सोलापुरात लोकमंगल पुरस्कार सोहळा संपन्न
सोलापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
राष्ट्राच्या निर्माणात शिक्षकांचे योगदान अतुलनीय असते , वर्गातील सशक्त संस्कारातूनच आदर्श नव पिढ्यांचे निर्माण होते . हे विद्यार्थीच उद्याचे राष्ट्र निर्माण करीत असतात . लोकमंगल या संस्थेचा शिक्षक " रत्न पुरस्कार " अशा शिक्षकांच्या प्रेरणेचा प्रारंभ असू शकतो असे प्रतिपादन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी केले आहे. ते सोलापुरात लोकमंगल या सामाजिक संस्थेच्या " शिक्षक रत्न " पुरस्कार सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. लोकमंगल चे विश्वस्त आमदार तथा माजी मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ नांदेडे यांनी लोकमंगल संस्था करत असलेल्या मानवोपयोगी आणि मानवतावादी कार्याचा गौरव केला. शिक्षक हाच राष्ट्राचा दीपस्तंभ असल्याचे सांगून त्यांच्या सन्मानाचे पर्व आपण सारे प्रारंभ करूया असे प्रतिपादन केले. कार्यक्रमारंभीं राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत संस्थेचे प्रमुख गजानन भाकरे यांनी केले . त्यांनी आपल्या प्रास्ताविकात लोकमंगलच्या सामाजिक आणि मानवतावादी कार्याचा परिचय करून दिला. अन्नपूर्णा योजनेंतर्गत संस्थेकडून दररोज 550 गरीब गरजूंना गरम भोजनाचे डबे घरी जाऊन दिले जातात. संस्था दरवर्षी सर्वधर्माच्या सामूहिक विवाहाचे निःशुल्क आयोजन करते असे प्रतिपादन केले.
पाहुण्यांचा परिचय आणि शिक्षक रत्न पुरस्कार निवड प्रक्रियेबद्दल पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत, शिक्षण तज्ञ डॉ ह. ना. जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . त्यांनी शिक्षक रत्न पुरस्कार आणि आदर्श शाळा निवडीची प्रक्रिया अत्यंत निर्मळ, निस्पृह असल्याचे प्रतिपादन केले. आदर्श शाळेची निवड करताना समितीने प्रत्यक्ष शाळेत जाऊन ही निवड केल्याचे विशद केले.
शिक्षक रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षकांना सहकुटुंब सत्कारण्यात आले. प्रमुख अथितींच्या हस्ते शाल, श्रीफळ मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पाच हजार रुपयांचे ग्रंथ देऊन शिक्षक रत्नांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय समारोपात आमदार सुभाष बापू देशमुख यांनी लोकमंगलच्या लोक कल्याणकारी कार्याची ओळख करून दिली. राष्ट्र उभारणीत शिक्षण क्षेत्राचे आणि शिक्षकांच्या योगदानाचा आमदार सुभाष बापू देशमुख यांनी सार्थ शब्दांत गौरव केला . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ श्रीमती जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध आकाशवाणी दूरदर्शन निवेदक अरविंद जोशी यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .