एमबीबीएसचे आणखी दोन विषय रद्द
निर्णयाच्या वैधतेला हायकोर्टात आव्हान
पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमातून रेस्पिरेटरी मेडिसीन, फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन व इमर्जन्सी मेडिसीन हे तीन विषय वगळण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका प्रलंबित असताना अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्डाने डेंटिस्ट्री व रेडिएशन ऑन्कोलॉजी हे दोन विषय रद्द केले आहेत. त्यामुळे या याचिकेत दुरुस्ती करून नवीन निर्णयाच्या वैधतेलाही आव्हान देण्यात आले आहे. नवीन निर्णय १२ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केला गेला आहे.
ही याचिका इंडियन चेस्ट सोसायटी व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन यांनी दाखल केली आहे. आधीच्या मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानुसार एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाकरिता हे पाचही विषय बंधनकारक होते.
स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश
या प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब मेडिकल कमिशन आणि कल्याण विभाग, नॅशनल अंडरग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड यांना नोटीस बजावून नवीन निर्णयावर चार आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .