नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
येथील प्रसिद्ध कवयित्री लेखिका उपशिक्षणाधिकारी सुचिता खल्लाळ यांची महाराष्ट्रातील अभिजात शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली आणि महाराष्ट्र शासनाचा ह ना आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार प्राप्त 'डिळी' कादंबरी हिंदीत आली आहे. प्रसिद्ध लेखिका सुनीता डागा यांनी या कादंबरीचा हिंदी भाषेत अनुवाद केला असून 'थूनी' कादंबरी न्यू वर्ल्ड पब्लिकेशन कडून प्रकाशित करण्यात आली आहे. थूनीचे प्रकाशन विश्व पुस्तक मेळा, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे न्यू वर्ल्ड पब्लिकेशन मध्ये प्रख्यात हिंदी कवी, अनुवादक डॉ. मणि मोहन आणि प्रख्यात कहानीकार मनीष वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाले.
डिळी ही विस्कळीत समाजाचं सामाजिक, राजकीय आर्थिक स्थित्यंतर व्यक्तीच्या मानसिक मनोघटिताच्या परिप्रेक्ष्यात जोखण्याचा प्रयत्न हे कथानक करते. त्याशिवाय अभद्र प्रतिकूलाच्या छाताडावर ठामपणे उभं राहण्याची मर्दूमकी दाखवणाऱ्या 'गोदू' नावाच्या अपराजितेचीही ही कहाणी आहे
सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे कवितासंग्रह, स्त्री कवितेचे भान: काल आणि आज (समीक्षा) आदी साहित्य प्रकाशित झाले असून या साहित्याला महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या साहित्य परिषदेंचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डिळी कादंबरी हिंदी भाषेत अनुवादित झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी सुचिता खल्लाळ आणि सुनीता डागा यांचे अभिनंदन केले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .