भारताच्या इतिहासाच्या पानांवर अक्षरशः हजारो लोकांनी गर्दी केली आहे पण त्यात एक नाव सूर्यासारखे तळपून दिसते ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांचे होय. अवघ्या अठरा महीन्यांचा पंतप्रधानपदाचा त्यांचा कार्यकाळ भारताला प्रेरणा देणारा आहे.त्यांचा जय जवान जय किसान हा नारा अजरामर झाला.त्यांनी सैनिकांना दिलेला मरो नही मारो हा संदेशही दिला. त्यांचा अगदी थोडक्यात घेतलेला हा एक छोटासा आढावा.
लालबहादुर शास्त्री यांचा जन्म इ.स.१९०४ मध्ये मुगलसराय (उत्तर प्रदेश) मध्ये मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव यांच्या घरी झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांना सर्वजण मुंशीच म्हणत.त्यांनी काही दिवस लिपिक (क्लर्क)म्हणून सूध्दा नौकरी केली .लालबहादुर शास्ञी यांच्या आईचे नाव रामदुलारी होते.कुटुंबात ते सर्वात लहान असल्यामुळे त्यांना सर्वजण नन्हाच(छोटा) म्हणत. जेव्हा ते दिड वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडीलांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर लालबहादुर शास्त्री यांच्या आई त्यांना घेऊन माहेरी आपल्या वडीलांकडे गेल्या.तेथेच मिर्झापूरला शास्त्रीजींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.त्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण हरिश्चन्द्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठात झाले . काशी विद्यापीठात त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली.त्यानंतर त्यांनी जातीवाचक श्रीवास्तव या नावाला कायमची मुठमाती देऊन शास्ञी हेच नाव धारण केले.
सन 1928 मध्ये त्यांचा विवाह मिर्जापुर येथील गणेशप्रसाद यांची मुलगी ललिता यांच्याशी झाला. ललिता शास्त्री यांच्या पासून त्यांना सहा अपत्ये झाली .त्यात त्यांना दोन मुली कुसूम, सुमन आणि चार मुले हरिकृष्ण, अनिल, सुनील व अशोक त्यांच्या पैकी अनिल शास्त्री आणि सुनील शास्त्री हे दोघेच जीवंत आहेत.
एकदा लाल बहादूर शास्त्री एका संमेलनासाठी मोटारीतून चालले होते. एका खेड्याजवळ लोकांनी त्यांची मोटार अडवली. शास्त्रीजींनी मोटार थांबवली त्यांनी चौकशी केली. त्यांना कळले की या गावातील एक बाई अत्यंत आजारी आहे तिला ताबडतोब शेजारच्या गावातील रुग्णालयात पोहोचवणे अत्यावश्यक आहे. म्हणून त्या लोकांनी गाडी अडवली होती बाईला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी विनंती करत होते. शास्त्रीजी बरोबरचे लोक म्हणाले "नको नको आम्हाला संमेलनाला जायचे आहे आम्हाला उशीर होईल". पण शास्त्रीजी मात्र म्हणाले मित्रहो संमेलनांपेक्षा माणसाची किंमत अधिक आहे. मी संमेलनाला उपस्थित राहिलो नाही तर विशेष काही बिघडणार नाही. बाईचे प्राण वाचले पाहिजेत तुम्ही दुसरी गाडी मागुन घेऊन पुढे जा मी बाईंना पोहोचवून येतो. तेव्हा मित्र म्हणाले नको नको आपण यांना रुग्णालयात पाहून मगच पुढे जाऊ.लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू नंतर पंतप्रधान झाले.त्याच काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
६- जानेवारी १९६६ लाहोरपासून भारतीय सैनिक केवळ दोन तासाच्या अंतरावर होते. जर भारतीय सैनिकांना २-३ तासाचा वेळ मिळाला असता तर पाकिस्तानवर भारताचा तिरंगा फडकला असता. पण त्याच वेळी पाकिस्तानने विचार केला की प्रत्येक आघाडीवर आपला पराभव होत आहे. त्यावेळी पाकिस्तानचे प्रधानमंत्री आणि लष्करप्रमुख यांची एमर्जेंसी मीटिंग झाली आणि आपण आणखी वेळ घालवला तर दोन-तीन दिवसात लाहोर,कराची, इस्लामाबाद, पेशावर भारताच्या ताब्यात जाईल आणि असं झालं तर पंधरा दिवसात संपूर्ण पाकिस्तान भारताच्या ताब्यात जाईल. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. लाल बहादुर शास्त्री यांनी विचार केला की पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवू त्यांनी पुन्हा डोकेच वर काढू नये.त्यांना संपूर्ण कॅबिनेट्सचाही पाठिंबा होता. सैन्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. 8- जानेवारी १९६६ ला अचानक पाकिस्तानने अमेरिकेला सांगून युद्धबंदी करण्यास सांगितले. अमेरिकेने विचार केला की युध्द रोखणे तर अवघड आहे.
कारण अमेरिकेने शास्त्रीजींना धमकी दिली होती की तुम्ही जर आमचा pL- ४८० हा लाल रंगाचा गहू घेतला नाही तर तुमचे लोक उपासमार होऊन मरतील. तो गहू अमेरिकेतील डुकरांना खाऊ घातला जात होता. तो गहू घेण्याचा करार पंडित नेहरूंनी केलेला होता. त्या काळात भारतात गव्हाची कमतरता होती. पण ज्या गव्हाला जनावर सुद्धा खात नव्हती तो गहू आम्ही घेणार नाही ही भूमिका लालबहादूर शास्त्री यांनी घेतली. अमेरिका म्हणाली तुमचे लोक उपासमारीने मरतील त्यावेळी शास्त्रीजी म्हणाले,"आम्ही स्वाभिमानाने उपाशी मरू पण अपमान जनक शर्तीवर आम्हाला तुमचा गहू नको. म्हणून त्यांनी अमेरिकेकडून गहू घेणे बंद केले. त्यामुळे देशात गव्हाची कमतरता भासू लागली. त्यावेळी शास्त्रीजीने देशवासीयांना एक आवाहन केले की सर्व देशातील जनतेने एक वेळचे जेवण करणे बंद करा. देशातील करोडो लोकांनी सोमवारी उपास करणे चालू केले. पण दुसर्या वेळी शास्त्रीजी अमेरिकेच्या दबावाखालीआले. कारण भारतातील काही नेत्यांनी पाकिस्तानसोबत समझोता करावा ही भूमिका घेतली. त्यामुळे नाईलाजाने शास्त्रीजींना समझोता करावा लागला.
११- जानेवारी१९६६ रशियामध्ये ताश्कंद करार झाला आणि त्याच रात्री लाल बहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला. एकंदरीत आपण जिंकलेली जमीन गमावली आणि अत्यंत चांगला देशाचा पंतप्रधान गमावला.जेव्हा पाकिस्तानसोबत युद्ध सुरू होतं तेव्हा शास्त्रीजींनी देशवासीयांना आवाहन केले होते की आप आपल्या घरच्या खर्चात कपात करून, बचत करा. युद्धकाळात सेव्हींगची अत्यंत आवश्यकता असते. जो देश युद्ध काळात मोठ्या प्रमाणात बचत करतो तो देश यशस्वीरीत्या युद्ध लढू शकतो. म्हणून त्यांनी देशवासीयांना अपील केली की सर्व देशवासियांनी खर्च कमी करून बचत करा. त्यांनी लोकांना अपील करण्यापूर्वी आपल्या घरच्या खर्चात अगोदर कपात केली. त्यांच्या घरी एक बाई यायची कपडे धुण्यासाठी.शास्त्रीजींनी त्या बाईला सांगितले की तुम्ही उद्यापासून कपडे धुण्यास येऊ नका. त्यावेळी बाईने विचारले की मग कपडे कोण धुणार ? कारण त्यावेळी ललिता शास्त्री नेहमी आजारी असायच्या. त्यावेळी शास्त्रीजी म्हणाले, "मी स्वतःच माझे कपडे धुणार कपडे जास्त नसायचेच कपड्याच्या दोन जोड्या असायच्या. एक जोडी घालायची एक जोडी धुण्यास टाकायची. त्यांच्याकडे दोन धोतर, दोन खमीस, एक जोडी चप्पल होती. खादीची बनियान व चड्डी असायची.
त्यांनी आपल्या घरी दुसरी कपात केली त्यांच्या घरी एक बाई यायची झाडून काढण्यासाठी. घर पुसून काढण्यासाठी त्यांनी त्या बाईलाही बंद केले. त्यावेळी त्या बाईने विचारले की मग झाडून कोण काढणार ? त्या वेळी ते म्हणाले की माझ्या खोलीची सफाई मी करीन आणि मुलांना सुद्धा सांगेन की आपआपल्या खोलीची सफाई करा. जर आपण दुसऱ्यांना सांगितले तर आपण ती गोष्ट स्वतः केली पाहिजे. ही गोष्ट भारताचे राजकारणी आणि सर्वच लोकांनी अंगिकारली तर यासारखी मोठी क्रांतीच नाही. त्यांनी आपल्या खर्चात तिसरी कपात केली त्यांच्याकडे त्यांच्या मोठ्या मुलाला इंग्रजी शिकवण्यासाठी एक शिक्षक येत असे. त्यांना शास्त्रीजींनी सांगितले की उद्यापासून तुम्ही शिकविण्यासाठी येऊ नका. त्यावेळी ते शिक्षक म्हणाले की तुमचा मुलगा इंग्रजीत खूप कमजोर आहे, तो नापास होईल. तर त्याचे एक वर्ष वाया जाईल. त्यावेळेस शास्त्रीजी म्हणाले, "या देशातील लाखो करोडो मुलं नापास होतात त्यात माझा मुलगा नापास झाला तर असं काय नुकसान होईल? मी काही फार मोठा माणूस नाही. मी देशाचा एक साधारण माणूस आहे."
युद्ध चालू असताना लाल बहादुर शास्त्री यांचे धोतर फाटले होते. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की माझे धोतर शिवून दे. त्यावेळेस ललिता शास्त्री म्हणाल्या, "बाजारातून एक नवीन धोतरा आणा.त्यावेळेस लालबहादूर शास्त्री म्हणतात, "नवीन धोतराचा मी विचार देखील करू शकत नाही, मी पगार घेणेसुद्धा बंद केलेलं आहे. महीन्याला आपलं घर चालण्यासाठी किती खर्च येतो? त्यावेळेस ललिता शास्त्री म्हणाल्या, "तीनशे रुपये" लालबहादूर शास्त्री म्हणाले, "उद्यापासून अडीचशे रुपयात घर चालवा आणि शक्य होईल तर त्याच्यात सुद्धा पंचवीस रुपये कपात करा".
अशा प्रकारे त्यांनी आपल्या खर्चात कपात केली. जो की या देशाचा पंतप्रधान होता. आज तर असं करताना कोणीही दिसत नाही. आजही राज्य, देश कर्जात बुडालेला आहे आजचे प्रधानमंत्री राष्ट्रपती कधीतरी आपल्या खर्चात कपात करण्याची भाषा करतील काय? आज तर मंत्री, खासदार ,आमदार आपल्या सुविधेत तीन- तीन, चार - चार पट वाढ करून घेत आहेत कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद करून स्वतःला निवृत्तीवेतन लावून घेत आहेत.
लेखक -शंकर नामदेव गच्चे
( एम. ए. बी. एड.) जि.प. प्रा. शाळा वायवाडी केंद्र पोटा बुद्रुक ता. हिमायतनगर जि. नांदेड मोबाईल नंबर -८२७५३९०४१०


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .