मुंबई ( उदय नरे ) :
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने ( एनएमसी) वैद्यकीय महाविद्यालयांना यावर्षी प्रवेश दिलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याथ्र्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांना ही माहिती ८ नोव्हेंबरपर्यंत सादर करावी लागणार असून चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. एमबीबीएससाठी बेकायदा प्रवेश दिले जाऊ नयेत, तसेच असे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाईचा इशारा एनएमसीने दिला आहे.
एनएमसीने जारी केलेल्या मानकांनुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे का? याची तपासणी आता एनएमसीने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्याचे वय, त्याची बारावीची गुणपत्रिका, नीट परीक्षेत मिळाले गुण तसेच त्यातील रैंक, प्रवर्ग, दिव्यांगत्वाची माहिती, प्रवेशाचा कोटा तसेच विद्यार्थ्याकडून आकारण्यात आलेले शुल्क यांचे तपशील एनएमसीने मागवले आहेत.
..अन्यथा प्रवेश रद्द
महाविद्यालयांनी मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास ते रद्द ठरवण्याची तंबीही एनएमसीने दिली आहे. या विद्यार्थ्यांचे ३१ डिसेंबरपर्यंत १७ वर्ष वय पूर्ण असावे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याला नीट परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ४५ टक्के, तर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी ४० टक्के असावेत. नियमांचा भंग करून प्रवेश दिल्यास वैद्यकीय महाविद्यालयांवर १ कोटी रुपयांचा अथवा संबंधित अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी आकारण्यात येणाच्या फी एवढा दंड आकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .