समर्थ वाणी लाभलेला शिक्षक :धनंजय गुडसूरकर

शालेयवृत्त सेवा
0



[ उपक्रमशील शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर  यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा विरभद्र मिरेवाड यांनी घेतला तो वाचकासाठी देत आहोत - संपादक ]


लेखक म्हणून वक्ता म्हणून माणसाजवळ एक सहृदय असावं लागतं आणि शिक्षक म्हणून त्याच्याजवळ संवेदना आणि विद्यार्थ्यांप्रती प्रचंड कणव असावी लागते ह्या दोन्ही बाजू ज्याला सांभाळता येतात तो शिक्षक म्हणून राष्ट्राचा सारथी आणि लेखक म्हणून इतरांच्या डोक्यात सूर्याची पिले सोडणारा कवी ठरतो..


लेखक, कवी आणि शिक्षक ही त्रिपुटी सांभाळत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि इतरांच्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचं समर्थ सामर्थ्य आणि वाणी भूषण म्हणून महाराष्ट्रात आज धनंजय गुडसूरकर यांच नाव वरच्या रांगेत प्रामुख्याने घेतले जाते.


आपल्याला कोणतीही उपाधी नको, बिरूद नको, जीवन साधं असावं ,सुंदर असावं आणि सहज असावं या तत्वज्ञानावर स्वतःचा प्रचंड आत्मविश्वास असलेला उपक्रमशील शिक्षक हा नेहमी तळमळत असतो आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे ,विद्यार्थ्यांचे हित केले पाहिजे आणि साहित्यामध्ये योगदान देऊन मराठी समृद्ध करायला खारिचा वाटा उचलला  पाहिजे आशा अनेक संकल्पना घेऊन धनंजय गुडसूरकर हे मार्गक्रमण करीत आहेत! या सगळ्या गोष्टी त्यांनी  साधना आणि सकाळ या नियतकालिकातून उजागर करत समाज वेचला आहे. लेखमाला चालवली आहे. दैनिक पुण्यनगरी मध्ये निखा-याचा प्रवास या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जीवनावर चे सुंदर भाष्य  त्यांनी सदर रूपात वर्षभर लिहीले त्यातून अनेकांना प्रेरणा ,ऊर्जा आणि जीवन जगण्याची संजीवनी मिळाली.


परिवर्तन हे काय आकाशातून पडत नाही ते निर्माण करावे लागते माणसे जन्माला येतात पण माणुसकी जशी निर्माण करावे लागते तशीच ती बाब आहे .आता समग्र देशच परिवर्तनाच्या वाटेवर ओठंगून उभा  आहे याची जाणीव धनंजय या  उपक्रमशील शिक्षकाला नक्कीच आहे म्हणून त्यांनी प्रबोधन साहित्य परिषद उदगीर मध्ये स्थापन करून  त्यांनी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले आहेत ,अजूनही घेत आहेत.याबरोबरच  साने गुरुजी कथामाला,  अंधश्रद्धा निर्मूलन, बहि:शाल व्याख्यानमाला, ग्रीन आर्मी यासारख्या माध्यमातून त्यांनी परिवर्तनाची बिजे पेरली आहेत.


त्यांचा चिवचिवाट हा कवितासंग्रह न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी या महनीय व्यक्तीच्या हस्ते प्रकाशित झालायं  त्या कवितांचं आकाशवाणीवरून क्रमशः वाचन झालेले आहे. प्रबोधन साहित्य परिषदेचे संस्थापक म्हणून कार्य करताना त्याने अनेक लेखक, कवी घडवले आहेत .पहिले जिल्हास्तरीय साहित्य संमेलन त्याने भरवलं होतं. उदगिर येथे भरलेल्या 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे  ते कार्यवाह होते .यावेळी त्यांची धडपड आणि धावपळ प्रत्येकांनी  अनुभवली आहे .त्यांनी  महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 150 व्याख्यानांचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेला. 


अखिल भारतीय साहित्य संमेलन ,मराठवाडा साहित्य संमेलन आणि अशा अनेक राज्यस्तरावर च्या साहित्य संमेलनात त्यांनी वक्ता, कवी म्हणून सहभाग नोंदवला आहे. "हॅलो ,मी शाम बोलतोय" हा एक पात्री भन्नाट प्रयोग  धनंजय गुडसूरकर यांनी मोठ्या नेटाने चालवला! उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी स्नेहसंमेलन, भित्तीपत्रके, शैक्षणिक सहली, शाळेत बचत बँक अशा अनेक उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांचे जीवन जीवननिष्ठेनी भारावून टाकले आहे. केवळ प्रश्नांची उत्तर देणारी माणसं कोणालाही  आवडत नाहीत तर प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचे उत्तर शोधणारी माणसं आवडतात ते  काम गुडसूरकर सर  करतात. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचं स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांच्या गळी उतरेपर्यंत चिंतन मांडणारा हा  शिक्षक  विद्यार्थ्यांच्या जीवनाचा दिशादर्शकसूचकच आहे.


भोळ्या वाटणाऱ्या या माणसांची ताकद मोठी जबर आहे. अशी माणसं कधीच जीवनात घायाळ होत नसतात,अपराधी भावनेनं जगतं नसतात, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता समाजाचं हित जिथं आहे  तिथे झगडतात मग ते वळून मागे पाहत नाहीत !धनंजय  गुडसूरकर शिक्षक म्हणून जेवढे मोठे आहेत, साहित्यिक म्हणून  ज्या उंचीचे आहेत त्याहीपेक्षा माणूस म्हणून ते अती उंचीचे आहेत ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.


ग्रामीण भागात सेवा करणारा हा शिक्षक हरघडी विद्यार्थ्यांना आपल्या जवळचा वाटतो कारण विद्यार्थ्यांना त्यांनी मैदानी खेळ शिकवले ,त्याचबरोबर शहरांमध्ये भरणाऱ्या दीपावली अंकाचे प्रदर्शन त्याने स्वतःच्या शाळेत भरविले , केंद्रस्तरावर व  शाळास्तरावर त्यांनी श्यामच्या आईचे पारायण केले आहे. रक्तदान, पूरक वाचन आणि बालमहोत्सव घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्याने वाव दिला आहे. समाज आरोग्याने बाधित होऊ नये म्हणून त्याने निर्मल संदेशयात्रा काढलेल्या आहेत .ओझोन वायूचा थर कमी होऊन पृथ्वीचे संतुलन बिघडू नये म्हणून  त्यांनी पर्यावरण जनजागृती केली. पाणी हेच जीवन आहे, हा अनमोल संदेश विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये ठसावा यासाठी त्यांनी जलसाक्षरता निमित्ताने कृतियुक्त व्याख्याने दिली आहेत .. महाद्वारातून घडणारे विठ्ठलाचे दर्शन हे प्रत्येक वेळी माणसाला भुरळ घालणारे  आहे, नित्यनूतनच  आहे पण आपल्या आई भोवती परिक्रमा घातलेली त्रिभुवनाला परिक्रमा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं हा भाव मनामध्ये बाळगून ..

आई माझा गुरु ।।

आई कल्पतरु।।

सुखाचा सागरू ।।

आई माझी ।। 


हे साने गुरुजींचे तत्वज्ञान एक शिक्षक म्हणून, एक लेखक म्हणून, वक्ता म्हणून धनंजय गुडसूरकर विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत ."शरीराला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा  मनाला घाण लागू नये म्हणून जपत जा हा शामच्या आईचा चिरंजीवी आणि  चिरंतन  संदेश आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये ठसविण्याचा आटोकाट आपल्या शैक्षणिक कौशल्याने, बुद्धिमत्तेने आणि  अनेक विविध शैक्षणिक साधनांच्या रूपाने आविष्कृत  करण्याचा पराकोटीचा प्रयत्न धनंजय गुडसूरकर नावाचा कल्पक शिक्षक करतो ही शैक्षणिक क्षेत्रात मोठी जमेची बाजू आहे.. हॉस्पिटलमध्ये जाऊन   नातेवाईकांसाठी धावपळ कोणीही  करेल, स्वतःच्या कुटुंबासाठी ही करेल परंतु विद्यार्थ्यांनी दवाखान्यात असताना धावत पळत जाऊन रक्तदान करणारा हा शिक्षक खरोखरंच समाजशिक्षक  आहे..


कुठेतरी आपण केलेल्या कार्याची पावती मिळतं असते असं म्हणतात खरंच हे सत्य आहे ! फळाची अपेक्षा न करता केलेले कर्म हे कर्मसिद्धांतामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे हे गीतेने सांगितले आहेच .


मला वाटतं हेच धनंजय गुडसूरकर यांच्या बाबतीत घडलं असावं, त्यांच्या ह्या समस्त कार्याची आणि कर्तृत्वाची, शैक्षणिक कामाची  आणि साहित्यविषयक दृष्टिकोनाची दखल घेऊन त्यांची  महाराष्ट्र शासनाने  महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी  निवड केली आहे! खरोखरच या वर्षी आपणा सोबतच महाराष्ट्र शासनानेही ही धनंजय गुडसूरकरांना वाढदिवसाची  दिलेली गिफ्टच आहे !!धनंजय सर याही समितीवर आपला अमीट ठसा उमटवून कार्य करत राहतील आणि त्यांची कारकीर्द अशीच उत्तरोत्तर बहरत राहो!! या ज्ञानपुजक साधकाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!


- वीरभद्र मिरेवाड

शिक्षक, नायगाव (बा) जि.नांदेड

9158681302

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)