दोन लाखांचा पुरस्काराने भविष्यात शाळेचा होणार कायापालट !
शाळेचे बदलते रूप पाहून इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळेत दाखल..
नांदेड / किनवट ( शालेय वृत्तसेवा ) :
शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे आंदबोरी(चि) येथील नागरिकांच्या सहकार्यातून आणि शिक्षकांच्या अथक प्रयत्नातून मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदबोरी (चि) शाळेने किनवट तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. पुरस्काराचे शाळेला दोन लाख रुपयाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. या टप्प्यात पायाभूत सुविधा, शासन ध्येयधोरणे अंमलबजावणी, शैक्षणिक संपादणूक या बाबीची 150 गुणांची वस्तुनिष्ठ तपासणी पंचायत समिती पथकाकडून तालुकास्तरावर करण्यात आली होती.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधा, बोलक्या भिंती, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय बचतबँक, आनंददायी शनिवार, स्पर्धा परीक्षा तयारी, डिजिटल ई लर्निंग,परिसर भेट,साक्षरता कार्यक्रम,परसबाग, सहल,क्रीडा महोत्सव, तंबाखूमुक्त शाळा, अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे शाळेचा यशस्वी प्रवास सुरू आहे. शाळेत 114 विद्यार्थी शिक्षण घेत असून सहा शिक्षक कार्यरत आहेत.
सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी कायम झटत असतात. शाळेचा सर्व परिसर सीसीटीव्हीने सूसज्ज आहे. शाळेचा प्रत्येक वर्ग डिजिटल आहे. या पुरस्कारामुळे जिल्हा परिषद शाळेविषयी नागरिकांची सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. ग्रामस्थ या यशामुळे भारावून गेले आहेत. शाळेचे बदलते रूप पाहून इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळेत दाखल होत आहेत, असे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी नमूद केले.
शाळेच्या यशाबद्दल किनवट चे गटशिक्षणाधिकारी श्री गंगाधर राठोड साहेब, बीटचे विस्तार अधिकारी श्रीमती वैशाली आडगावकर मॅडम, केंद्रप्रमुख अविनाश दासरवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू जाधव, उपाध्यक्ष अंबादास पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शेळके, शिक्षक सुदर्शन येरावार, प्रल्हाद गित्ते, नितीन सावरगावे, अकबर मोमीन, श्रीमती रूपाली तेलंग यांचे अभिनंदन करून शाळेच्या विकासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .