ईडा पीडा टळू दे ! बळीचे राज्य येऊ दे !

शालेयवृत्त सेवा
0

 



कळायला लागल्यापासून मला एक प्रश्न पडला होता?  बळी कोण होता? पुढे शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाल्यावर  शिकवत असताना राजा बळी विषयी माहिती शोधली परंतु माहिती मिळालीच नाही. केवळ ऐकीव आठवणी ऐकायला मिळत.घरात दसरा-दिवाळी प्रमाणे प्रसंगी इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असा आशिर्वाद सुवासिनी  द्यायच्या. आताही दिवाळीत बळीच राज्य येऊ दे.अशी अपेक्षा केली जाते. या पलिकडे मात्र इतिहासात फारशी नोंद मिळत नाही. 


भारताचा इतिहास हा असाच एकांगी लेखनानी बहुजन समाजातील महापुरूषांना  इतिहासातून बेदखल केल. किंवा त्यांच्या पराक्रमावर शंकास्पद आणि बदनामीकारक शिंतोडे उडवले गेले. प्रसंगी हत्या करून कल्पनामय प्रसंग उभे करीत सामान्य माणसाचे लक्ष विचलित करण्यात आले. त्या काळात सामान्य माणूस केवळ कष्टाचे काम करण्यात रमला.  प्रस्थापितांची तळी उचलतांना त्यांना प्रश्न कधी पडलेच नाहीत. किंवा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या भाषेत सांगायचं  तर भारतातील खूप मोठा समूह स्वतःच्या डोक्याने विचार करीत नाही. तर तो कुणाच्या तरी डोक्याने किंवा पुराणांच्या जोखडाखाली जीवन जगतो.


बळी कोण होता?प्राचीन काळात हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद प्रल्हादाचा मुलगा विरोचन व कपिल. विरोचन हा पुढे जैन धर्माचा प्रथम तीर्थंकर झाला. त्यालाच पुढे वृषभदेव असेही म्हणतात. त्याने जैन धर्माची स्थापना केली आणि कपिल हा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मार्गदर्शक होता.विरोचनाचा मुलगा म्हणजेच राजा बळी होय.  भारतीय द्विपखंडात बळी हा महापराक्रमी, कल्याणकारी राजा होऊन गेला, शेतकऱ्यांचा राजा म्हणून तो प्रसिद्ध होता. अतिशय दानशूर प्रजेच्या सुखाकडे पुत्रवत लक्ष देणारा प्रजाहितदक्ष आणि कल्याणकारी असे बळीचे राज्य होते. त्याच्या राज्यात गरीब-श्रीमंत, पशुपक्षी, प्राणी,मनुष्यजण सर्वजण आबादीआबाद असे जीवन जगत होते. परंतु बळीची ही कीर्ती वामनाला पाहवली नाही. राजा बळीचे राज्य नष्ट करण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. परंतु बळी हा कल्याणकारी राजा असल्याने व  खूप मोठा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली असल्याने समोरासमोर बळीचा पराभव करणे त्याला शक्य नव्हते. 


इडा पिडा जाऊदे बळीच राज्य येऊ दे इतक्या वर्षानंतर सुद्धा आमच्या भगिनीला का म्हणावसं वाटत ?  याचा आम्ही थोडासा विचार करायला हवा, की हा बळी कोण होता?  हा बळी एवढा काय चांगला होता?  की लोकांना आजही वाटतं की बळीच राज्य यावं? एवढं काय होत या बळीच्या राज्यामध्ये?  बळी नावाचा एक राजा होता. प्रल्हादाचा नातू आणि विरोचनांचा पूत्र आम्हाला असं सांगण्यात येतं की प्रल्हाद हा विष्णुभक्त होता.ज्या प्रल्हादाला  आपण विष्णूचा भक्त  मानतो पण  पदम पुराणांमध्ये विष्णूने प्रल्हादाचा खून केल्याचा संदर्भ मिळतो. जो ज्याचा भक्त आहे त्याचा तो खून करील का ?  आम्ही वाचतच नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात  पुराणाचे अर्थ ऐकता मनात होई कासावीस जीव माझा.


प्रल्हाद हा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता.प्रल्हाद कधीही विष्णुभक्त नव्हता आणि हिरण्यकश्यपू हा कधीही एवढा कच्चा राजा नव्हता. की आपल्या प्रल्हादाला ब्राह्मणांच्या गोटात शिकवायला पाठवील. हिरण्यकश्यपू विषयी महान संत नामदेव म्हणतात दैत्य राजा थोर  महाबळीवंत जगी तो विख्यात हिरण्यकश्यपू.नामदेवांनी हिरण्यकश्यपू बदमाश असता तर थोर म्हटल असत का?  हिरण्यकश्यपू बदमाश असता तर विख्यात म्हटल असतं का ? महाबळीवंत म्हटलं  असतं का?जे असूर राज्य होते ते फार महान आणि तत्त्वज्ञानी होते. असुर म्हणजे जे सुरा घेत नव्हते, म्हणजेच सुरा नावाची  दारू पीत नव्हते त्याला असुर म्हणतात. आणि देव म्हणजेच ब्राह्मण ते सुरा नावाची दारू पीत होते. त्याला देव म्हणतात महाराष्ट्र ज्ञानकोश नावाचे पुस्तक आहे त्यात शोधा ब्राह्मणालाच देव म्हटलेलं आहे. 


बळी हा अतिशय आदर्श सुसंस्कृत राजा होता. बळीच राज्य अतिशय आदर्श होतं. एवढ्या पिढ्या झाल्या तरीही पुराणांमध्ये ब्राह्मणाला सांगावच लागतं बळी हा आदर्श राजा होता.बळीच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करीत नव्हते.  बळीच्या राज्यामध्ये प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध होता. ब्राह्मणांनाही इतक्या वर्षानंतर बळीला मारल्यानंतरही कबूल करावं लागतं बळी  किती चांगला राजा होता. जेव्हा विरोधक आणि शत्रू त्याची स्तुती करत होते  तर बळी खरोखरच किती आदर्श राजा असेल याची कल्पना येते. आम्ही आतापर्यंत ब्राह्मणाला प्रश्न विचारायला पाहिजे होता बळी जर एवढा आदर्श राजा होता तर तुम्ही त्याला का मारलं? पण आम्हाला तेवढी बुद्धीच नाही. त्यांनी लिहायचं आणि आम्ही वाचायचं. धर्मशास्त्रासाठी बळीला मारन गरजेचं होतं अस ते सांगतात आम्ही सुद्धा म्हणतो बळीला मारणं गरजेच होतं. धर्मशास्ञाप्रमाणे का गरजेचं होतं बळीला मारणं? कारण बळीच्या राज्यांमध्ये यज्ञ संस्कृतीला वाव नव्हता. बळीच्या राज्यांमध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मूर्तिपूजेला वाव नव्हता. बळीच्या  राज्यामध्ये  कुठलेही कर्मकांड करणं हा राजकीय कायद्यानुसार गुन्हा मानला जात होता. आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा करण्याचं काम बळी करत होता. म्हणून बळीच राज्य ब्राह्मणाच्या डोळ्यात सलत होतं. म्हणून ब्राह्मणांना बळीला मारणं अतिशय गरजेचं होतं.


बळीराजाचा एक दिवस असा असायचा की त्या दिवशी तो सर्वांना दान करीत असे आणि त्या दिवशी तो कुणालाही काही नाही म्हणत नसे. या संधीचा फायदा वामनाने घेतला.वामनाने एका भिक्षेकर्याचे रूप घेतले आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळच्या प्रहरी भिक्षेची याचना करू लागला. राजा बळी हा दानशूर म्हणून नावाजलेला होताच. मात्र भिक्षेकरीरुपी वामनाने कपटाने राज्याच्या हातून एकांतात तीन पावलं पुढे जावे मागे न पाहता दान द्यावे अशी अट घातली. राजा बळी स्वतःत्या भिक्षेकर्याला  कोठारात घेऊन गेला मागे न पाहता दान द्यावे ही आठ घातल्यामुळे बळीराजा पुढे पाहून दान देत असताना  एकांताचा फायदा घेऊन बळीची हत्या केली.नंतर या बाबतीत अनेक कथा रचल्या.


पाचव्या अवतारात भगवंताने माध्यम म्हणून मनुष्यरूप घेण्याचा प्रथमच प्रयत्न केला!हा  प्रयत्न एका नराधम राक्षसाठी नव्हता तर एका पुण्यवंत, धर्मशील बळीराजासाठी होता.याचा अर्थ भगवंत हा दुष्टांचा संहार करण्यासाठीच अवतार घेतो असे नाही तर पुण्यवंत आणि पुण्यशील असणाऱ्यांचाही संहार करण्यासाठी अवतार घेतो. मग प्रश्न निर्माण होतो की दुष्टांचा संहार करणाऱ्यांनी पुण्यशील,धर्मशील, असणाराचा  संहार  का करावा? अहर्निश चाललेल्या दानधर्माने म्हणे बळीराजाची  पुण्यसंपदा इतकी वाढली की तो कोणत्याही क्षणी देवांचा राजा होण्याची शक्यता निर्माण झाली. आता सन्मानाने जाऊन जर एखादा भूलोकीचा राजा स्वपराक्रमाने स्वर्गलोकी गेला तर त्याचा भगवंताने आवर्जून सत्कार करायचा की त्याला फसवून शब्दात बांधून पाताळात गाडून टाकायचे ? भगवंताच्या पाचव्या अवताराचे नाव आहे वामन. वामन म्हणजे लहान रूप.


बळीला फसवून  पाताळात लोटले असले तरी त्या प्रकरणी दिलेला शब्द पाळण्यात विजय झाला तो बळीराजाचाच. वामनाचा नव्हे! वामनाने याचना केली आहे ती तीन पावले भूमीची! आपली भूमी देण्यासाठी बळी वामनाला शोधत ञैलोक्यात हिंडत  नव्हता.जो याचना करतो तो भगवंत कसला ? आणि जो याचक आहे तो अवतार घेऊन साधणार काय? ज्याच्याजवळ तीन पावले भूमी नाही असली तरी मागितल्याशिवाय ज्याला ती मिळत नाही तो धर्म स्थापना तो  काय करणार ? तीन पावले म्हणून ज्याने बळीराजाजवळ भूमी मागितली ती खर्या अर्थाने त्याने घेतली का? तर तसे पुराने सांगत नाहीत. वामन आकाराने जरी लहान असला तरी त्याने त्याचे एक पाऊल म्हणे एका लोकाला व्यापणारे ज्याला एका पावलात सर्व भूमी पादाक्रांत करणे सहज शक्य होते त्याने मग बळीराजा कडे याचना करावीच का ? एका पावलात पृथ्वी व्यापल्यावर,दुसऱ्या पावलात आकाश व्यापल्यावर बळी राजा पृथ्वीच्या बाहेर होता का? जोतीराव तर म्हणतात दुसऱ्या पाऊलात आकाश व्यापले मग त्याची फाटली का नाही ?याचे उत्तरही मिळत नाही.


वामनाने बळीला पाताळात लोटून धर्म स्थापना केली का ? तर त्याचे नाव नको! आजही वामनाची मुद्रा समाजमनावर मुद्रांकित होण्याऐवजी बळीराजाचीच मुद्रांकित होऊन राहिली आहे.डॉक्टर आ. ह. साळुंखे सांगतात वामनाच पहिलं पाऊल म्हणजे आपल्या लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात बांधून ठेवणे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे असूर लोक ( असुर म्हणजे दारू न पिणारे आणि सूर म्हणजे दारू पिणारे म्हणजे देव) यज्ञाला का विरोध करीत होते कारण जिथे यज्ञ झाला, ज्याने यज्ञ केला ती भूमी त्यांच्या ताब्यात जायची.


 दुसरं पाऊल वेदप्रामाण्य आणि वेदांवर विश्वास ठेवायचा आणि विचार अजिबात करायचा नाही. आमच्या देशामध्ये विचार करायला अजिबात परवानगी नाही. म्हणून आम्हाला  पिढ्यानपिढ्या ब्राह्मण सांगतो डोळ्याला पाणी लावा.पण एकही माईचा लाल विचारत नाही डोळ्याला पाणी का लावा ? मम म्हणा.म्हणा तर म्हणा हे कशाचं प्रतिक आहे. तुमच्या गुलामीच प्रतिक आहे.का हा प्रश्न प्रत्येकाने निर्माण  केला पाहिजे. तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग आहे.नाहीतर तुमचं शिक्षण मग ते एम. फिल. पीएचडी  असेल तरी कुचकामी आहे.तिसर पाऊल  बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला याचा अर्थ तुमची आमची वाक्  शक्ती कुंठित केली. तुमच्या आमच्या वाणीचा अधिकार हिरावून घेतला. या देशांमध्ये स्वातंत्र्य पूर्वी बहुजनांना बोलण्याचा अधिकार नव्हता.त्यांनी लिहायचं आणि आपण फक्त मुंड्या हलवण्याचे काम करायचं.त्यांनी म्हणलं हळद-कुंकू वाहा. वाहा तर वाहा. नारळ फोडा. फोडा तर  फोडा. कशामुळे फोडा विचारायचं नाही. याचा अर्थ यज्ञान भूमी व्यापून टाकली.वेद प्रामाण्यान  तुम्हाला आम्हाला बुध्दीच गुलाम केलं. आणि वाणीवर एकाधिकारशाही प्राप्त करून त्यांनी आम्हाला गुलाम करून टाकल. 


या देशात तीन पावल कुणी कुणी झुगारण्याचा प्रयत्न केला. या देशात ही तीन पावलं झुगारण्याचा पहिला प्रयत्न केला तथागत बुद्धांनी.म्हणून आ. ह.साळुंखे यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र हे पुस्तक लिहिलं कृपया ते पुस्तक वाचा.ब्राम्हणांनी बुद्धाला विष्णुचा अवतार घोषित करून बुद्धाला संपवण्याचे काम केलं. खरं तर बुद्धांनी अवताराच्या  विरुद्ध काम केलं. पण तरीही बुध्द संपत नाहीत हे लक्षात आल्यावर बुद्धाचं तत्त्वज्ञान चोरून ते आपलंच तत्त्वज्ञान आहे म्हणून सांगायला सुरुवात केली. म्हणून प्रबोधनकार ठाकरे म्हणतात हिंदू धर्मात जे जे काही उदात्त  आणि सर्वश्रेष्ठ आहे ते बुद्दा कडून चोरलेल आहे. एवढं करूनही ते  संपत नाहीत हे पाहिल्यावर त्यांनी इथल्या मराठा बहुजन समाजाला सांगायला  सुरुवात केली बुद्ध मागासवर्गीय आहेत. म्हणजे आम्ही बुद्धा पासून दूर गेलो  पाहिजेत.आ.हा.साळुंखेच्या  पुस्तकामुळे गौतम बुद्ध हे तमाम बहुजणांचे आहेत हे कळणार आहे.यातील पहिले पाऊल म्हणजे वाणी, दुसरे पाऊल म्हणजे यज्ञ करण्यासाठी जागा, तिसरे पाऊल म्हणजे ब्राह्मणांचे अघोषित आरक्षण. 


डॉक्टर आ.हा. साळुंखे म्हणतात  वामनाने बळीराजाकडे या तीन गोष्टी मागितल्या आणि या तीन गोष्टी मध्ये बहुजनांच्या गुलामीच सगळ्यात मोठं कारण दडलेलं आहे. यज्ञ करायला जागा मागितली आणि पुढे म्हण पडली भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी. यज्ञ करायला जागाच दिली  मग त्यांनी यज्ञ यज्ञ गावागावात नेऊन पोहोचवला. तो दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे दिवाळी साजरी करता आणि मग बहीण भावाला ओवाळते आणि सांगते की ईडा पिडा जाऊदे आणि बळीच राज्य येऊ दे बळीच उरलंसुरलं सैन्य होतं प्रत्येक खंडाचा जो नायक सेनापति होता त्या उरल्यासुरल्या सैन्याला लढण्यासाठी त्यांच्या बायकांनी त्यांना ओवाळले आणि सांगितलं इडा पिडा जाऊदे बळीच राज्य येऊ दे.आमच्या बळीराजाला संपवलं आणि त्यांनी दिवाळी साजरी केली आणि आम्ही मात्र आजही आनंदाने दिवाळी साजरी करतो म्हणून आमच्या पराभवाचे क्षण डोक्यावर घेणं थांबवलं पाहिजे.आमच्या पराभवाचे क्षण आम्ही  सण म्हणून साजरे करीत असू तर आम्ही आमच्या बापजाद्यांचे वंशज म्हणून घेण्याच्या लायकीचे राहिलो नाहीत.


वास्तविक बळीचे राज्य  म्हणजे सुखाचे, आनंदाचे राज्य असा व्यापक अर्थ  होता.आपण असे  ऐकले आहे की पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता. हा कालखंड म्हणजे बळीचेच राज्य असावे. धनधान्य पैसा-अडका, गुरे-ढोरे सगळेच सुखी जीवन जगत असताना वामनाच्या कुकर्माने  बहुजनांचा राजा निघून गेल्याने प्रजाजन अखंड दुःख सागरात बुडाले.माञ बाणासुराने  सर्वांना समजावले. प्रजेच्या समाधानासाठी म्हणून त्याने सांगितले की आज पासून एकविसाव्या दिवशी बळीचे राज्य पुन्हा येणार आहे. तो दिवस बलप्रतिपदेचा होता. 

म्हणून राजा बळीच्या आठवणीसाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजात बलप्रतिपदा साजरी केली जाते. नागरी भागात पाडव्यानंतर दिवाळी संपते. पण ग्रामीण भागात शेतकरी समूहात 'बलप्रतिपदा' उत्साहात साजरी होते. व आयाबहिणी भावांना ओवाळुन आशीर्वाद देतात.

गाई-वासरानं वाडा भरु दे,

 इडा पिडा टळु दे !



 - शंकर नामदेव  गच्चे  

जि.प. प्रा. शाळा वायवाडी केंद्र पोटा बुद्रुक ता. हिमायतनगर  जि. नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०


(बळीच राज्य येऊ दे. संदर्भ - १)महाभारत एक सूडाचा प्रवास लेखक दाजी पणशीकर २.बळीवंश लेखक आ.हा.सांळुखे ३.श्रावण देवरे यांची पुस्तके)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)