळवंडून आहेच आहे
म्हणून मी नोंदवून ठेवला आहे तुझा पत्ता
माझ्या मुलींच्या मेंदूवर
त्यांच्या भविष्याबाबत निर्धास्त राहायला
आता मला काय हरकत आहे ?
- राजेंद्र गोणारकर
.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .