नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शिवजन्मोत्सव २०२१ च्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच भोकरच्या जि.प.कें.प्रा.शा.नूतन शाळेत पार पडला. या बक्षीस वितरणासाठी उपविभागिय अधिकारी डाॅ.राजेंद्र खंदारे, केंद्रप्रमुख बालाजी पडलवार, मुख्याध्यापक मारोती पट्टेवाड, माजी मुख्याध्यापक आनंदा नागलवाड यांच्यासह नूतन शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या गुणवत्ता व गौरवगाथेबाबत सांगताना यावर्षी स्काऊट्स राज्य पुरस्कार चाचणी शिबिरासाठी शाळेतील चार विद्याथ्यांची निवड झाल्याची माहिती त्यांना दिली. तेव्हा अतिशय उत्स्फुर्ततेने त्यांनी सहभागी स्काऊट आदित्य अविनाश जाधव आणि स्काऊट मास्टर श्रीकांत द. गोरशेटवार यांचा यथोचित गौरव केला. पुढे आपल्या मार्गदर्शनात बोलताना त्यांनी सांगीतले की,"स्काऊटची शिकवण हा व्यक्तिमत्व विकासाचा खरा पाया आहे. बालवयात मिळालेले संस्कारमोती जीवन यशस्वी करताना उपयोगी पडतात. जिल्हा परिषदेच्या शाळेतून राज्य पुरस्कारासाठी निवड होणे ही मोठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे."
"उपविभागिय अधिकारी डाॅ.राजेंद्र खंदारे यांनी उत्स्फुर्ततेने घेतलेली दखल नूतन शाळेतील सर्व स्काऊट्सना निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात काही शंका नाही." अशी प्रतिक्रिया स्काऊटमास्टर श्रीकांत द. गोरशेटवार यांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघर्ष युवा प्रतिष्ठान, भोकरचे सर्व पदाधिकारी तसेच नूतन शाळेचे सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .