शिक्षकांनो, कामाच्या वेळेत मोबाइल हेडमास्तरांकडे जमा करा!
कोल्हापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
कोल्हापूर माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी वर्गात जाताना सोबत मोबाइल नेऊ नयेत. विद्यार्थ्यांना काही आवश्यक घटकासाठी व्हिडीओ दाखवणे अनिवार्य असेल तर त्याची दैनिक टाचणामध्ये सविस्तर नोंद करून मग मोबाइल न्यावा आणि तास संपल्यानंतर तो पुन्हा मुख्याध्यापकांकडे जमा करावा अशा लेखी सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी दिल्या असून याची सध्या शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर अनेक माध्यमिक शाळांमध्ये अनेक शिक्षक तास सुरू असतानाही मोबाइल घेऊन व्हरांड्यात फिरत असल्याचे चित्र निदर्शनास आल्यानंतर आणि एकूणच जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्याकडून आवश्यक गोष्टींचे पालन होत नसल्याने डॉ. आंबोकर यांनी हे सहा पानी ३८ मुद्द्यांचे पत्र काढले असून ते सर्व मुख्याध्यापकांना पाठवले आहे. यामध्ये त्यांनी वर्षभर कशा पद्धतीने काम केले पाहिजे हे स्पष्टपणे १३ शासन निर्णयांचा संदर्भ घालून नमूद केले आहे. शैक्षणिक साहित्य म्हणून जर व्हिडीओ दाखवायचा असेल तर कोणता व्हिडीओ मुलांना दाखवणार आहे, तो किती वेळाचा आहे. याची नोंद करून मुख्याध्यापकांनी परवानगी दिल्यानंतर मोबाइल वर्गात न्यावयाचा आहे.
शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे मोबाइल कार्यालयीन वेळेत मुख्याध्यापकांकडे जमा करावेत असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शालेय वार्षिक नियोजन, अध्यापन पूर्व नियोजन, विविध शिष्यवृत्ती परीक्षांसाठीच्या कागदपत्रांविषयी पालकांना आगावू माहिती देणे, जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात दहावीपर्यंतच्या मुलांचा विषयनिहाय अध्ययनस्तर निश्चित करणे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांनी आठवड्याला किमान दोन शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून त्याची लॉगबुकमध्ये नोंद करणे, मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी सुलेखन वही घालावी अशा प्रकारच्या एकूण ३८ सूचनांच्या माध्यमातून शाळेचे संपूर्ण कामकाज कसे चालावे हे डॉ. आंबोकर यांनी पुन्हा एकदा लेखी स्पष्ट केले आहे.
"जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्यानंतर दैनंदिन कामकाजामध्ये खूपच त्रुटी आढळून आल्या. याबद्दल बैठका आणि मेळावे घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरीही अजून अपेक्षित सुधारणा झालेली नाही. म्हणून पुन्हा एकदा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी नेमके काय केले पाहिजे याची आठवण करून देण्यात आली आहे.
- डॉ. एकनाथ आंबोकर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .